लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 


लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

·         २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन

·         जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा

 

बुलढाणा, दि.16 (जिमाका): येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी  योग दिनाच्या तयारीसंदर्भात अधिकाऱ्यांची सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार , उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. या बैठकीत योग दिनाच्या आयोजनासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी डॉ.पाटील म्हणाले की, शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतील अशा मोकळ्या आणि सहज पोहोचता येतील अशा ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करावेत. अशा स्थळांची पाहणी करून आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. लोकप्रतिनिधी आणि संस्थांचा समावेश आवश्यक जिल्ह्यातील आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, धार्मिक प्रतिष्ठाने, स्वयंसेवी संस्था आणि प्रतिष्ठित नागरिक यांना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. योग हा जीवनशैलीचा भाग व्हावा यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

 

योग दिनासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी योग प्रशिक्षकांची नेमणूक करावी, तसेच शहरासह ग्रामीण भागातील जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून योगविषयी जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

आरोग्यदायी वातावरण निर्मितीचा उद्देश

योगा ही फक्त एक कृती नसून आरोग्यदायी जीवनशैलीकडे नेणारी वाट आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित योगाभ्यास करावा यासाठी सजगता निर्माण करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी डॅा.पाटील यांनी स्पष्ट केले.

 

बैठकीच्या अखेरीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाने आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या