निवृत्ती वेतनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला;पात्र निवृत्ती वेतनधारकांनी सुविधेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 


 •          ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष अभियान

 •          बँक शाखांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश

 

बुलढाणा, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्याच्या विशेष अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत असून, सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

 

या अभियानांतर्गत निवृत्ती वेतनधारकांना कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यासाठी 'जीवन प्रमाण' (Jeevan Pramaan) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सहजपणे हयातीचा दाखला सादर करणे शक्य होणार आहे.

 

डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी https://jeevanpramaan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच Jeevan Pramaan Face App आणि Aadhaar Face ID या मोबाईल ॲपच्या माध्यमातून स्मार्टफोनवर चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) करूनही दाखला सादर करता येणार आहे.

 

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांकडे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पीपीओ (PPO) क्रमांक, बँक खाते तपशील तसेच आवश्यक निवृत्ती वेतनविषयक माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेत निवृत्ती वेतनधारकांसाठी स्वतंत्र कक्ष अथवा खिडकी (Dedicated Counter) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बँकांच्या दर्शनी भागात, सूचना फलकावर आणि एटीएम केंद्रांवर डिजिटल हयातीचा दाखला विशेष अभियानासंदर्भातील माहितीपत्रके व फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

बँकेत येणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना मोबाईलद्वारे घरबसल्या फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून हयातीचा दाखला सादर करता येतो, याबाबत बँक कर्मचाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच अभियानाच्या कालावधीत कोणत्याही निवृत्ती वेतनधारकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व बँक शाखा व्यवस्थापकांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी डिजिटल हयातीचा दाखला सादर करून या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या