DIO BULDANA NEWS 02.10.2023

 







जिल्ह्याच्या समस्या जाणून उपाययोजना करणार

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*तालुका दौऱ्यात विविध यंत्रणांची प्रत्यक्ष पाहणी
*मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर दौरा
बुलडाणा, दि. 2 : जिल्ह्यातील तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेटी देण्यासोबतच विविध यंत्रणांचा जिल्हा दौऱ्याच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. प्रत्यक्ष भेटी दिल्याने जिल्ह्याच्या समस्या जाणून घेण्यास मदत झाली असून येत्या काळात जिल्ह्याचा आराखडा तयार करून उपाययोजना करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी शुक्रवार, दि. २९ सप्टेंबरपासून तीन दिवसात मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी यांनी रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद तालुक्याचा दौरा केला. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी शरद पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी दौरा दरम्यान नैसर्गिक आपत्ती मदत वाटप, ई-पीक पाहणी, पीएम किसान, वसुली, घोषणापत्र ४ याबाबत आढावा घेतला. तसेच  कामाची गती वाढविण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी भिंगारा येथील निवासी शाळेला भेट दिली. शाळेच्या भोवती बांबू लागवड, रंगरंगोटी करण्याच्या सूचना दिल्या. भिंगारा ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरीकांच्या समस्या जाणून कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेश आंतरराज्यीय चेक पॉइंटची तपासणी केली. भविष्यात आकस्मित परिस्थिती उद्भवल्यास पूर्वतयारी म्हणून लगतच्या मध्यप्रदेशातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या.
सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीला भेट देऊन ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट देऊन बांबू व शेवगा लागवड करण्याबाबत निर्देश दिले. तसेच स्वस्त धान्य गोदामाला भेट देऊन स्टॉक, रजिस्टर व्यवस्थित असल्याची खात्री केली. येथील हमालांशी त्यांनी संवाद साधला. बांधकाम सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. कार्यकारी अभियंता यांनी कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
नगरपरिषदेच्या कार्यालयाला भेट देऊन मुख्याधिकारी यांना रेकॉर्ड अद्ययावत करणे व स्वच्छतेबाबत सूचना दिल्या. तहसील कार्यालयाला भेट देऊन दस्तावेजची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सर्व यंत्रणांची बैठक घेऊन प्रमुख समस्यांचा आढावा घेतला.
जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी मलकापूर येथे २९ सप्टेंबर रोजी भेट दिली. मलकापूर येथील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, अभ्यासिका आदी ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, मतदान केंद्राला भेटी दिल्या. तसेच नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. 
अभ्यासिकेला भेट दिल्यानंतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, सामाजिक वनीकरण नर्सरी येथे भेट दिली. 
मोताळा येथील न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली. वनपट्ट्याची माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नांदुरा तालुक्यातील शेतीचे नुकसानीची पाहणी करण्यात आली. अनुदानाच्या वाटपाची माहिती यावेळी घेण्यात आली. जळगाव जामोद येथे वस्तीगृह येथे भेट देऊन पाहणी केली.
000000

अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिस संरक्षणात कारवाया
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
*अवैध वाळू उत्खननात वारंवार सहभागी असल्यास मोकाची कारवाई 
* शहरातील महत्वाच्या मार्गावर तपासणी नाके उभारणार
बुलडाणा, दि. 2 : अवैध गौण खनिजाबाबत कारवाईपूर्वी पोलीस अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सूचना द्यावी. कारवाई वेळी दोन शस्त्रधारी पोलीस पुरविण्यात येणार आहे. यानंतर अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिस संरक्षणात कारवाया होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांनी गौणखनिजविषयक आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे, अपर जिल्हाधिकारी सुनिल विचनकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ, सहाय्यक परिवहन अधिकारी सौरभ पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी माया माने उपस्थित होते. 
बैठकीत सुधारीत वाळु धोरणानुसार सन २०२२-२३ मधील वाळु, रेती डेपोंच्या ई-निविदेबाबत चर्चा करण्यात आली. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी इच्छुक निविदाधारकांनी लिलावात सहभागी होऊन वाळु डेपो घेण्याबाबत त्यांचे प्रोत्साहित करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी वाळू डेपो सुरु झाले नसल्याने अवैध वाळु उत्खनन व वाहतुकीबाबत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी भरारी पथकामार्फत अवैध उत्खननाच्या ठिकाणाचा शोध घेऊन पोलीस व परिवहन अधिकारी यांच्या संयुक्त पथकाव्दारे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 
अवैध उत्खननाबाबत जप्त केलेली वाहने पोलीस पाटलांकडे न देता ती वाहने आता तहसीलदारांनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात यावी. नियमाप्रमाणे दंडासह रॉयल्टी वसुल करून लिलावाची प्रक्रीया तहसीलदारांनी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
अवैध उत्खननाच्या कारवाईमधील दोषीविरुद्ध त्याच दिवशी पोलीस ठाण्यामध्ये अनुषंगीक कलमे नमूद करुन गुन्हा नोंदविण्यात यावा. तसेच वारंवार विशिष्ट व्यक्तींचा अवैध वाळू उत्खनन व वाहतूक चोरी प्रकरणात वारंवार सहभाग असल्याचे आढळून आल्यास मोका कायद्याअंतर्गत कार्यवाही करावी.
अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने शहरातील मार्गावर तपासणी नाके तयार करावेत. अवैध गौणखनिज कारवायाबाबत पोलीस अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासमवेत प्रत्येक १५ दिवासांनी तालुका, उपविभाग पातळीवर नियमीतपणे अवैध गौण खनिज कारवायाबाबत सभा घेण्यात यावी. 
परिवहन अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन यांच्याकडले ठेवलेली वाहने संबंधित तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या नारहकतीशिवाय सोडण्यात येऊ नये. तसेच न्यायालयात संबंधिताविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले नसल्यास तात्काळ विनाविलंब दाखल करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांनी दंड केलेल्या वाहनांवर यापूर्वी जिल्ह्यातील इतर उपविभागात दंड झालेला असल्यास घेतलेला बाँड रद्द करण्यात यावा.
शासनाच्या निर्देशानुसार जप्त केलेल्या वाळु साठ्याचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तसेच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्याच्या घरकुलासाठी त्यांच्या मागणीनुसार देण्याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी कार्यवाही करावी. तहसिलदार यांनी जप्त केलेला वाळू साठा चोरीस जाणार नाही, यासाठी नियमाप्रमाणे लिलावाव्दारे विल्हेवाट करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
000000



जिगाव प्रकल्पाला जिल्हाधिकारी यांची भेट
पुनर्वसित खरकुंडी, अडोळ बु. येथे नागरी सुविधांची पाहणी
बुलडाणा, दि. २ : जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शनिवार, दि. ३० सप्टेंबर रोजी भेट दिली. जिल्हाधिकारी यांनी डेक ब्रीजच्या स्लॅबच्या कामाचे उद्घाटन केले. तसेच प्रस्तावित नदीपात्रातील सांडव्याच्या जागेची पाहणी केली. तसेच पुनर्वसित खरकुंडी, अडोळ बु. येथे नागरी सुविधांची पाहणी केली.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी पुनर्वसित गावठाण अडोळ बु. (पळशी फाटा) येथील नागरी सुविधांच्या कामाची पाहणी केली. तसेच बाधित गावठाणातील नागरिकांना भूखंड वाटप करून तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या. त्यानतर जिगाव प्रकल्पातील पुनर्वसित गाव खरकुंडी येथे भेट देऊन नागरी सुविधांच्या कामाची पाहणी केली. जिगाव प्रकल्पातील पुनर्वसित गावात नागरी सुविधांची कामे उत्कृष्ट झाली असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादन व पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी यांनी नांदुरा विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये भूसंपादन प्रकरणनिहाय भूसंपादनाची स्थिती, तसेच ही प्रकरणे वेळेत पूर्ण होण्याबाबत चर्चा केली. सदर प्रकल्पामुळे बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सिंचनाचा अनुशेष दूर होणार आहे.
जिगाव प्रकल्पाचे काम  प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाद्वारे 736.58 दलघमी (26.01 टीएमसी) इतका पाणीसाठा निर्माण होणार आहे. प्रथम टप्प्यातील 25 गावांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. सद्य:स्थितीत खरकुंडी, कोदरखेड, माहुली व पातोंडा या प्रकल्पग्रस्त गावाचे नवीन गावठाणात स्थलांतर झाले आहे. तर जिगाव, हिंगणा बाळापूर, पलसोडा, हिंगणा इसापूर, हिंगणा दादगांव, बेलाड, अडोळ खु. या गावाचे भूखंड वाटप नागरी सुविधांसह जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली आहेत. तसेच प्रथम टप्प्यातील उर्वरीत गावांतील नागरी सुविधा प्रगतीपथावर आहे. मंजूर टप्पानिहाय नियोजनानुसार प्रकल्पामध्ये 182.89 दलघमी पाणीसाठा निर्माण करुन 45 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांनी दिली.
सद्य:स्थितीत प्रथम टप्याकरीता लागणाऱ्या 10,904 हेक्टर क्षेत्रापैकी 6,524 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत 4,380 हे क्षेत्राची भुसंपादनाची प्रकरणे विविध स्तरावर असून नियोजनानुसार सदर जमिनीचे भुसंपादन करणे आवश्यक असल्याबाबत यावेळी सांगण्यात आले.
प्रकल्पामध्ये अंशत: पाणीसाठा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्प्यातील भुसंपादन व पुनर्वसनाची कामे नियोजनानुसार विहित वेळेत पुर्ण करणे आवश्यक असल्याबाबत कार्यकारी अभियंता यांनी सांगीतले. प्रकल्पामध्ये अंशतः पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसित गावठाणामध्ये स्थलांतरण होण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे भुसंपादन व पुनर्वसनाची कामे तात्काळ हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यादृष्टीने संपादन यंत्रणा, महसूल विभाग, भूमी अभिलेख आदी कार्यालयांनी भुसंपादन प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा, अश्या सुचनाही त्यांनी दिल्या. 
000000


राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजिवनी मोपळे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, स्वीय सहायक रविद्र लहाने, नाझर गजानन मोतेकर आदी कर्मचारी उपस्थित होते. 
0000

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
बुलडाणा, दि. 2 : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी श्रीमती कुलकर्णी, वार्ड इन्चार्ज, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांचे समुपदेशक श्री सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, श्री. साबळे, घनश्याम बेडवाल आदी उपस्थित होते.
०००००

Comments