विशेष लेख : धरती आबाचा हुंकार! जल, जंगल, जमिनीच्या हक्कांसाठी पेटवलेली क्रांती… भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी !
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा केवळ सत्तेविरुद्धच्या संघर्षाचा इतिहास
नाही, तर तो अस्मिता, अस्तित्व, स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात
वीरांच्या बलिदानाची गाथा आहे. या इतिहासाच्या पानांवर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी
ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे एक तेजस्वी नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे, ते
म्हणजे भगवान बिरसा मुंडा! अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्षाची
मशाल पेटवली, आदिवासी समाजाला संघटित केले आणि स्वाभिमानाने जगण्याची नवी प्रेरणा दिली.
त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा हुंकार आजही जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी लढणाऱ्या
प्रत्येकाला ऊर्जा देतो. म्हणूनच त्यांना आदिवासी समाजात 'धरती आबा' अर्थात धरतीचे
पिता म्हणून आदराचे स्थान लाभले आहे.
त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजातीय
गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती देशभर
उत्साहात साजरी होत आहे. या जयंतीचे औचित्य साधून ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत
'भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या
माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासोबतच शासनाच्या विविध
कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत
आहे.
अन्यायाच्या जाणिवेतून जन्माला आलेला क्रांतिकारक!
१५ नोव्हेंबर १८७५ रोजी तत्कालीन बिहारमधील रांची जिल्हा आजच्या झारखंडमधील खुंटी
जिल्ह्यातील उलिहातू या छोट्याशा गावात बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. सुगना मुंडा आणि
कर्मी मुंडा यांच्या पोटी जन्मलेल्या बिरसांचे बालपण निसर्गाच्या सान्निध्यात आणि आदिवासी
परंपरांच्या वातावरणात गेले. मिशनरी शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांना समाजातील
विषमता, शोषण आणि ब्रिटिश राजवटीचा अन्याय जवळून अनुभवायला मिळाला.
आदिवासींच्या पारंपरिक जमिनी बळकावणे, जमीनदार आणि सावकारांकडून होणारे शोषण,
ब्रिटिश प्रशासनाचे जाचक नियम आणि आदिवासींच्या सांस्कृतिक जीवनात केला जाणारा हस्तक्षेप
या घटनांनी त्यांच्या मनात असंतोषाची ठिणगी पेटवली. मात्र, हा असंतोष केवळ मनात ठेवण्याऐवजी
त्यांनी त्याचे संघटित आंदोलनात रूपांतर केले. आदिवासी समाजाला आपल्या हक्कांची जाणीव
करून देणे, अन्यायाविरुद्ध एकजूट निर्माण करणे आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणे,
हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.
'उलगुलान'चा निनाद; ब्रिटिश सत्तेला दिले आव्हान!
आदिवासींच्या जमिनीवर त्यांचाच अधिकार असावा, त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीचे
रक्षण व्हावे, शोषणाची व्यवस्था संपुष्टात यावी आणि अन्यायकारक ब्रिटिश राजवटीतून मुक्तता
मिळावी, या उद्देशाने बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली
उभारलेला 'उलगुलान' म्हणजेच महान उठाव हा भारतीय इतिहासातील आदिवासी संघर्षाचा महत्त्वपूर्ण
अध्याय ठरला.
हा लढा केवळ राजकीय सत्तेविरुद्ध नव्हता, तर तो आदिवासींच्या अस्तित्वाचा, सांस्कृतिक
अस्मितेचा आणि पारंपरिक अधिकारांचा लढा होता. ब्रिटिश राजवट आणि स्थानिक जमीनदारांच्या
शोषणाविरुद्ध त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे आदिवासी समाजात
संघटनशक्ती निर्माण झाली. आपल्या हक्कांसाठी लढण्याचे धैर्य आणि अन्यायासमोर न झुकण्याचा
निर्धार समाजात रुजला.
१८९० च्या दशकाच्या उत्तरार्धात या आंदोलनाने अधिक तीव्र स्वरूप धारण केले. बिरसा
मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले. त्यामुळे
ब्रिटिश प्रशासन अस्वस्थ झाले आणि आंदोलन दडपण्यासाठी कठोर कारवाई सुरू झाली.
क्रांतीसोबतच समाजसुधारणेचीही मशाल!
भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एका क्रांतिकारकापुरते मर्यादित
नव्हते. ते समाजसुधारक, जनजागृतीकार आणि सेवाभावी नेतृत्वाचे प्रतीक होते. समाजातील
अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अनिष्ट प्रथांविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. व्यसनांपासून
दूर राहून स्वच्छ, शिस्तबद्ध आणि नैतिक जीवन जगण्याचा संदेश त्यांनी दिला.
दुष्काळ, महामारी आणि आजारपणाच्या काळात त्यांनी गरजू लोकांना मदतीचा हात दिला.
आजारी व्यक्तींची सेवा करण्यासाठी ते गावोगावी जात असत. पशुपक्ष्यांप्रती दया आणि सहानुभूती
बाळगण्याची शिकवण देत त्यांनी निसर्गाशी एकरूप असलेल्या आदिवासी जीवनमूल्यांचे महत्त्व
अधोरेखित केले. त्यांनी समाजाला केवळ संघर्षासाठी संघटित केले नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठीही
प्रेरित केले. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाला आदिवासी समाजात असामान्य विश्वास आणि
लोकमान्यता प्राप्त झाली.
बिरसा मुंडा यांची वाढती लोकप्रियता आणि आदिवासी समाजातील संघटन ब्रिटिश सत्तेला
धोकादायक वाटू लागले. १८९५ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना अटक करून हजारीबाग तुरुंगात डांबले.
सुमारे दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली. मात्र, कारावासाच्या यातनांनी
त्यांचा निर्धार कमी झाला नाही. उलट, अन्यायाविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा
त्यांनी संकल्प केला.
१८९७ ते १९०० या कालखंडात ब्रिटिश सैन्य आणि मुंडा क्रांतिकारक यांच्यात अनेक
संघर्ष झाले. खुंटी परिसरातील ब्रिटिश पोलीस ठाण्यावरील हल्ला, टांगा नदी परिसरातील
संघर्ष आणि १९०० मधील डोंबाडी टेकडीवरील लढाई या घटनांनी आंदोलनाची तीव्रता स्पष्ट
केली. डोंबाडी टेकडीवरील संघर्षात अनेक आदिवासी महिला आणि लहान मुलांनाही प्राण गमवावे
लागले. ब्रिटिशांनी आंदोलन दडपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दमनचक्र सुरू केले.
फेब्रुवारी १९०० मध्ये बिरसा मुंडा यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांना रांची
तुरुंगात ठेवण्यात आले. अखेर ९ जून १९०० रोजी अवघ्या २५ व्या वर्षी तुरुंगातच त्यांचे
निधन झाले. ब्रिटिश सरकारने त्यांच्या मृत्यूचे कारण कॉलरा असल्याचे सांगितले. त्यांच्या
अकाली निधनाने आदिवासी समाजाचा एक महानायक हरपला; मात्र त्यांनी पेटवलेली क्रांतीची
ज्योत विझली नाही.
एका क्रांतीचे पडसाद; पुढील पिढ्यांसाठी हक्कांच्या लढ्याची प्रेरणा!
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष त्यांच्या निधनानंतरही संपला नाही. त्यांच्या
आंदोलनामुळे आदिवासींच्या पारंपरिक जमीनहक्कांचा प्रश्न व्यापक स्तरावर ऐरणीवर आला.
पुढील काळातील आदिवासी जमीनहक्कांच्या संरक्षणासाठी झालेल्या कायदेशीर सुधारणांवर त्यांच्या
आंदोलनाचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडला.
त्यांनी आदिवासी समाजाला दिलेला संदेश स्पष्ट होता—आपली जमीन, आपली संस्कृती,
आपली परंपरा आणि आपली अस्मिता यांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने उभे राहिले पाहिजे.
त्यांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धचा प्रतिकार, सामाजिक एकजूट आणि स्वाभिमानाने जगण्याचा
प्रेरणादायी आदर्श आहे.
जनजातीय गौरव दिन : आदिवासी शौर्य, संस्कृती आणि योगदानाचा सन्मान!
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस
'जनजातीय गौरव दिन' म्हणून घोषित केला आहे. या दिवसाचा उद्देश केवळ एका महानायकाचे
स्मरण करणे एवढाच नसून, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सामाजिक परिवर्तनात आदिवासी
समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरव करणे हा आहे.
देशभरातील आदिवासी क्रांतिकारकांचे शौर्य, त्याग, बलिदान, लोकपरंपरा, भाषा, संस्कृती
आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या दिनाच्या
माध्यमातून केले जात आहे. भारतीय इतिहासातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान अधोरेखित
करून त्यांच्या संघर्षाची ओळख समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा यामागील व्यापक
उद्देश आहे.
गौरव दिवस सेवा सप्ताह : योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत!
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या
कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी बांधवांचे
शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यावर या उपक्रमांतून विशेष
भर दिला जात आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, शासकीय
सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे
आणि आदिवासी समाजाच्या विकासाला गती देणे, हे या सेवा सप्ताहाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
योजनांची माहिती, विविध शासकीय सेवा आणि लाभ वितरणाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना
विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न या सप्ताहातून केला जात आहे. भगवान बिरसा
मुंडा यांच्या विचारांचा खरा सन्मान त्यांच्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीतूनच होऊ
शकतो, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.
गडचिरोलीत देशस्तरीय मुख्य कार्यक्रम!
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील
गडचिरोली येथे देशस्तरावरील मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यपाल,
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांच्यासह विविध मान्यवरांची
उपस्थिती राहणार आहे.
यानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या
मुख्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा आणि अन्य आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन
करण्यात येणार आहे. पद्म पुरस्कारप्राप्त आदिवासी व्यक्ती, सामाजिक नायक, समाजसेवक,
बुद्धिजीवी, आदिवासी संत-महंत तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती
व समूहांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आदिवासी महापुरुषांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने उद्याने, चौक
आणि रस्त्यांचे नामकरण, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि आदिवासी सांस्कृतिक वारशाचे संवर्धन
अशा विविध उपक्रमांनाही या निमित्ताने प्रोत्साहन दिले जाणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांचे आयुष्य म्हणजे वयाने लहान; पण विचारांनी विशाल असलेल्या
एका महानायकाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी हातात शस्त्र घेऊन अन्यायकारी सत्तेला
आव्हान दिले; पण त्याचवेळी समाजाच्या मनात स्वाभिमान, एकजूट, व्यसनमुक्ती, नैतिकता
आणि सामाजिक परिवर्तनाचे विचारही रुजवले. त्यांचा संघर्ष एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित
नव्हता, तर तो मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठीचा लढा
होता.
आजच्या काळातही जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणाचा प्रश्न, आदिवासी संस्कृतीचे
संवर्धन, शिक्षणाच्या संधी आणि सामाजिक-आर्थिक विकास या विषयांना विशेष महत्त्व आहे.
अशा वेळी भगवान बिरसा मुंडा यांचे विचार अधिकच समर्पक ठरतात.
त्यांची १५१ वी जयंती आणि जनजातीय गौरव दिन हा केवळ अभिवादनाचा औपचारिक सोहळा
न राहता, आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान आणि सर्वांगीण
विकासासाठी नव्याने संकल्प करण्याचा दिवस ठरावा. कारण, बिरसा मुंडा हे केवळ इतिहासातील
एक क्रांतिकारक नाव नाही; ते अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, स्वाभिमानाने जगण्याची
प्रेरणा आणि आपल्या मातीशी निष्ठा राखण्याचा अजरामर विचार आहेत!
संकलन :
जिल्हा माहिती
कार्यालय, बुलढाणा
00000

Comments
Post a Comment