‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; 

सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी - डॉ. किरण पाटील

बुलढाणा, दि‍.27 :- मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. या मेळाव्यासाठी 30 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेला दिलेल्या जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.पाटील बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिघोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एम. बसैय्ये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले आहे. दिलेल्या जबाबदारी प्रमाणे संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून चोखपणे काम करून घ्यावे. कोणत्याही विभागाला आपल्या कामाविषयी शंका असेल तर त्याचे निरसन तात्काळ करून घ्यावे. कार्यक्रम स्थळावर तीस ते चाळीस हजार लाभार्थी येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने त्यांच्या बसण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, स्वच्छता, भोजन, पाणी आदी व्यवस्था चांगल्याप्रकारे करा. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. तसेच कार्यक्रम स्थळावर येणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी. सर्व संबंधित विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून मेळावा व्यवस्थितपणे पार पडेल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

 प्रत्येक तालुक्यातून लाभार्थी आणले जाणार आहेत, त्यासाठी लाभार्थ्याच्या संख्या प्रमाणे प्रत्येक तालुक्याला बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लाभार्थी व्यवस्थितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील व त्यानंतर ते व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचतील याचे योग्य नियोजन करावे. लाभार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसची पार्कींग व्यवस्था डी.एड. महाविद्यालय मैदान व जिजामाता महाविद्यालय मैदान येथे तर खाजगी वाहनासाठी जिजामाता महाविद्यालय मैदान व आयटीआय कॉलेजच्या बाजुकडील प्रांगणात करण्यात आली आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन पार्कींग व्यवस्था होमगार्ड मैदान येथे करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळावर आवश्यक त्या सर्व सोईसुविधा संबंधित विभागाने पुरवाव्या. कार्यक्रम सोहळाकरीता येणाऱ्या महिला भगिनींना कोणतही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या