खामगावात लवकरच ओपन जीम आणि जॉगिंग पार्कची निर्मिती: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचा पुढाकार
बुलढाणा,
दि. 29 (जिमाका) : शहराच्या विकासाला नवी दिशा देत, नागरिकांच्या आरोग्य संवर्धनावर
भर देण्यासाठी खामगाव शहरात लवकरच ओपन जीम आणि आकर्षक जॉगिंग पार्क उभारण्यात येणार
आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर या
महत्वपूर्ण उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हे
ओपन जिम खामगाव शहराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच नागरिकांना निरोगी जीवनशैलीसाठी
आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील. शहराला सुव्यवस्थित बनवण्याच्या दृष्टीनेही हा एक
महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमासंदर्भात नामदार फुंडकर यांनी तालुका क्रीडा
अधिकारी लक्ष्मीशंकर यादव आणि नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके
यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांनी या प्रकल्पांसाठी तातडीने नियोजन सुरू करण्याचे
आदेश दिले आहेत.
शासकीय व खाजगी संस्थांचा सहभाग: या प्रकल्पांची अंमलबजावणी तालुका क्रीडा संकुल
समितीच्या सहकार्याने केली जाईल. विशेष म्हणजे, यासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून
न राहता, विविध सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांच्या योगदानातून हे आरोग्यवर्धक
प्रकल्प उभे केले जाणार आहेत. यामुळे सार्वजनिक-खासगी भागीदारीचे एक उत्तम उदाहरण खामगावात
पाहायला मिळेल. शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकांचे सुशोभिकरण केले जाईल आणि तेथे आकर्षक
डिझाइनसह सौंदर्याला नवा स्पर्श दिला जाईल. त्याचबरोबर, शहरातील मोकळ्या जागांवर आणि
लेआउटमधील ओपन स्पेसमध्ये हिरवळ आणि जॉगिंग पार्क विकसित केले जातील, ज्यामुळे शहरातील
वातावरण अधिक सुखद होईल.
या उद्यानांचे आणि ओपन जीमचे व्यवस्थापन आणि देखभाल
करण्याची जबाबदारी इच्छुक असलेल्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांकडे सोपवली
जाईल. यातून, प्रकल्पांची दीर्घकाळ देखभाल सुनिश्चित होईल आणि नागरिकांना या सुविधांचा
सातत्याने लाभ घेता येईल.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व: दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय
क्रीडा दिनाचे महत्त्व या घोषणेमुळे अधिक अधोरेखित झाले आहे. हा दिवस हॉकीचे जादूगार
म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आहे. या दिवशी देशभरात खेळांना प्रोत्साहन
देण्यासाठी विविध स्पर्धा, मॅरेथॉन आणि खेळाडूंच्या सन्मान सोहळ्यांचे आयोजन केले जाते.
क्रीडा संस्कृती रुजविणे आणि खेळाडूंच्या योगदानाचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य
उद्देश आहे. खामगावमधील या उपक्रमामुळे या दिवसाचा उद्देश अधिक सार्थक होईल.
खामगावात सुरू होणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे शहरातील
नागरिकांना शारीरिक व्यायामासाठी उत्तम व्यासपीठ मिळेल. धावणे, चालणे आणि इतर शारीरिक
हालचालींसाठी सुरक्षित आणि स्वच्छ जागा उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास
मदत होईल आणि शहराच्या एकूण सौंदर्यातही भर पडेल. या प्रकल्पांमुळे खामगावकरांच्या
जीवनशैलीत एक सकारात्मक बदल घडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
00000

Comments
Post a Comment