DIO BULDANA NEWS 04.10.2023

 थेट सरपंचपदांसह ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

            बुलडाणा, दि. 4 : जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. यासोबतच 59 ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि. 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 9 नोव्हेंबर डिसेंबर 2023 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

00000

दिव्यांगाचे यूआयडी कार्ड तात्काळ वितरीत करावेत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

            बुलडाणा, दि. 4 : जिल्ह्यात दिव्यांगांची तपासणी करून यूआयडी कार्ड वितरण करण्यात आले नसल्याबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर उपलब्ध असलेले पाच हजार यूआयडी तात्काळ वितरीत करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

          दिव्यांगाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. जिल्ह्यात 48 हजार 952 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. यातील पाच हजार दिव्यांगाचे यूआयडी कार्ड जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. हे कार्ड समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद आणि गटविकास अधिकारी यांच्या मदतीने ते दिव्यांगापर्यंत पोहोचतील, याची दक्षता घेण्यात यावी. दिव्यांगाच्या सोयीसाठी मलकापूर येथे गुरूवार आणि बुलडाणा, खामगाव येथे गुरूवार व शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

तसेच वरवंट बकाल येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये वीज पुरवठा सुरू करण्यात यावा. तसेच प्रत्येक रूग्णालायात पुरेसा औषधसाठा उपलब्ध राहिल, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

000000

शुक्रवारी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान

बुलडाणा, दि. 4 : दिव्यांग कल्याण विभागातर्फे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियान शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे. यात दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील राहतील. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धिरज लिंगाडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, ॲड. आकाश फुंडकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, राजेश एकडे उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त विष्णूदास घोडके, विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे उपस्थित राहतील.

या अभियानात दिव्यांगासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूआयडी कार्ड उपलब्ध नाही, अशा दिव्यांग व्यक्तींची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच दिव्यांग व्यक्तींना साहित्याची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग व्यक्तींची अलिम्कोतर्फे नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, नगरपालिका प्रशासन प्रशासन अधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.

00000

पौष्टीक तृणधान्य जनजागृतीसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा

बुलडाणा, दि. 4 : विद्यार्थांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य पदार्थाचा वापर वाढविण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान शाळेतील मुलांमध्ये तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

सन 2023-24 मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत आहे. पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन वाढ करणे आणि पौष्टिक तृणधान्यामधील पौष्टिक गुणधर्माविषयी जागरुकता निर्माण करून त्यांचा आहारात समावेश करण्यासाठी कृषी विभागातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.

तालुका कृषी अधिकारी यांनी शालेय शिक्षण विभागाशी संपर्क साधून कार्यक्रम आयोजित करावयाचे आहे. कृषी सहायकांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामधील शाळेमध्ये जाऊन पौष्टिक तृणधान्य पिक आणि पौष्टिक गुणधर्माविषयी जागरूकता निर्माण करून पौष्टिक तृणधान्यांच्या पदार्थांचा वापर, दैनंदिन आहारातील महत्त्व याविषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शाळास्तरावर करण्यात येणार आहे. यात पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दि. 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत आरोग्य सेविकांना सहभाग घेण्यात येणार आहे. विद्यार्थी पोषण जागरूकता मोहीम संकल्पनेनुसार बरई या पिकाकरीता समर्पित असून या पिकाविषयी जनजागृती करण्याकरीता विविध आयोजित करण्यात येणार आहे.

00000

अवसायनातील पदुम सहकारी संस्थांची

नोंदणी रद्द करण्याची मोहिम

बुलडाणा, दि. 4 : जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहा वर्षावरील अवसायनातील पदुम संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मोहिम सुरू केली आहे. यात जिल्ह्यातील 544 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्यांतर्गत नियम १९६१ च्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील पदुम सहकारी संस्थानी नोंदणीनंतर कामकाज सुरु केलेले नाही आणि उपविधीनुसार कामकाज केलेले नाही, अशा संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. या संस्थावर अवसायकाची नेमणूक करुन ६ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अद्यापपर्यंत संबंधित संस्थांनी अवसायकांना पूर्णतः पदभार दिलेला नाही. संपूर्ण रेकॉर्ड प्राप्त झाला नसल्यामुळे संस्थेचे देणेघेणे इतर आर्थिक व्यवसाय, संस्थेकडील जंगम मालमत्तेचा अद्यावत तपशिल अवसायकांना प्राप्त झालेला नाही.

जिल्ह्यामध्ये ६ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अवसायनात असलेल्या पदुम सहकारी संस्था बुलडाणा ४५, चिखली ४४, मोताळा ६७, शेगाव २३, नांदुरा ३५, खामगाव ४५, जळगाव जामोद २२, संग्रामपूर १९ व पशू संस्था १७, कुक्कुटपालन ६, मत्स्य संस्था १४ अशा एकूण ५४४ संस्था अवसायनात आहेत. अवसायनात असलेल्या सहकारी संस्थाची यादी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्यातर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांचे कार्यालय, माहिती कार्यालय, जिल्हा विशेष लेखा परीक्षक (पदूम) या कार्यालयात पहावयास उपलब्ध आहे.

अवसायनातील संस्थाची यादी buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्धआहे. सदर संस्थांची नोंदणी तातडीने रद्द करावयाची आहे. याबाबतीत कोणत्याही व्यक्तीस संस्थेच्या देणेघेणेबाबत हरकती असल्यास सात दिवसात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बुलडाणा, प्रशासकीय इमारत येथील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच ठोक पुराव्यानिशी आक्षेप लेखी स्वरुपात दाखल करावेत. विहीत मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही. याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर आक्षेपाचा कालावधी संपल्यानंतर अवसायनातील संस्थाची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०९ कलम २१ अंतर्गत रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहकारी संस्था (दुग्ध) चे सहाय्यक निबंधक अ. वि. भोयर यांनी कळविले आहे.

00000

 जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रीयेतील प्रवेशपत्र उपलब्ध

बुलडाणा, दि. 4 : ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील गट-क मधील विविध संवर्गातील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेकरीता दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरळसेवा भरती प्रक्रीया २०२३ करीता रिगमन व वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गातील परीक्षा दि. ७ ऑक्टोबर २०२३, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या संवर्गाची दि. ८ ऑक्टोबर २०२३, विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्यपर्यवेक्षक या संवर्गातील परीक्षा दि. १० ऑक्टोबर २०२३ आणि निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची परिक्षा दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे.

सदर संवर्गातील परीक्षेकरीता प्रवेशपत्र zpbuldhana.maharashtra.gov.in या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे आवाहन नोडल अधिकारी तथा साप्रवि उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले आहे.

00000

Comments