मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अमरावती विभागात यशस्वी करावे - विभागीय आयुक्त नयना गुंडे विभागीय कार्यशाळा संपन्न
अमरावती दि.१ - लोकसहभाग वाढवून व नवीन शासन निर्णयातील निकषांचे तंतोतंत पालन करून अमरावती विभागातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा स्पर्धेमध्ये पात्र होतील यासाठी सर्व यंत्रणा व यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घ्यावेत व समन्वयाने अमरावती विभागात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान यशस्वी करावे असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाबाबत अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील पाचही जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक व सर्व तालूक्यांचे गट विकास अधिकारी यांच्यासाठी शुक्रवारी विभागीय कार्यशाळेचे दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेत मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नवीन आलेल्या ११ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील सुशासन पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृध्द गाव, स्वच्छ व हरीत गाव, योजनांचे अभिसरण, संस्था बळकटीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग आणि श्रमदान या आठ घटकांवर या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयाच्या नियोजनाचे यावेळी सादरीकरण केले. तसेच विभागातील प्रत्येक जिल्हयातून दोन पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी पंचायत समित्यांच्या नियोजनाचे सादरीकरण केले.
राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे, प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी करून त्याचे निर्मूलन करणे आणि माता व बालकांचे आरोग्यमान उंचावणे, या मुख्य उद्देशाने राज्य शासनाने ग्राम पातळीवर विकासाची नवी दिशा ठरविणारे एक प्रभावी अभियान आणले आहे. शासनाच्या "प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त" या तत्त्वज्ञानावर आधारीत, गावांमधील नागरिकांना सुदृढ आणि सशक्त बनवण्यासाठी, “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियान राज्यात सुरु करण्यात आले आहे.शासनाने निर्देश दिल्यानूसार सर्व ग्रामपंचायती व आरोग्य संस्थांनी अभियानात सक्रीय सहभागी व्हावे व प्रभावीपणे कामगिरी करावी असे आवाहनही श्रीमती गुंडे यांनी यावेळी केले.
विभागीय आयुक्त यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा तालूकानिहाय आढावा घेतला व उर्वरित घरकुलांची कामे त्वरीत पुर्ण करण्याबाबत सूचित केले. तसेच टंचाई कालावधीत चारा लागवड, नेपीयर गवत लागवड, जलसंधारणाची कामे, उपजीविका व व्हिबीजी रामजी अंतर्गत कामे करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या कार्यशाळेस विभागस्तरावरून विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांच्यासमवेत अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सत्यम गांधी,अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू व सहाय्यक आयुक्त (विकास) राजीव फडके उपस्थित होते. तसेच जिल्हास्तरावरून विभागातील चारही जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व कर्मचारी दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
--००--
Comments
Post a Comment