DIO BULDANA NEWS 01.10.2023

 नुकसानीच्या मदतीसाठी आधार बायोमेट्रीक अपडेट करावे

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
* केवायसीनंतर मदतीची रक्कम १५ दिवसात जमा होणार
बुलडाणा, दि. 1 : शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक करावे, तसेच आधार बायोमेट्रीक अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण करूनही बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे आधार निष्क्रिय झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधारला दहा वर्षे झाले असून त्यांनी आधारमध्ये कोणतेही अपडेट केलेले नाही, त्यांनी सर्वप्रथम आधार केंद्रातून आधार बायोमेट्रीक अपडेट करावे लागणार आहे.
मदतीची रक्कम मिळविण्यासाठी आधार केवायसी करून आधार दस्तऐवज अपडेट करावे. त्यानंतर बँकेत जाऊन बँक खात्याशी आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासन स्तरावरून पंधरा ते वीस दिवसांत मदतीची रक्कम आपोआप आधार लिंक खात्यात जमा होणार आहे.
आधार बायोमेट्रीक अपडेटसाठी फक्त आधार कार्ड आणि व्यक्ती स्वतः हजर असणे आवश्यक आहे. आधार दस्तऐवज अपडेट आणि आधार केवायसीसाठी मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड आणि राशन कार्डसोबत आधारकार्ड आवश्यक असून स्वतः व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे. या दोन्ही प्रक्रिया फक्त आधार केंद्रावरच होतात. बँकेत केलेल्या केवायसीशी आधार केवायसीचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आधार अपडेट आणि आधार डॉक्युमेंट अपडेट, आधार केवायसी हे आधार केंद्रावरच करता येते. बँकेत जाऊन खात्याला आधार संलग्न हे बँकेत जाऊनच करावे लागते.
000000







स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा, दि. 1 : स्वच्छता पंधरवडा निमित्त स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या उपक्रमाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार नगर पालिका, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि जिल्हा ठिकाणी विविध शासकीय कार्यालयात स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले.
मेहकर शहरात खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संकल्प घेऊन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी उपस्थित नागरीकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. शेगाव येथे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत नगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
लोणार येथे तहसील कार्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देऊळगाव राजा, सिंदखेडराजा तहसील कार्यालयात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. जळगाव जामोद येथे महसूल व नगर पालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. देऊळगाव राजा येथे सेवा पंधरवडा निमित्त नगर परिषद वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मोहिमेत शाळेतील विद्यार्थी व शहरातील पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले.
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आणि अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
लासुरा, ता. शेगाव येथे महा श्रमदानातून वनराई बंधारा साकारण्यात आला. तसेच शेगाव नगरपालिकेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खामगाव येथे तलावाची स्वच्छता करण्यात आली.
०००००

Comments