महसुली दाव्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात होणार लोकअदालतींचे आयोजन; पहिल्या टप्प्यात १०७ प्रकरणे निकाली
बुलढाणा दि.23 (जिमाका) : महसूल विभागातील प्रलंबित दावे आणि अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महसुली दावे आपसी सहमतीने व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे.
महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित विविध महसुली दावे मोठ्या प्रमाणात दाखल असतात. एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात. त्यामुळे प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित राहतात. हा विलंब कमी करून नागरिकांना जलद न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाने हे अभियान सुरू केले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व स्तरांवरील महसूल लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित लोकअदालतींमध्ये एकूण १०७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.
*डिसेंबरमध्ये दुसरा टप्पा*
अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर २०२६ मध्ये लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी मंडळ स्तरावर, १० डिसेंबर रोजी तहसील स्तरावर, तर १७ डिसेंबर रोजी उपविभागीय स्तरावर लोकअदालत होणार आहे. तसेच २४ डिसेंबर रोजी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा व जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे, तर २८ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, खामगाव येथे लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील महसुली दाव्यांमधील सर्व पक्षकारांनी या अभियानात सहभागी होऊन संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात अथवा कार्यालयात आवश्यक अर्ज सादर करावेत. आपसी सहमतीने व तडजोडीने प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment