दिशा समिती; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधा- खासदार प्रतापराव जाधव




 

दिशा समिती; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधा- खासदार प्रतापराव जाधव

* बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी


बुलडाणा,(जिमाका) दि.20 : सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने घरकुल, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य अशा विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील आर्थिक दारिद्र्य दूर करता येते. कार्यान्वयीन यंत्रणांनी योजनांच्या अंमलबजावणीतून  समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास साधावा, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या. 



जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दिशा (जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समिती) समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना खासदार श्री. जाधव बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, प्रकल्प संचालक राजेश इंगळे, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत,  दिशा समितीचे सदस्य सतिश तायडे आदी उपस्थित होते.


खासदार जाधव म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने रस्ते बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चिखली मेहकर, चिखली जालना, शेगाव खामगाव या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. काही रस्ते आणि पुलांचे कामे सदोष झाले आहेत. त्यावर योग्य ती कार्यवाही करून नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी कामे करावीत.  राष्ट्रीय महामार्गाची काही ठिकाणी उंची वाढली आहे. त्यामुळे पोचमार्गाची योग्य दुरूस्ती प्राध्यानाने करावी. महामार्गाचे काम करताना जनतेच्या तक्रारींचे निरसन होईल याची दक्षता घ्यावी. 


सिंचन प्रकल्पांमुळे गावांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहे. जिगाव प्रकल्पातील गावांचे पूनर्वसन तातडीने पूर्ण करा. यावर्षी कमी पावसामुळे पाणी टंचाई निर्माण होवू शकते. त्याअनुषंगाने पाणी साठविण्याचे नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा आधार ठरत आहे. त्यामुळे सततचा पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाई रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिककर्जाच्या वेळी सीबिलची अट रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज मिळण्यासाठी बँकांना सूचना देण्यात याव्यात. जलजीवन मिशन अंतर्गत  कामे तातडीने मार्गी लावा. या योजनांबाबत येणाऱ्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात यावी. कामे योग्य पद्धतीने होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. कामे योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याशिवाय देयक अदा करण्यात येऊ नये.


भारतनेट प्रकल्पातंर्गत ग्रामपंचायत पर्यंत इंटरनेट जोडणी असल्याबाबत खात्री करावी. कामचुकार करणाऱ्या संबधितावर कडक कारवाई करा. ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट जोडणी देवून नागरीकांना डिजीटल सुविधा पुरवाव्या. महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सबल करण्यासाठी  त्यांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणात तयार केलेल्या साहित्याचे पॅकीग, मार्केटिगचे सविस्तर माहिती द्या. बचत गटाच्या उत्पादित मालाना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी विक्रीसाठी योग्य जागा उपलब्ध करुन द्यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतून दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी दिल्या.


अंगणवाडीच्या माध्यमातून देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा तपासावा. सँपल नुसार पोषण आहार देण्यात येतो की नाही, नियमानुसार     पोषण आहाराचे वजन आहे किंवा नाही याची संबंधित विभागाने तपासणी करावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. शाळांना मानव विकास मिशनमधून साहित्य वाटप करण्यात आले आहे. या साहित्याचा दर्जा तपासावा. साहित्य निकृष्ट असल्यास संबंधीत पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी, असे आदेशही खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले.


जिल्ह्यात मनरेगा योजनेतून कामांची संख्या वाढवावी. त्यासाठी 60 : 40 चा रेशो जिल्हा, तालुका स्तरावर ठेवावा. अकुशल कामाची संख्या वाढवून यामधून ग्रामपंचायत भवन, शाळा खोल्या, तलाठी कार्यालय, अंगणवाडी बांधकाम सारखी कामे करावी. यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची मर्यादा नाही. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाची कामे वाढवावी. तसेच जिल्या कतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा, असा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दिशा समितीच्या बैठकीत दिल्या.  


बैठकीला प्रकल्प संचालक श्री. इंगळे यांनी माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments