‘युवा संवाद – Know Your Vote’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जनजागृती माय भारत बुलढाणातर्फे येलगाव येथील पंकज लड्डढ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

 


 

बुलढाणा, दि. ३ (जिमाका) : युवकांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने माय भारत बुलढाणा, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने येलगाव येथील पंकज लड्डढ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथे ‘युवा संवाद – Know Your Vote’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

कार्यक्रमाला युवा आयकॉन कमलेश सोनवणे, जिल्हा युवा अधिकारी दीक्षा पोमन, संस्थेचे प्राचार्य पद्मनाभ गाडगे, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी भरत पवार आणि महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

जिल्हा युवा अधिकारी दीक्षा पोमन यांनी विद्यार्थ्यांना माय भारत पोर्टलवरील विविध उपक्रम, युवकांसाठी उपलब्ध असलेल्या सहभागाच्या संधी तसेच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) याबाबत मार्गदर्शन केले. युवकांनी सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

युवा आयकॉन कमलेश सोनवणे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेची माहिती देतानाच मतदानाचे महत्त्व, मतदार म्हणून नागरिकांची जबाबदारी आणि लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. प्रत्येक नागरिकाने जागरूक मतदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे प्राचार्य पद्मनाभ गाडगे यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्यासोबतच सामाजिक जाणीव जपण्याचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात एनएसएस कार्यक्रम अधिकारी भरत पवार यांनी विद्यार्थ्यांना जागरूक नागरिक म्हणून वागण्याची, तर प्रा. नेहा गवारे यांनी लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश्वरी असोले आणि आदित्य इंगळे यांनी केले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता, नागरिकत्वाची जाणीव, लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांच्या सहभागाचा संदेश देण्यात आला.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या