येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 

 

येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करा-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

प्रारुप मतदार यादी प्रकाशित करुन विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ

 

बुलडाणा दि. 28 (जिमाका) : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 

निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविल्या जातो. आज दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये आणि सर्व मतदान केंद्रावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित करून यंदाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे.

 

दि. 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 1 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरूण-तरूणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल, मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया त्या-त्या तारखेला पूर्ण करण्यात येईल. सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

           

प्रारूप यादीत आपल्या नावाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. यासाठी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इत्यादी तपशील अचूक आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबधी हरकतही घेता येते. एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबाबत त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतात. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

 

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18 व 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणीसाठी महिला मेळावे, बचतगट, महिला व बाल विकास विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे, त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत.

 

            शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2023, रविवार दि. 5 नोव्हेंबर, सोमवार दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार दि. 26 नोव्हेंबर, 2023 ह्या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा, महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय,  निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जिल्ह्यामध्ये तहसिल व मंडळ स्तरावर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आलेली आहेत. तसेच मतदार नोंदणीबाबतची प्रक्रीया नागरीकांसाठी सोईची व्हावी यासाठी सदरच्या पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देणारे व नोंदणीबाबतच्या टप्प्यांची माहिती देणार फलक जिल्हा कार्यालयाकडून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले आहेत. त्यावर माहितीसाठी जिल्ह्यातील मतदार नोंदणी करणा-या सर्व संगणक चालकांचे मोबाईल क्रमांक सुध्दा नमुद करण्यात आलेले आहेत. नोंदणी संदर्भात नागरीकांना काही अडचणी असल्यास त्यावर संपर्क साधून मतदार नोंदणीसंदर्भातील  माहिती घेणे सोपे होईल.

 

            नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र Toll Free क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे. कालावधीमध्ये नागरीकांनी ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, बीएलओ यांचेसोबत संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in Voter helpline app चा वापर करून मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

 

            या पार्शभूमीवर प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. प्रारुप मतदार यादीमध्ये ज्या मतदारांची नावे आढळून आलेली नाही तसेच दिनांक  1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ठ करणे, दुरुस्ती करणे (अस्पष्ट / चुकीचा फोटो, वय, पत्ता, नाव व इतर तपशिल) ई. प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी याबाबतचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा  निवडणूक अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.

 

1 ते 7 नोव्हेंबर कालावधीत विशेष ग्रामसभा

 

            ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने स्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

 

            दि. 5 जानेवारी 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या 20 लक्ष 31 हजार 7 इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 69.15 टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या 20 लक्ष 31 हजार 283 आहे. आणि ही संख्या एकूण अंदाजित लोकसंख्येच्या तुलनेत 67.32 इतकी आहे. तसेच 2023 च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या 10 लक्ष 67 हजार 862 इतकी होती. तर 27 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 10 लक्ष 67 हजार 843 एवढी आहे. तर स्त्री मतदारांची जानेवारी 2023 मधील मतदार यादीत 9 लक्ष 63 हजार 122 इतकी, तर ऑक्टोबर 2023 मधील संख्या 9 लक्ष 63 हजार 412 एवढी आहे. जानेवारी 2023  मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 902 स्त्रिया होत्या, तर 27 ऑक्टोबरच्या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे 902 स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी 2023 मधील संख्या 23 होती, तर ऑक्टोबर 2023 मध्ये 28 इतकी आहे.

 

            बुलढाणा जिल्हयाच्या (जनगनणा 2011) लोकसंख्येत 18-19 वयोगटाची टक्केवारी 4.02% (1 लक्ष 4 हजार 014) इतकी आहे, पण ऑक्टोंबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 1.10% (22 हजार 344) एवढ़ी आहे. तर 20-29  या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी 18.15% (4 लक्ष 69 हजार 312) इतकी आहे, पण ऑक्टोंबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त 20.09% (4 लक्ष 08 हजार 211) एवढी आहे. भारत हा तरुणांचा देश आहे असं आपण एकीकड़े म्हणतो, पण मतदार यादीतली त्यांची आकडेवारी निराशाजनक आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पूरस्काराचे आयोजनही करण्यात आले आहे. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणा-या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

00000

Comments