रुग्णालयात स्वच्छता, पुरेशी औषधे ठेवावीत
जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे निर्देश*औषधांची आवश्यकता असल्यास स्थानिक खरेदी करावी
बुलडाणा, दि. ७ : शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ रुग्ण भरती होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. या रुग्णांवर तातडीने उपचार करावे लागतात. यासाठी रुग्णालयात पुरेसा प्रमाणात औषधसाठा ठेवण्यात यावा. आवश्यकता वाटल्यास स्थानिक स्तरावर खरेदी करावी, तसेच रुग्णालय आणि परिसरात स्वच्छता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आज जिल्हा शासकीय रुग्णालय, स्री रुग्णालय आणि क्षयरोग रुग्णालय येथे भेट दिली. तसेच आरोग्यविषयक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. औषधसाठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये. वेळ पडल्यास स्थानिक स्तरावर औषधी खरेदी करावी. तसेच रुग्णालयात असलेल्या मशीन सुस्थितीत ठेवण्यात याव्यात. या मशीनच्या देखभाल दुरुस्तीसाठी झालेल्या करारानुसार वेळेत तपासणी करावी. आवश्यकता असल्यास अतिरिक्त मशीनची मागणी नोंदवावी.
आरोग्य सेवा देताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहावे. नागरिकांशी सौदाहार्यपूर्ण भाषेत बोलावे. तसेच प्रामाणिकपणे सेवा द्यावी. रुग्णालयाचे वातावरण चांगले राहावे यासाठी परिसर, बेड, डस्टबिन स्वच्छ ठेवण्यात यावेत. नागरिकांना संजीवनी ॲप वापराबाबत माहिती देण्यात यावी. दिव्यांगांची तपासणी बुधवार आणि शुक्रवारी होते. यावेळेस संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित रहावे. दिव्यांग प्रमाणपत्र वेळेत निर्गमित व्हावे, यासाठी प्रयत्न करावे.
शासकीय रुग्णालयात केस पेपर विनामूल्य काढण्यात येते. याठिकाणी आयुष्यमान भारत कार्डची माहिती देण्यात यावी. माहितीसाठी पत्रके वाटप करावीत. तसेच एसएमएस सुविधा विकसित करावी. आवश्यकता भासल्यास याच ठिकाणी तात्काळ नोंदणी करावी, असे निर्देश दिले.
क्षय रुग्णालय आणि स्त्री रुग्णालय येथील भेटीदरम्यान आवश्यकतेप्रमाणे पदे त्वरित भरून नागरिकांना सेवा देण्याविषयी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
*जिल्हाधिकारी यांची जिल्हा कारागृहास भेट*
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्हा कारागृहास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदीजनांना येणाऱ्या अडचणीबाबत चौकशी केली. कारागृह पाहणी वेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री.देशमुख, विद्युत विभागाचे अभियंता श्री. ताठे, कारागृह अधीक्षक श्री. आवळे. वरिष्ठ तुरूंगाधिकारी श्री. भुतेकर, तुरूंगाधिकारी श्री. पाटील उपस्थित होते.
पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी कारागृहातील व्हीसी रूम, पाकगृहाचे बांधकाम, वर्कशेडच्या जागेवर नवीन बांधकाम करणे, इमारतीची रंगरंगोटी करावी, तसेच बंदीजनांना वेळेवर भोजन देण्यात यावे आणि परिसरात स्वच्छता ठेवण्याबाबत निर्देश दिले.
००००
Comments
Post a Comment