रासायनिक गुलालांची विक्री, साठवणुक व वापरण्यास बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश
बुलडाणा दि. 28 (जिमाका): आगामी श्री गणेशोत्सव कालावधीत गुलालांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रासायनिक
गुलालाचा वापर केल्याने पर्यावरण व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक व वापर करण्यास
बंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक गुलालामुळे पर्यावरण
व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुलालामध्ये लेड ऑक्साईड,
कॉपर सल्फेट, क्रोमियम आयोडाईड, अॅल्युमिनियम ब्रोमाईट यांसारखी घातक रसायने वापरली
जातात. यामुळे डोळ्यांना अॅलर्जी, किडनीचे आजार, अस्थायी अंधत्व, ब्रॉन्कीअल अस्थमा,
कॅन्सर यांसारखे आजार होण्याचा धोका असून माती, पाणी व हवेत प्रदूषण वाढण्याची शक्यता
नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शांततेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी रासायनिक गुलालांची विक्री,
साठवणुक व वापर करणाऱ्यांवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार आदेश जारी केले
आहेत.
आदेश याप्रमाणे : बुलडाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक
व वापर करणे कायमस्वरूपी बंदी, जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना रासायनिक
गुलालाची विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई, पर्यावरणपूरक पर्याय म्हणून नैसर्गिक,
हर्बल, जैविक गुलालाचा वापर करावा. बंदीचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, दुकाने वा व्यक्तींवर
कारवाई करण्याचे अधिकार संबंधित पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रदान
करण्यात आले असून ते स्वतंत्र्यरित्या कारवाई करतील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या
कलम 15 नुसार कारवाई केली जाणार, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment