DIO BULDANA NEWS 03.10.2023

 




अंमली पदार्थ विरोधात एकत्रित कारवाई करावी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 3 : अंमली पदार्थांच्या आहारी प्रामुख्याने युवा वर्ग जात आहे. यामुळे एक पिढीचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने गांजाविरोधात कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे समाजातील विविध घटकांवर परिणाम होत असल्याने याविरोधात एकत्रित कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात आज, दि. 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांच्यासह अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी गेल्या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईची माहिती घेतली. जिल्ह्यात गांजा व्यतिरिक्त इतर अंमली पदार्थांची माहिती घेतली. जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात गांजाची शेती होत असल्यास कृषि विभागाने याबाबत पोलिस विभागाला माहिती द्यावी. शंका आल्यास पोलिस आणि कृषि विभागाने याबाबत वारंवार पाहणी करावी. गांजाची वाहतूक रोखण्यासाठी इतर राज्य आणि जिल्ह्यातून येणारे रस्त्यावर तपासणी नाके उभारण्यात यावे. शहरी भागात दाटीवाटीच्या वस्तीमध्ये अंमली पदार्थ आढळून आले आहे. त्यामुळे या भागावर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

अंमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी प्रामुख्याने निर्जन स्थळे, बगीचे शोधले जातात. याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी. अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याचे प्रमाण विद्यार्थी वर्गात जादा आहे. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाच्या ठिकाणी तपासणी करण्यात यावी. शाळा परिसरात विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्याजवळ पदार्थ आढळत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी. अंमली पदार्थ सेवन केलेले विद्यार्थी आढळून असल्यास त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन अंमली पदार्थ मिळण्याच्या ठिकाणाची माहिती घ्यावी.

अंमली पदार्थ विरोधात जनजागृती करावी. प्रामुख्याने विद्यार्थी आणि युवा वर्ग यामध्ये व्यवसनाधिन होणार नाही, यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांची एकत्रितरित्या बैठक घेण्यात येईल. यातून अंमली पदार्थ विरोधात कारवाई करणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.

00000000




लोकशाही दिनात पाच तक्रारींचा निपटारा

बुलडाणा, दि. 3 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज, दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या लोकशाही दिनात पाच तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

आजच्या लोकशाही दिनात किशोरकुमार देशमुख, मोतीराम पाटील, संदिप नरोटे, शिवाजी सपकाळ, नितीन देशपांडे या पाच तक्रारदारांनी अर्ज सादर केले. लोकशाही दिनात प्रामुख्याने अतिक्रमण काढणे संदर्भात तक्रारी आल्या. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याबाबत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात यावे. याबाबत त्यांना 15 दिवसात कारवाई करावी. अतिक्रमण हटविले नसल्यास ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकशाही दिनात प्रामुख्याने जिल्हा परिषदेशी संबंधित तक्रारी करण्यात आल्या. याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले. या निवेदनावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

000000




हिवरा आश्रम ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य शिबीर संपन्न

बुलडाणा, दि. 3 : विवेकानंदनगर हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील स्वामी विवेकानंद संस्थेत ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरीकांचे कायदे आणि नियम याबाबत रविवार, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी शिबीर पार पडले.

आर. बी. मालपाणी अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून विवेकानंदनगरच्या सरपंच निर्मला गिऱ्हे, प्रमुख पाहूणे म्हणून समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, विवेकानंद आश्रमचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित धांडे, समाज कल्याण निरीक्षक श्री. जाधव आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त सार्वजनिक पदयात्रा प्रभात फेरी, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा गौरव करण्यात आला. तसेच आरोग्य शिबीर, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी डॉ. अनिता राठोड यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी कायदे आणि योजनाविषयक बाबींची माहिती दिली. वृद्धांचे हक्क, ज्येष्ठ नागरीकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, ज्येष्ठ नागरीकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय या‍ विषयावर संपूर्ण चर्चा सहभागी पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठांनी शोधावयाच्या आनंदाच्या वाटा यामध्ये असणारी भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. तसेच हिवरा आश्रम येथे सामाजिक न्याय व विभाग आणि संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी रोगनिदान आणि ज्येष्ठ नागरीकांना औषधाचे वितरण करण्यात आले.

00000

सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 3 : सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे दि. 4 आणि 5 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. श्री. वळसे-पाटील हे दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आगमन व मुक्काम करतील. दि. 5 सप्टेबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमरावती विभागातील सहकार विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 1.15 वाजता राष्ट्रवादी भवन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेऊन बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहतील. त्यानंतर श्री. पाटील सायंकाळी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण करतील.

00000

जिल्ह्यात साडेअठराशे घरावर वीज निर्मिती

ग्राहकांना रूफ टॉप सोलरमधून स्वत:साठी वीजनिर्मितीची संधी

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. ३ : महावितरणच्या रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १ हजार ८६० घरावर सौर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जात आहे. राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले आहे. महावितरण यापुढेही ही मोहीम चालू ठेवणार असल्याने जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते. छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून वीज ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

असे आहे अनुदान ;

सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला ३ किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे ४३ हजार रुपये ते ५६ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते.

 हाऊसिंग सोसायटीला अनुदान मिळते :

वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते. हाऊसिंग सोसायट्यांना ५०० किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प बसविता येतो व सार्वजनिक सुविधेसाठीच्या या प्रकल्पांना प्रति किलोवॅट ७२९४ रुपये अनुदान मिळते.

जिल्ह्यात १८६० घरावर होत आहे वीज निर्मिती :

जिल्ह्यातील १ हजार ८६० ग्राहकांनी महावितरणच्या रूफ टॉप योजनेचा लाभ घेत स्वत:च आपल्या छतावर वीज निर्मिती करत आहे. त्यामुळे त्यांचे वीज बिल शुन्यापर्यंत कमी झाले आहे. शिवाय तयार झालेली शिलकीची वीज महावितरणला विकण्यात येते.

महावितरण सहकार्य करणार :

रूफ टॉप सोलर योजनेचा सर्वसामान्यांनीही लाभ घ्यावा यासाठी महावितरणकडून प्रयत्न करण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.

 

सुरेंद्र कटके, अधीक्षक अभियंता.

000000

जिल्ह्यात १३ ऑक्टोंबरपर्यंत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम

बुलडाणा, दि. 4 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. यावर्षी हा कार्यक्रम दि. 13 ऑक्टोबरपर्यंत सक्रीय क्षयरूग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

कार्यक्रमात क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान आणि क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. यासाठी संशयित क्षयरुग्णाचे रोगनिदान शासकीय आरोग्य संस्थेत करण्यात येते. क्षयरुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेतात. केंद्र सरकारतर्फे या क्षयरुग्णांचे नोटिफिकेशन शासनाकडे करण्यासाठी अधिसूचना जारी केली. यामुळे काही प्रमाणात क्षयरुग्ण नोंदणीमध्ये अल्पशी वाढ झाली आहे. फुफुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे.

अद्यापही क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटी द्वारे शोधून काढण्यासाठी दि. १३ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यामध्ये मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेमुळे क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढणे, तसेच समाजामध्ये क्षयरोगाबद्दल जनजागृती होऊन क्षयरोगाचे निदान लवकर होण्यास मदत होईल. सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी २ लाख ९४ हजार ५४० लोकसंख्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात २६४ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच ४९ पर्यवेक्षक आणि आशा सेविका एकूण ५७७ कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

क्षयरोगाचे निदान होण्यापासून अद्याप वंचित असणाऱ्या सर्व क्षय रुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मोहीमेत जोखमीचे क्षेत्र, ठिकाणी गृह भेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधणे. त्यांची थुंकी नमुने तपासणी, एक्स-रे आणि आवश्यकतेप्रमाणे इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे अपेक्षित आहे. यासाठी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कर्मचारी त्यांचे भागधारक अशासकीय संस्था तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग यांची पथके निवडलेल्या भागात घरोघरी संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. मोहीमेदरम्यान गरजू व्यक्तींनी संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणाऱ्या भागामध्ये गृहभेटीद्वारे घरातील व्यक्तींशी संवाद साधणे, पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्‍लेटद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्यात येत आहे.

विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील वंचित घटक झोपडपट्टीपर्यंत पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात, असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटित कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृध्दाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशावर्कर, आंगणवाडी सेविका तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवक हे गृहभेटीद्वारे संशयित क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करणार आहे. गृहभेटी दरम्यान पथक सदस्य निश्चित केलेल्या सर्व घरांना भेटी देऊन घरात असलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग लक्षणांविषयी माहिती घेणार आहे. क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीची थुंकी नमुना गोळा करुन तपासणीकरिता जवळच्या प्रयोगशाळा पाठविण्यात येणार आहे.

क्षयरोगाची लक्षणे ही दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असणे, तसेच दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा ताप असणे, मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट असणे. थुंकीवाटे रक्त पडणे, छातीत दुखणे व मानेवरील गाठ, यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असणे, यापैकी कोणतेही लक्षणे असल्यास सदर व्यक्तीने तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत थुंकीनमुना तपासणी, क्ष-किरण तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सीबीनॅट मशीनद्वारे तपासणी व्यवस्था उपलब्ध आहे. निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांना मोफत उपचार सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध आहे. क्षयरोग विरोधातील लढ्यात सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. विशेष मोहिमेद्वारे अद्याप निदान झाले नसलेल्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येणार आहे. या मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. डी. व्ही. खेरोडकर यांनी केले आहे.

00000

 

सहकार विद्या मंदिरात शुक्रवारी दिव्यांग शिबिराचे आयोजन

 

बुलडाणा, दि. 3 : जिल्हा रुग्णालयात नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी नेत्र, मतिमंद, मनोरुग्ण व कान, नाक, घसा संबंधित दिव्यांग बोर्ड सुरु असते. मात्र शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी बुलडाणा येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी’ अभियान असल्यामुळे हे शिबिर सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक भवनात होणार आहे.

शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजीचे नेत्र, मतिमंद, मनोरुग्ण व कान, नाक, घसा संबंधित दिव्यांग तपासणीबाबतचे शिबीर जिल्हा रुग्णालयाऐवजी सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग तपासणीकरीता सहकार विद्या मंदिरातील सांस्कृतिक सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000

Comments