महात्मा फुले यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी – प्रा. बोदळे**महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त जिल्हा ग्रंथालयात विशेष व्याख्यान*
*महात्मा फुले यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी – प्रा. बोदळे*
*महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त जिल्हा ग्रंथालयात विशेष व्याख्यान*
*बुलढाणा, दि. २१ (जिमाका) :* महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानातून महात्मा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक योगदान अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बोदळे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. केणे आणि पंजाबराव गायकवाड उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. बोदळे यांनी महात्मा फुले यांनी शिक्षणप्रसारासाठी केलेला संघर्ष, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत उभारलेली चळवळ तसेच समाजातील अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा याविषयी सविस्तर विवेचन केले. महात्मा फुले यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून, तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी श्री. केणे आणि पंजाबराव गायकवाड यांनीही महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा दाखला देत त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही, हा महात्मा फुले यांचा विचार आजच्या काळातही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन कैलास गव्हाळे यांनी केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीचे महत्त्व स्पष्ट करून त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
यावेळी शिक्षण विभागाचे गणेश पुंडे, अजय शिरसाठ, शुभम यदमल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रंथप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
00000
Comments
Post a Comment