सेवा सप्ताहानिमित्त जानेफळ येथे रक्तदान शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; स्वतः केले रक्तदान
बुलढाणा, दि. २५ (जिमाका) : केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात आयोजित सेवा सप्ताहाच्या
अनुषंगाने २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे यांनी जानेफळ
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली.
आगामी जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या नियोजनाबाबत वैद्यकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना विविध आरोग्य
सेवांचा लाभ मिळावा, यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सेवा सप्ताहांतर्गत जानेफळ येथे आयोजित
रक्तदान शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज
ठाकरे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. रक्तदान हे श्रेष्ठदान
असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदान शिबिरांमध्ये
उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000
Comments
Post a Comment