चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन

 




चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 2 :  विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत चिखली तालुक्यातील मौजे सवना येथे नुकतेच शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमात 'ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी'चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे, शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख, डॉ. सुकेशनी वने, डॉ. भारती तिजारे, श्री. प्रवीण देशपांडे, कोकिळा भोपळे, तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद (भाकृअनुप) चे शास्त्रज्ञ डॉ. बेनुकांथा दास, तालुका कृषि अधिकारी कंकाळ, कृषि अधिकारी श्री. धांडे, पर्यवेक्षक श्री. सिताफळे, तसेच आत्मा योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. खारोळे उपस्थित होते.

विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत 1 जून 2025 रोजी चिखली तालुक्यातील वळती, सवना, चांदई, धोडप आणि बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर, देऊळघाट, उमाळा, गिरडा, मढ गावांमध्ये अभियान राबवले गेले. या अभियानाचा खरीप हंगामात सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. रोज आठ ते दहा गावांमध्ये वैज्ञानिकांचे पथक रथ यात्रेद्वारे विविध ठिकाणी पोहोचत असून शेती आणि विज्ञान यामधील दरी कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ICAR चे शास्त्रज्ञ थेट गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. प्रयोगशाळेतील ज्ञान प्रत्यक्ष शेतात पोहोचवून शेतीला वैज्ञानिक दृष्टिकोन देणे आणि कृषी क्षेत्र विकसित करणे हा या अभियानाचा उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अमोल झापे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

कार्यक्रम IFFCO च्या सहकार्याने आणि कल्याण अटकळे (प्रक्षेत्र अधिकारी), शंतनू चवंड, योगेश पाटील (मार्केटिंग अधिकारी) यांच्या समन्वयातून पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सवना येथील प्रगतशील शेतकरी व पत्रकार विजय भुतेकर यांचे विशेष योगदान राहिले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या