मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन

 

मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विशेष ग्रामसभा व शिबीरांचे आयोजन

            बुलढाणा दि. 31 (जिमाका):-  निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा तसेच मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी दिली आहे.

 

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने दि. 1 ते 7 नोब्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभामध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

 

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी निवडणूक विभागाव्दारे शनिवार दि. 4 नोव्हेंबर, रविवार दि. 5 नोव्हेंबर, सोमवार दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 ह्या चार दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर, शाळा, महाविद्यालयाचे ठिकाणी, शासकीय,  निमशासकीय कार्यालयांमध्ये विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी जिल्ह्यामध्ये तहसिल व मंडळ स्तरावर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 27 ऑक्टोंबर रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानंतर पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत    दि. 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत सर्व विधानसभा मतदार संघ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे स्तरावर दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. प्राप्त दावे व हरकती निकालात काढून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करावी. तसेच दि. 1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण होईल अशा नागरीकांनी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी.

 

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 100 टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार दिले जाणार आहेत. नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (Toll Free) क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरीकांनी ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करण्यासाठी Voterportal.in व Voter helpline app चा वापर करुन मतदार नोंदणी, वगळणी व दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

Comments