बुलढाण्यात १६ नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन; समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तक्रारी सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 13
(जिमाका) : महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या
तक्रारींचे शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी सोमवार, दि. १६ नोव्हेंबर
२०२६ रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महिला लोकशाही दिन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात येणार आहे. महिलांनी आपल्या
तक्रारी विहित नमुन्यातील अर्जाच्या दोन प्रतींमध्ये सादर कराव्यात. तक्रार किंवा निवेदन
वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून, संबंधित महिलांनी तक्रार सादर करताना स्वतः उपस्थित
राहणे बंधनकारक आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे आणि सेवा
व आस्थापना विषयक प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर, तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर
महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी
शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तरी जिल्ह्यातील गरजू, समस्याग्रस्त व पीडित
महिलांनी या महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
बुलढाणा यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment