दिवाळीपूर्वीच ४ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रिम मदत जमा**बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटी ८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील*

*दिवाळीपूर्वीच ४ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रिम मदत जमा*

*बुलढाणा जिल्ह्यात २१५ कोटी ८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील*

*बुलढाणा, दि. १५ (जिमाका) :* यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करत दिवाळीपूर्वीच जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३० हजार १५३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चिखली तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ९६९ शेतकऱ्यांना २६ कोटी ४८ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्याखालोखाल मेहकर तालुक्यातील ४७ हजार ७३२ शेतकऱ्यांना २३ कोटी ८७ लाख रुपये, सिंदखेड राजा तालुक्यातील ४२ हजार ७८ शेतकऱ्यांना २१ कोटी ४ लाख रुपये, खामगाव तालुक्यातील ४० हजार २६ शेतकऱ्यांना २० कोटी १ लाख रुपये, तर बुलढाणा तालुक्यातील ३६ हजार ३३ शेतकऱ्यांना १८ कोटी २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे.

तसेच लोणार तालुक्यातील ३४ हजार ३८ शेतकऱ्यांना १७ कोटी २ लाख रुपये, मोताळा तालुक्यातील ३१ हजार ८१९ शेतकऱ्यांना १५ कोटी ९१ लाख रुपये, नांदुरा तालुक्यातील २७ हजार ३८८ शेतकऱ्यांना १३ कोटी ६९ लाख रुपये, तर संग्रामपूर तालुक्यातील २५ हजार ८५७ शेतकऱ्यांना १२ कोटी ९३ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील २४ हजार ७४८ शेतकऱ्यांना १२ कोटी ३७ लाख रुपये, मलकापूर तालुक्यातील २२ हजार ७५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपये, शेगाव तालुक्यातील २२ हजार ११७ शेतकऱ्यांना ११ कोटी ६ लाख रुपये, तर जळगाव जामोद तालुक्यातील २२ हजार ५९३ शेतकऱ्यांना ११ कोटी ३० लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.

अशा प्रकारे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांतील एकूण ४ लाख ३० हजार १५३ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत २१५ कोटी ८ लाख रुपयांची अग्रिम मदत जमा करण्यात आली आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपलब्ध करून दिलेली ही मदत शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात उपयोगी ठरली आहे. दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम खात्यात जमा झाल्याने सणासुदीच्या खर्चासह दैनंदिन गरजा आणि शेतीशी संबंधित खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळाला  आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या