प्रत्येक घरात आरोग्याचे दैवत धन्वंतरीची पूजा करा ; धनत्रयोदशीला निरोगी जीवनाचा संकल्प करा -केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन
बुलढाणा, दि. ३
(जिमाका) : मानवी
जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, उत्तम आरोग्य हीच सुखी आणि समृद्ध जीवनाची
खरी संपत्ती आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी
यांची प्रत्येक घरात श्रद्धापूर्वक पूजा करावी आणि निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे
आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
भारतीय संस्कृती आणि परंपरेत आरोग्याला महत्त्वाचे स्थान
देण्यात आले आहे. दीपावली पर्वाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. या दिवसाचे भगवान धन्वंतरी
यांच्या पूजनाशी असलेले महत्त्व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारे आहे. धन्वंतरी
देवतेची उपासना ही केवळ धार्मिक परंपरा नसून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा
देणारी आहे.
प्रत्येक कुटुंबाने धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी
यांचे पूजन करून आरोग्य संवर्धनाचा संकल्प करावा. दैनंदिन जीवनात योग, व्यायाम आणि
आरोग्यदायी आहाराचा समावेश करावा. नियमित योगाभ्यास आणि योग्य जीवनशैलीच्या माध्यमातून
शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव
जाधव यांनी सांगितले.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने नागरिकांनी आरोग्याबाबत सजग
राहून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या निरोगी जीवनासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी
केले.
Comments
Post a Comment