पीएम-यशस्वी योजनेंतर्गत पोस्ट मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती; ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले महाविद्यालयांनीही NSP पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 3 (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत केंद्र शासनाच्या पीएम-यशस्वी (PM-YASASVI) योजनेंतर्गत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे पोस्ट मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्गातील (SBC) पात्र विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

 

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. इयत्ता अकरावी, पदवीच्या प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या (फ्रेश) पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका आणि पालकांच्या उत्पन्नाचा दाखला ही आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा.

 

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पात्र अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विहित मुदतीत नोंदणी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या संस्थेतील OBC, VJNT व SBC प्रवर्गातील १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अंतिम मुदतीपूर्वी भरून घेण्याची दक्षता घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या