पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना फार्मर आयडीसह तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान विशेष शिबिरे पात्र शेतकऱ्यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा ; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 





 

बुलढाणा, दि. २ (जिमाका) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ८८४ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र, अद्याप ३० हजार ६५६ शेतकरी विविध तांत्रिक अडचणींमुळे आधार प्रमाणीकरणापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शैलेंद्र कुमार सिंह, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, तसेच तालुका सहाय्यक निबंधक/सहकार अधिकारी श्रेणी-1, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक, सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी, सहकारी बँकेचे समन्वयक आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात या योजनेसाठी आतापर्यंत १ लाख ९६ हजार ३३९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार ६८३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. तर ३० हजार ६५६ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण विविध तांत्रिक कारणांमुळे अद्याप प्रलंबित आहे.

 

प्रलंबित शेतकऱ्यांपैकी १३ हजार ५५१ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करताना फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. त्यामुळे फार्मर आयडीअभावी अनेक पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

त्यानुसार ३, ४ व ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित शिबिरांमध्ये शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करणे, आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे तसेच योजनेच्या लाभासाठी येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण किंवा फार्मर आयडीअभावी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी या विशेष शिबिरांमध्ये सहभागी होऊन आपली प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या