बुलढाण्यात १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा ; राज्यातील १० विभागांतील १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींचे संघ सहभागी होणार
बुलढाणा, दि. 3
(जिमाका) : क्रीडा
व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र हॉकी आणि बुलढाणा
हॉकी असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन
१२ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सहकार विद्यामंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे करण्यात
आले आहे.
या स्पर्धेत राज्यातील एकूण १० विभागांतील १४ व १७ वर्षांखालील
मुला-मुलींचे हॉकी संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक विभागातून मुलांचे व मुलींचे प्रत्येकी
१८ खेळाडू, संघ व्यवस्थापक तसेच पंचाधिकारी, स्वयंसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी
व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३०
वाजता सहकार विद्यामंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे. यावेळी क्रीडा व युवक
सेवा संचालनालयाचे अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी,
अमरावती विभागाचे उपसंचालक, हॉकी संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील
अधिकारी-कर्मचारी तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था सहकार विद्यामंदिर
येथे करण्यात आली असून मुलांच्या निवासासाठी नूतन विद्यालय, मलकापूर येथेही व्यवस्था
करण्यात आली आहे. स्पर्धास्थळापासून निवासस्थानापर्यंत खेळाडूंची ने-आण करण्यासाठी
यशोधाम पब्लिक स्कूलच्या वतीने स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंच्या भोजनाची
व्यवस्था स्पर्धास्थळी करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन, तक्रार निवारण, उद्घाटन,
तांत्रिक, मैदान व्यवस्था, भोजन, निवास, वैद्यकीय, प्रसिद्धी आणि स्वच्छता अशा विविध
समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निमंत्रण पत्रिका, प्रमाणपत्रे, भोजन पासेस आणि
आवश्यक दस्तऐवजांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन होत असल्याने
जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे.
तसेच स्थानिक शाळांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावर आणण्याचे
नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment