मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश


बुलढाणा दि. 19 (जिमाका):- निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांना सहभागी करुन घ्यावे. यासाठी मतदान क्षेत्रात मतदान नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

लोकसंख्येच्या तुलनेत कमी मतदार असलेल्या मतदार केंद्राची माहिती घेऊन अशा ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी व स्वीप नोडल अधिकारी यांनी शिबिराचे  नियोजन करावे. महिला मतदारांची संख्या कमी असलेल्या मतदान केंद्रावर महिला गट आणि महिला मेळावे भरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. मतदारांच्या नोंदणीसाठी महिला बचतगट, महाविद्यालय व खाजगी शिकवणी यांच्याशी समन्वय साधून नवमतदारांचे अर्ज भरुन घ्यावे.  तसेच मतदार संघ क्षेत्रातील प्रसिद्ध खेडाळू, कलाकार, उद्योगपती, प्रभावी व्यक्ती यांच्यामार्फत मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी. सण, उत्सवात विशेष शिबिराचे आयोजन करुन मतदान नोंदणीसाठी आवाहन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

00000

Comments