अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
बुलडाणा, दि.
29 (जिमाका) : आगामी गणेशोत्सव काळात मंडळे व नागरिकांनी प्रसाद, भंडारा व अन्नपदार्थांच्या
सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांनी
Fssai.gov.in या संकेतस्थळावरील फोसकॉस (Foscos) पोर्टलवर नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त
करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी या सर्व
सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
मार्गदर्शक सूचना याप्रमाणे : प्रसाद व अन्नपदार्थ स्वच्छ पाण्याने, स्वच्छ भांड्यांत
आणि स्वच्छ हाताने तयार करावेत, शिळे होणारे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवून साठवू नयेत,
प्रसाद स्वच्छ व कोरड्या स्वरूपात तयार करावा.
कच्चा माल व घटकद्रव्ये : तुप, तेल, दूध, खोबरे, पीठ इत्यादी पदार्थ नेहमी ताजे
व प्रमाणित दर्जाचे असावेत, कच्चा माल केवळ FSSAI परवाना असलेल्या दुकानदारांकडूनच
खरेदी करावा, खरेदीची बिले मागवून जतन करावीत, पॅकबंद वस्तूंवर FSSAI क्रमांक, उत्पादन
तारीख व कालबाह्यता तारीख तपासावी, एकाच तेलात वारंवार तळणे टाळावे, भंडारा अथवा प्रसादासाठी
ताजी फळे व भाज्या वापराव्यात.
स्वयंपाक व वितरण पद्धत : प्रसाद शक्यतो गरमागरम वाटावा, थंड पदार्थांसाठी शीतसाखळीचे
पालन करावे, दूधापासून बनलेले पदार्थ 12 तासांतच वापरावेत, स्वच्छ व झाकलेल्या भांड्यांतून
प्रसाद वाटावा, प्रसाद वाटताना हात स्वच्छ धुवावेत, शक्यतो हातमोजे व झाकलेली पात्रे
वापरावीत, प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक भांडी/पाने वापरावीत, केटरिंग सेवेकडून प्रसाद
घेतल्यास त्यांचा FSSAI परवाना तपासावा.
आरोग्याची काळजी : ताप, खोकला वा संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी अन्न तयार
करणे व वाटप करणे टाळावे, प्रसादात कृत्रिम रंग, सुगंधी द्रव्ये वा घातक रसायनांचा
वापर करू नये.
साठवणूक व वाहतूक
: लवकर खराब होणारे पदार्थ थंड जागी वा शीतगृहात ठेवावेत, अन्न नेहमी झाकून ठेवावे,
उरलेला प्रसाद फेकून न देता त्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
000000
Comments
Post a Comment