विशेष संक्षिप्त पुनरीक्षणात मतदारांना नाव नोंदणीची आणखी एक संधी प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांनी गणना प्रपत्र भरून द्यावे; निवडणूक विभागाचे आवाहन
बुलढाणा, दि.7 (जिमाका)
: विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप
मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेत
काही मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD – Absent,
Shifted, Dead, Duplicate) या कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकलेली
नाहीत. अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी आणखी एक संधी
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक
मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून देण्याची
सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी गणना प्रपत्र भरलेल्या मतदारांची माहिती ECINET प्रणालीद्वारे
संबंधित अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी
यांच्या माध्यमातून संबंधित मतदारांपर्यंत प्रत्यक्ष, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे
गणना प्रपत्र पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच, मतदार संकेतस्थळ किंवा ECINET ॲपच्या माध्यमातून मतदार आपला EPIC क्रमांक
प्रविष्ट करून गणना प्रपत्र डाउनलोड करू शकतात आणि ते भरू शकतात. मतदान केंद्रस्तरीय
अधिकारी राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या समन्वयाने संबंधित मतदारांशी
संपर्क साधणार आहेत. याशिवाय मतदारांचे नातेवाईक, शेजारी, स्थानिक रहिवासी कल्याणकारी
संस्था आणि उपलब्ध संपर्क क्रमांकांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.
मूळ निवासस्थानावरून स्थलांतरित न झालेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत जोडपत्र-बमध्ये
यापूर्वी गणना प्रपत्र सादर करता आले नसल्याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. तर स्थलांतरित
झालेल्या मतदारांनी जोडपत्र-कमध्ये आपला नवीन पत्ता आणि विधानसभा मतदारसंघाची माहिती
नमूद करून सध्याच्या निवासस्थानाशी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार
नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/
या संकेतस्थळावर ASDD मतदारांची यादी उपलब्ध आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर
ज्या मतदारांना आपले नाव समाविष्ट करायचे आहे, त्यांनी फॉर्म-६ भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन
पद्धतीने गणना प्रपत्र सादर करावे. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार
नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
दरम्यान, ASDD यादीतील ज्या मतदारांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर
नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-६ भरला असेल, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची
आवश्यकता नाही, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन
निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment