निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करा - जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान राबविणार
बुलढाणा दि.4 (जिमाका): जिल्हा
कोषागार कार्यालय बुलढाणा व इतर कोषागार कार्यालयांच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबर २०२६
या कालावधीत देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत
जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी
आपला वार्षिक हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले
आहे.
निवृत्तीवेतन अखंडित सुरू राहण्यासाठी
संबंधितांनी वेळेत हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. यासाठी विविध पर्याय उपलब्ध
करून देण्यात आले आहेत. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन मिळणाऱ्या बँकेच्या शाखेत
जाऊन हयातीचा दाखला सादर करता येईल. यासाठी कोषागार कार्यालयाने बँकांकडे नावांची यादी
पाठविली आहे. बँकेच्या शाखेत यादीतील नाव शोधून स्वाक्षरी करावी. स्वाक्षरी करता येत
नसल्यास उजव्या किंवा डाव्या अंगठ्याचा ठसा उमटवून RHT/LHT (Right/Left Hand
Thumb) अशी नोंद करून स्वाक्षरीची खात्री करावी.
कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना पुनर्नियुक्ती मिळाली असल्यास
यादीतील सहाव्या रकान्यात 'YES' नमूद करून त्याबाबतचे आदेश बँकेत जमा करावेत. तसेच
पुनर्विवाह झाला असल्यास सातव्या रकान्यात 'YES' अशी नोंद करावी. याशिवाय निवृत्तीवेतनधारकांना
स्मार्टफोनमध्ये आधार फेस आरडी आणि जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करून चेहऱ्याची ओळख पटवून
डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या पोस्ट
इन्फो अॅपद्वारे विनंती नोंदवून पोस्टमनच्या माध्यमातून घरबसल्या बायोमेट्रिक पद्धतीने
हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी या पर्यायांचा
लाभ घेऊन १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आपला हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन
जिल्हा कोषागार अधिकारी योगेश धोंगडे यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment