DIO BULDANA NEWS 05.10.2023









 सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती

-पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

*सहकार, जिल्हा नियोजनचा आढावा

*सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्न

            बुलडाणा, दि. 5 : शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था असणे आवश्यक आहे. या संस्थांची स्थिती मजबूत करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. केंद्र शासनाच्या मदतीने या संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना अवसायनात काढण्यास स्थगिती देण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाशिवाय संस्था अवसायनात काढू नये, असे निर्देश पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

          जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात अमरावती विभागातील सहकार विभागाची बैठक आज घेण्यात आली. यावेळी आमदार अमोल मिटकरी, राजेंद्र शिंगणे, आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर आदी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न प्रामुख्याने समोर येतो. यासाठी वेळीच कर्जपुरवठा झाला नसल्यास शेतकरी ज्यादा व्याजदराने कर्ज घेतो. परिणामी कर्ज परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यास शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल घेतात. त्यामुळे सावकारी कायद्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. या कायद्याने काही बाबी नियंत्रित कराव्यात. असे असताना पतपुरवठ्यासाठी चांगल्या संस्था असणे गरजेचे आहे. सोसायटी प्रामुख्योन कर्ज वाटप आणि वसुली ही दोनच कामे करतात. संस्थेचे कामकाज चांगले चालण्यासाठी अनुभवी व्यक्तीची निवड करण्यात यावी. वसुली अभावी अनिष्ठ तफावत येऊन संस्था बंद पडतात. परिणामी बँका बंद होतात. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होणे थांबते. हे चक्र थांबविण्यासाठी अवसायनातील संस्थांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा.

          केंद्र शासनाने सहकार क्षेत्राला बळकटी करण्यासाठी नवीन कायदा आणला आहे. डीबीटी योजनेतून सेवा देण्याचे काम करण्यात येणार आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्था वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच सोसायटींची संगणकीकरण करण्यात येणार आहे. यातून या संस्था बहुउद्देशीय कार्य करतील. यात 150 व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी.

          जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल. यात सर्व प्रश्न जाणून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. सहकार क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. अर्बन बँकेवर निगराणी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अवसायनात बाबत निर्णय घेऊ नये. ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी सोसायटीचे जाळे असणे आवश्यक आहे. त्यासाठी सहकार क्षेत्रातील सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

जिल्हा नियोजनचा आढावा

          पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीचा आढावा घेतला. येत्या काळात आचारसंहितेचा कालावधी मोठा राहणार असल्याने यावर्षीची कामे तातडीने पूर्ण करावीत. यासाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी वितरण तातडीने करावे. येत्या 2024-25 चा आराखडा शासनाच्या निर्देशाप्रमाणे तयार करण्यात यावा. जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात यावेत. पोलिस यंत्रणांना वाहने आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तातडीने मागणी नोंदवावी.

          शेगाव येथे तिरुपतीच्या धर्तीवर संगीत वाजविण्यासाठी स्पिकरची व्यवस्था करावी. यामुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होईल. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

विभागीय सहनिबंधक विनायक कहाळेकर यांनी सहकार विभागाची माहिती सादर केली. पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

00000

शुक्रवारी ‘महिला आयोग आपल्या दारी’चे आयोजन

बुलडाणा, दि. 5 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने महिलांना मुंबई येथे पोहोचणे शक्य होत नाही. महिलांना त्यांच्या तक्रारी बाबत स्थानिक स्तरावर म्हणणे मांडण्याकरीता ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

महिलांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. या जनसुनावणीस महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पिडित महिला कोणतीही पूर्व सूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकणार आहे.

सदर जनसुनावणीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, समुपदेशन केंद्र यांची सेवा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या मांडाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील महिलांशी संबंधित योजना आणि सुरक्षेसंबंधी आढावा घेण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहे.          शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी जनसुनावणी घेण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले आहे. सुनावणीसाठी जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा, तसेच जिल्हा परिषदेकडील समुपदेशन केंद्रांना पिडीत महिलांची प्रकरणे सुनावणीस ठेवावेत, असे महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी संजना भुवड यांनी कळविले आहे.

0000000

माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 5 : जिल्ह्यात दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करावा, यात पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी देशभरात दि. 12 ऑक्टोबर 2005 पासून करण्यात आली आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनामध्ये पारदर्शकता व जनतेप्रती उत्तरदायित्व निर्माण होण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहात जाणीव जागृती करण्याशी संबंधीत उपक्रमात माहिती अधिकार कायद्याच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार विषयी पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळांचे आयोजन करावे. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये माहितीचा अधिकार या विषयाबाबत प्रबोधनपर व्याख्याने, कार्यशाळेचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

आज ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रम

लाभासाठी दिव्यांगांनी कागदपत्रांसह

उपस्थित राहण्याचे आवाहन

*आरोग्य विभागातर्फे दिव्यांग, आरोग्य तपासणी

बुलडाणा, दि. 5 : दिव्यांग कल्याण विभागातर्फे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांगाच्या तपासणीसह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी महत्वाच्या कागदपत्रांसह दिव्यांगानी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानात दिव्यांगासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येईल. तसेच दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूआयडी कार्ड उपलब्ध नाही, अशा दिव्यांग व्यक्तींची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना सहाय्यकारी साहित्याची आवश्यकता असल्यास, अशा दिव्यांग व्यक्तींची अलिम्कोतर्फे नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, पॅन कार्ड, रेशनकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, नगरपालिका प्रशासन प्रशासन अधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाला दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त विष्णूदास घोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित राहतील.

00000

दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक

ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांचा दौरा

बुलडाणा, दि. 5 : दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, मंत्री दर्जा हे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार, श्री. कडू शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 वाजता श्रीमती ताराबाई शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित दिव्यांग कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगासंबंधीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे प्रहार पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता वैभव मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देतील.

000000

Comments