जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा आपत्ती प्रसंगी सदैव सज्ज रहा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
आपत्ती प्रसंगी
सदैव सज्ज रहा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा (जिमाका) दि.25:- कोणतीही
आपत्ती ही सांगून येत नाही हे जरी खरे असले तरी आपत्ती घडल्यानंतर शासकीय
यंत्रणांनी आपत्तीप्रसंगी सदैव सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण
पाटील यांनी आज आढावा बैठकीत दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित
करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय
अधिकारी रामेश्वर पुरी, दिनेश गिते, राजेंद्र जाधव, विविध विभागाचे विभाग प्रमुख, गटविकास
अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पाटील
यांनी निर्देश दिले की, रुग्णालयातील फायर संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करुन
त्याबाबतचे ऑडीट करुन घ्या. कामात हयगय करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केल्या जाईल. जिल्ह्यातील
जूने पुल, इमारती तसेच जिल्हा परिषद व
लघुपाटबंधारे यांच्या अधिनस्त असलेल्या धरणाचे ऑडीट करुन घ्यावे. त्याबाबतचा अहवाल
जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे.
जिल्ह्यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील मोठे व लघु प्रकल्पांचा
संकल्पीत पाणीसाठा मर्यादीत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा वापराचे नियोजन करावे. कमी
पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. सिचंनासाठी
ठिबक व तुषार सिंचनाचा वापराबाबत जनजागृती करावी. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पाण्याचा
वापर काटकसरीचे नियोजन आतापासून करा. अपघात व नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सदैव तत्पर
राहण्यासाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करावे. यासाठी प्रत्येक तालुक्यात हॅलीपॅडची
सुविधा तयार करा. तसेच सर्व विभागाची माहिती अद्यावत करुन त्याची माहिती नागरिकांपर्यंत
पोहोचवावी, असे निर्देश यावेळी दिले.
समृद्धी महामार्गावर
अपघात रोखण्यासाठी विविध उपायोजना करावे. महामार्गावर प्रवेश देण्याआधी वाहनांची
तपासणी करुन त्यांचे समुपदेशन करावे. तसेच अपघात कमी करण्यासाठी रस्त्याचे दुरुस्तीचे
कामे प्राध्यानाने हाती घेऊन ते पूर्ण करावे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना
करावे, असेही निर्देश डॉ. पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.
0000
Comments
Post a Comment