जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्णपदक प्राप्त प्रथमेश जवकारचे कौतुक
*जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
*पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
बुलडाणा, दि. 09 : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकाविणाऱ्या बुलडाणेकर प्रथमेश जवकार याचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चीन येथे असलेल्या प्रथमेश जवकारचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
19वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीन येथील हांगझोऊ येथे सुरु आहे. या स्पर्धेत कंपाऊंड राऊंडमध्ये सांघिक प्रकारातील सुवर्ण पदक मिळविणाऱ्या आलमपूर, ता. नांदुरा येथील प्रथमेश समाधान जवकार याने ऐतिहासिक कामगिरी करुन जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नोंदविले आहे. कठोर मेहनतीने प्रथमेशने ग्रामीण भागातील प्रतिभा दाखविली आहे. प्रथमेश जवकार हा खेळाडू बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत बुलढाणा तालुका क्रीडा संकुल समिती येथील खेळाडू असून आर्चरीचा नियमित सराव करीत आहे.
सन 2023 मधील हे त्याचे तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्ण आहे. यासोबत एक रौप्य, एक कास्य पदकाची कमाई त्याने केली आहे. सदर स्पर्धेसाठी त्याच्यासह दिल्लीचा अभिषेक वर्मा, नागपूरचा ओजस देवतडे यांच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया सारख्या बलाढ्य संघाला एकतर्फी मात दिली. प्रथमेशने लहानपनापासूनच ऑलिंपिक पदक ध्येय ठेऊन कारकिर्दीस सुरुवात केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याने पहिल्या क्रमांकाचे ध्येय बाळगले आहे. त्यादृष्टीने सलग दोनवेळा पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूचा पराभव करीत स्वत:मधील गुणवत्तेची चुणूक दाखविली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसारख्या मानाच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवित त्याने बुलढाणाचे नाव संपूर्ण जगामध्ये कोरले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, बुलडाणा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी प्रथमेश जवकारचे कौतुक केले आहे.
000000
शुक्रवारी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम
महिलांनी जनसुनावणीसाठी उपस्थित राहावे
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 09 : महिलांना त्यांच्या तक्रारी स्थानिकस्तरावर मांडण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयील जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात येणार आहे. शासकीय विभागाकडील किंवा कौटुंबिक हिंसाचार संदर्भातील प्रलंबित तक्रारीबाबत किंवा नवीन लेखी तक्रार नोंदवून सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
महिला संदर्भातील तक्रारीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्यामुळे महिलांना त्या ठिकाणापर्यंत पोहोचणे अडचणीचे होते. महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत. तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पीडित महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार आहे. या सुनावणीसाठी महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी केले आहे.
0000000
‘महिला आयोग आपल्या दारी’चे शुक्रवारी आयोजन
महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात
- रुपाली चाकणकर
बुलडाणा, दि. 09 : महिला आयोगातर्फे ‘महिला आयोग आपल्या दारी’चे आयोजन शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. यात महिलांनी स्वत: पुढाकार घेऊन तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी केले आहे.
महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर तक्रारीची सुनावणी घेतील. जिल्हा ठिकाणी होणाऱ्या जनसुनावणीस अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन धैर्याने आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. महिलांना त्यांच्याच जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थिती राहतील.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत म्हणाल्या, राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या, तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी उपस्थित राहणार आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे. यातून आपल्या समस्या मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे कार्य आयोग करीत आहे.
00000
खामगाव आयटीआयकडून गोंधनापूर किल्ल्याची स्वच्छता
बुलडाणा, दि. 09 : खामगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे गोंधनापूर येथील किल्ल्याची साफसफाई राबविण्यात आली. राज्य शासनाचा ग्राम स्वच्छतेबाबत महत्वाकांक्षी उपक्रमांत नागरिक, ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गडकिल्ले स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामध्ये किल्ल्यावरील गाजर गवत काढणे, प्लास्टीक पिशव्या गोळा करणे, किल्ल्याचा प्रदेश सपाटीकरण करणे, अनावश्यक झाडेझुडपे नष्ट करणे, कचरा गोळा करून नष्ट करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य प्रकाश खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपप्राचार्य उदय चव्हाण, गटनिदेशक भारत राठोड, गटनिदेशक जितेंद्र काळे, गटनिदेशक विकास सुपे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदीप बावस्कर, शिल्पनिदेशक विनोद तराळे, श्रीकांत बेलसरे, गजानन इंगळे, श्री. माटे, रवि डोंगे, श्री. सुरडकर, श्री. मरापे, श्री. पुजारी, राजेश सावनेर, गोपाल तेलंग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या उपक्रमात खामगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या १५ महिला आणि १० पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमास राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिगंबर दळवी, अगरावती विभागाचे सहसंचालक प्रदिप घुले यांचे प्रोत्साहन मिळाले.
00000
फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
*पुनर्रचित हवामानावर आधारीत विमा योजना
बुलडाणा, दि. 09 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येते. यावर्षीच्या आंबिया बहारामध्ये सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या तीन वर्षासाठीच्या आंबिया बहारामध्ये आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी आणि संत्रा या सहा फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना 2021 पासून लागू करण्यात आली आहे. यात अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, जास्त पाऊस आणि गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे व फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यात येते.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळ पिके घेणारे यात कुळाने भाड्याने पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. सन २०२१-२२ पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी इच्छुक आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनूसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमाहप्ता राज्य शासन शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्केपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले आहे. ३५ टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन आणि शेतकऱ्यांनी ५०-५० टक्के प्रमाणे भरावयाचे आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे. अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहार यापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल, यात संत्रा, मोसंबी आणि डाळिंब फळांचा समावेश आहे.
केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. फळपिकनिहाय निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय होते. विमा क्षेत्र घटक महसूल मंडळ राहील. बँकेकडून अधिसूचित फळपिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत फळपीक निहाय देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कर्जदार आणि बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा द्राक्ष १५ ऑक्टोंबर २०२३, मोसंबी ३१ ऑक्टोबर २०२३, केळी ३१ ऑक्टोबर २०२३, संत्रा ३० नोव्हेंबर २०२३, आंबा ३१ डिसेंबर २०२३, डाळिंब १४ जानेवारी २०२४ ही आहे.
फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँक किंवा क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.
00000
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावेत
बुलडाणा, दि. 09 : विज्ञान शाखेत अकरावी आणि बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विज्ञान शाखेत अकरावी आणि बारावीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच अभियांत्रिकी पदवी, पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या आणि उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नसल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते.
यासाठी जिल्ह्यातील विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज महाविद्यालयातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समिती कार्यालयात सादर करावे लागणार आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळेल. तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला नाही त्यांनी जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र प्राप्त करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दि. १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वच्छता सेवा
बुलडाणा, दि. 09 : मेहकर येथील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत दि. 1 ऑक्टोंबर 2023 रोजी स्वच्छता पंधरवडानिमित्त संस्थेच्या गेट पासून गजानन महाराज मंदिर परिसरापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानात संस्थेचे प्राचार्य श्रीमती व्ही. बी शिरसाट, बी. एन. ताठे, ए. एस. वरणकर, पी. पी. कुमरे, जी. एस. धोटे, ए. आर. खेडेकर, एस. एस. शुक्ला, सी. व्ही. वानखेडे, एस. एम. वानखडे व पी. जी. वाघमारे, जी. एस. महातो यांनी सहभाग घेतला.
000000
Comments
Post a Comment