खामगावात लवकरच ओपन जीम आणि जॉगिंग पार्कची निर्मिती: राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचा पुढाकार
बुलढाणा, दि. 29 (जिमाका) : शहराच्या विकासाला नवी दिशा देत, नागरिकांच्या आरोग्य संवर्धनावर भर देण्यासाठी खामगाव शहरात लवकरच ओपन जीम आणि आकर्षक जॉगिंग पार्क उभारण्यात येणार आहेत. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर या महत्वपूर्ण उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हे ओपन जिम खामगाव शहराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच नागरिकांना निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतील. शहराला सुव्यवस्थित बनवण्याच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमासंदर्भात नामदार फुंडकर यांनी तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव आणि नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. त्यांनी या प्रकल्पांसाठी तातडीने नियोजन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय व खाजगी संस्थांचा सहभाग: या प्रकल्पांची अंमलबजावणी तालुका क्रीडा संकुल समितीच्या सहकार्याने केली जाईल. विशेष म्हणजे, यासाठी केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता, विविध सरकारी कार्यालये...