बुलढाण्यात दक्षता जनजागृती सप्ताह उत्साहात; भ्रष्टाचाराविरोधात विविध उपक्रम
बुलढाणा,
दि. २ (जिमाका) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर
२०२६ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२६’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा
करण्यात आला. यावर्षी सप्ताहाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ अशी होती.
२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
बुलढाणा कार्यालयात सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील
१३ तालुक्यांमध्ये विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यात
आली.
जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांना भेटी देऊन भ्रष्टाचाराचे
दुष्परिणाम, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नागरिकांचे अधिकार याबाबत माहिती देण्यात
आली. तसेच बुलढाणा शहरातील बसस्थानक व प्रमुख चौकांमध्ये पथनाट्यांच्या माध्यमातून
जनजागृती करण्यात आली.
मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रातील कलाकारांच्या सहकार्याने
भ्रष्टाचाराविरोधात संदेश देणाऱ्या व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांद्वारे
प्रसारित करण्यात आल्या. न्यू संकल्प अकॅडमी येथे विद्यार्थ्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधाबाबत
मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिजिटल माध्यमांसह स्थानिक केबल
नेटवर्कद्वारेही जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील
जास्त लोकवस्तीच्या गावांमध्ये, आठवडी बाजारात, मुख्य चौकांत तसेच शहरी व ग्रामीण भागात
भ्रष्टाचारविरोधी पोस्टर्स, बॅनर्स व हँडबिल्सचे वाटप करण्यात आले. नागरिकांशी संवाद
साधून भ्रष्टाचाराविरोधात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
कार्याची माहिती देण्यात आली.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा कोणी शासकीय लोकसेवक
लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्वरित संपर्क साधावा.
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य
करावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारासंबंधी तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ वर
संपर्क साधावा. तसेच विभागाच्या www.acb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही माहिती
उपलब्ध आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले
यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
00000




Comments
Post a Comment