राज्यात १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण होणार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आरोग्य संवाद यात्रा; उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत होणार आढावाराज्यात १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण होणार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आरोग्य संवाद यात्रा; उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत होणार आढावा
बुलढाणा, दि. 02 (जिमाका) : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम,
गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
यांच्या पुढाकारातून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’
आयोजित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
या यात्रेचा शुभारंभ होणार असून, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे.
या कालावधीत राज्यातील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासोबतच १२५ नवीन आरोग्य
संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या यात्रेच्या माध्यमातून
आरोग्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधणार असून, आरोग्य यंत्रणेतील अडचणी, त्रुटी आणि
नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. प्राप्त सूचना आणि अनुभवांच्या आधारे
आरोग्य सेवांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.
‘ माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’
या अभियानाशी या यात्रेची सांगड घालण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध
पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली
याबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांमध्ये ग्रामपातळीवरील
लोकसहभाग वाढविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
जनतेच्या सूचनांवरून
आरोग्य सेवेत सुधारणा : आरोग्य संवाद यात्रा ही केवळ शासकीय योजनांची माहिती देणारी
मोहीम नसून, नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणांचे नियोजन
करण्याचा उपक्रम आहे. यामध्ये आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय
व्यावसायिक आणि नागरिक यांच्यात संवाद व समन्वय वाढविण्यात येणार आहे. आरोग्य सेवांबाबत
उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यावरही भर राहणार आहे.
शासकीय रुग्णालयांच्या
कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी : यात्रेदरम्यान १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात
येणार आहे. तसेच जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण
कल्याण समिती, जन आरोग्य समिती किंवा ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती यापैकी एका
समितीसोबत बैठक घेऊन आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य
कार्यक्रमांतर्गत तपासणी झालेल्या शाळा व अंगणवाड्यांना भेटी देऊन या कार्यक्रमाच्या
अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान
भारत जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयांनाही भेटी देण्यात येणार आहेत. यावेळी खासगी
डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणीची वस्तुस्थिती जाणून घेतली
जाणार आहे.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी
साधणार संवाद : पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण,
जननी सुरक्षा योजनेचे लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण तसेच महात्मा फुले जनआरोग्य
योजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णांच्या गृहभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील
पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा : आरोग्य योजनांचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत
कितपत पोहोचत आहे, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत
कोणत्या अडचणी येत आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक
आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल.
आरोग्य उपकेंद्रांपासून
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये,
स्त्री रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य सेवांची पाहणी
केली जाणार आहे.
या राज्यव्यापी यात्रेत
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य
अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार
आहेत. नागरिकांच्या गरजा जाणून घेऊन आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे आणि सार्वजनिक
आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख बनविणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

Comments
Post a Comment