बुलढाण्यात प्रथमच अत्याधुनिक वैद्यकीय सेवांचा प्रारंभ; रोबोटिक सर्जरीसह एनएबीएल कार्यशाळेचे आयोजन

 


 •          २७ व २८ नोव्हेंबरला आरोग्यविषयक विविध उपक्रम

•           २२ वैद्यकीय महाविद्यालयांतील १५० डॉक्टरांचा सहभाग

 

बुलढाणा, दि. २६ (जिमाका) : केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा येथे २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय विविध भव्य वैद्यकीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा जिल्ह्यात प्रारंभ होणार असून, पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया, एनएबीएल कार्यशाळा आणि दोन दिवसीय २ डी इको शिबिर हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या वैद्यकीय उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये एनएबीएल कार्यशाळा, रोबोटिक सर्जरी तसेच २ डी इको शिबिराचा समावेश आहे. राज्यातील २२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे १५० डॉक्टर या एनएबीएल कार्यशाळेत सहभागी होणार असून, दिल्ली येथील तज्ज्ञांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

२८ व २९ नोव्हेंबर असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या २ डी इको शिबिरासाठी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलची तज्ज्ञ चमू उपस्थित राहणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून हृदयविकाराशी संबंधित तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

रोबोटिक शस्त्रक्रिया हा या उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारतातील रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रवर्तक आणि जागतिक ख्यातीचे हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव हे स्वतः उपस्थित राहणार असून, राज्यातील अनेक नामवंत शल्यचिकित्सकही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय उपक्रम प्रथमच बुलढाण्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित होत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी ही महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, आमदार धीरजभाऊ लिंगाडे, रोबोटिक हृदय शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय अतिरिक्त महासंचालक डॉ. माधुरी बारसागडे, एनएबीएल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामानंद शुक्ला, आरोग्यसेवा, भारत सरकार उपमहासंचालक डॉ. मेघा खोब्रागडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, ठाणे ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदय व छाती शल्यचिकित्सक डॉ. आशुतोष सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण, तसेच विशेष कार्य अधिकारी तथा उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील तसेच प्राध्यापक व आयोजन समिती प्रमुख डॉ. अजित शिरसाठ यांच्यासह संबंधित यंत्रणा परिश्रम घेत आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या