शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ; खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक व दिव्यांग खेळाडूंना संधी
बुलढाणा,दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षांच्या पुरस्कारांसाठी
ऑनलाईन अर्ज 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक पात्र खेळाडू
व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट
क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा
पुरस्कार, तसेच खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू
व व्यक्तींसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात.
शासन निर्णय दिनांक 29 डिसेंबर 2023
व 25 जानेवारी 2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची सुधारित नियमावली
2023 निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन 2024-25 व 2025-26 या वर्षांच्या
पुरस्कारांसाठी 12 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात
आले होते. मात्र, इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी 26 ते
30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग
खेळाडू तसेच साहसी उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या
https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज
सादर करावेत. संकेतस्थळावरील ‘ताज्या घडामोडी’ या विभागात ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कार’ या शीर्षकावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरण्याबाबत सविस्तर सूचना उपलब्ध आहेत.
00000
Comments
Post a Comment