पोलिस भरतीसाठी शनिवारी लेखी परीक्षा
*लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र
बुलडाणा, दि. 09 : बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मधील रिक्त असलेल्या 125 पोलिस शिपाई पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा शनिवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदिरात घेतली जाणार आहे.
पोलीस दलातील 125 पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठी एकूण 8 हजार 531 आवेदन अर्ज प्राप्त झाले. यातील 5 हजार 960 उमेदवार प्रत्यक्ष शारीरिक व मैदानी चाचणीस हजर राहिले. या मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण घेऊन 3 हजार 342 उमेदवार उत्तीर्ण झाले आहे. यातून प्रवर्ग निहाय 1:10 याप्रमाणे लेखी परीक्षेसाठी 1 हजार 366 उमेदवार पात्र ठरले आहेत.
या पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना सुचना देण्यात आल्या आहेत. पोलिस शिपाई पदाकरीता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. 19 जून ते 1 जुलै 2024 या दरम्यान उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांच्या गुणाच्या गुणवत्तेनुसार संबंधीत प्रवर्गातील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणात पात्र असलेले एकूण 1 हजार 366 उमेदवारांची निवडयादी buldhanapolice.gov.in, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील नोटीस बोर्ड आणि पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची परीक्षा केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी 3 तास अगोदर म्हणजेच सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी आवेदन अर्ज, प्रवेश पत्र व स्वतःच्या ओळखीसाठी लगतचा फोटो असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान कार्ड सोबत आणावे लागणार आहे.
लेखी परीक्षा ही पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे होणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही, तसेच उमेदवारांनी प्रवेश करण्यापूर्वी मोबाईल, इलेट्रॉनिक्स किंवा तत्सम प्रकारची उपकरणे आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रामध्ये घेऊन येऊ नये किंवा सोबत बाळगण्यात येऊ नये. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यन्वीत राहणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभन, अमिषाला बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती प्रत्यक्ष अवगत करुन द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
00000
खेळाडूंनी माहिती सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 09 : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडूंची माहिती संकलीत करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंनी माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळणारे खेळाडू, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धा असतील अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करणे, आर्थिक मदत मिळण्याकरीता क्रीडा संचालनालयामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे.
अद्यावत सुरु असलेले ट्रेनिंग, खेळाडूंची अद्यापपर्यंतची क्रीडा कामगिरी, पदके, उच्चांक गाठली असतील, त्याबाबतची माहिती संकलीत करण्याचे काम, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. शासनामार्फत पात्र खेळाडूंना विविध योजनांचा लाभ द्यायचा असल्यास त्यासाठी ते पात्र असतील, त्यांचे प्रस्ताव तयार करून संचालनालयाकडे पाठवणे गरजेचे आहे. तसेच वयोवृद्ध खेळाडूंना मानधन, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना रोख बक्षिसे, आर्थिक सहाय्य या प्रचलित योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. काही खेळाडू परदेशात असल्यास त्यांचे प्रशिक्षक व्यवस्थापक, कुटुंबीय यांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात असणे आवश्यक आहे. संबंधीत खेळाडूंचा शासनामार्फत सत्कार, अडचणी असल्यास विचारपूस करणे आदीची माहिती कार्यालयामार्फत संकलीत करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू, आशियाई स्पर्धा, ऑलिंपिक, कॉमनवेल्थ गेम्स किंवा त्याखालील जागतिक आशियाई स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी तसेच त्यांचे प्रशिक्षक अथवा पालकांनी माहिती कार्यालयास द्यावी, तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.
00000
शेतकऱ्यांनी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 09 : नाफेडने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाफेडने ४ जानेवारी २०२४ पासून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरू केले आहे. शेतकऱ्यांना नाफेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेता यावा याकरीता सदर पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर नाव नोंदणी करून योजनांचा लाभ घेणे शक्य होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने नाफेडमार्फत दरवर्षी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी केली जाते. हंगाम २०२३-२४ मध्ये कडधान्य आणि तेलबियांचे बाजारभाव हे आधारभूत दरापेक्षा जास्त असल्यामुळे हमीभावाने खरेदी झाली नाही. मात्र हंगाम २०२४-२५ मध्ये राज्यात नाफेडच्या वतीने मका, तूर, चना, मूग, उडिद आणि सोयाबीन खरेदीकरीता शेतकऱ्यांनी नोंदणी करुन खरेदी करण्याबाबत नियोजन करावे. ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणीबाबत अडचणी आल्यास अथवा अधिक माहितीसाठी प्रतिनिधी दिनेश देशमुख संपर्क क्रमांक ९७६३३४४७१० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000000
लेख
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस
फादर ऑफ ब्लू रेवोल्यूशन डॉक्टर हिरालाल चौधरी
भारताच्या एकूण जीडीपीच्या 1 टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो. हे सर्व शक्य झाले आहे केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळे. ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्ल्यू रेवोल्यूशन डॉक्टर हिरालाल चौधरी.
भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व समुदायामुळे प्रसिद्ध आहे. याच भागातील एक राज्य आसाम; खरंतर हे राज्य चहाच्या मळ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. आसाम मधील एक ठिकाण शिलाटी येथे सन 1921 मध्ये डॉ. हिरालाल चौधरी यांचा जन्म झाला. शिलाटी हे ठिकाण सध्या बांगलादेशात श्रीहट्टा नावाने ओळखले जाते. श्रीहट्टामधील सुरमा घाटीला लागून असलेल्या कुबाजपूर या छोट्या गावात गिरीशचंद्र चौधरी या सिव्हील इंजिनियरच्या घरात 21 नोव्हेंबर 1921 रोजी यांचा जन्म झाला.
अत्यंत प्रतिभाशाली विद्यार्थी असलेले हिरालाल चौधरी यांनी सन 1941 मध्ये आपले बीएससी शिक्षण पूर्ण केले. सन 1943मध्ये कलकत्ता विद्यापीठांतर्गत त्यांनी झूलॉजी या विषयात एमएसस्सी पूर्ण केल. त्यानंतर सिलट येथील माणिकचंद महाविद्यालयात जैवविज्ञानिक विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. सन 1947 मध्ये भारत-पाक फाळणीदरम्यान त्यांना नोकरी गमवावी लागली. सध्याच्या बांग्लादेशात स्थित असलेले श्रीहट्टा हे तत्कालीन पूर्व पाकिस्तानात येत असे. सन 1948 मध्ये ते सेंट्रल इनलॅण्ड फिशरीज रिसर्च इंस्टीट्यूट, बरकपूर येथे कनिष्ठ संशोधन सहायक पदावर रुजू झाले.
एके दिवशी बरकपूर येथे राहत असताना गंगेच्या किनारी आढळणाऱ्या मासळीचे फुगलेले पोट दिसून आले. ते पोट दाबताच त्यातून पारदर्शी अंडे बाहेर आले. निरीक्षणाकरीता त्यांनी ही अंडी एका भांड्यात त्यांनी जमा केली आणि निरीक्षणादरम्यान डॉक्टर चौधरी यांना कार्प माशांच्या प्रेरित प्रजननाची संकल्पना सुचली. कार्प प्रजाती आशिया व युरोप खंडातील मूळ निवासी मत्स्य प्रजाती मानली जाते. तलावातील बंदिस्त प्रणाली कार्प प्रजातीच्या प्रजननासाठी प्रतिकूल असल्याने अशा वातावरणाचा परिणाम मास्यांच्या पियुषिका ग्रंथी व जननग्रंथीवर होत असे. या दोन्ही ग्रंथीच्या अपुऱ्यास्त्रावामुळे मास्यांचे बंदिस्त प्रणालीत प्रजनन होत नसे. त्याकाळात कार्प प्रजातीच्या संवर्धनाकरिता संपूर्णपणे नैसर्गिक बिजावर अवलंबून राहावे लागत असे. मत्स्य बीज उत्पादनाची समस्या सोडविण्याकरीता प्रेरीत प्रजननाच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला. या शोधामुळे भारतात आज मोठ्या प्रमाणात भुजलाशयीन मत्स्योत्पादन घेतले जाते. भूजलाशयीन मत्स्य प्रजातीमध्ये कार्प मासळीला जागतिक बाजारपेठेत अनन्य साधारण महत्व आहे.
सर्वप्रथम हा प्रयोग ‘स्मॉल मड गोबी प्रजातीच्या मास्यावर करण्यात डॉ. चौधरी यांना यश मिळाले. त्याच वेळी सन 1950मध्ये त्यांची वरीष्ठ संशोधन सहायक या पदावर ‘सेंट्रल इनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पॉडकल्चर सेक्शनमध्ये पदोन्नतीने नियुक्ती झाली. जेथे ते डॉ. अलीकुन्ही यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. डॉ. अलीकुन्ही यांनी डॉ. चौधरी यांना त्यांच्या प्रयोगाचे कार्य करण्याकरीता नेहमी प्रेरणा दिली. त्याचबरोबर अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीतील मत्स्य प्रेरीत प्रजनन या विषयात पारंगत असलेल्या जगभरात प्रख्यात डॉ. स्विंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांना अमेरिकेत पाठवले. सन 1955 मध्ये पियुषिका ग्रंथीच्या अर्कचा मत्स्य प्रजननावर होणारा परिणाम या विषयाच्या शोधनिबंध लिहिला. या निबंधाच्या सहाय्याने अमेरिकेतील अबुरान युनिव्हर्सिटीमधून मत्स्यपालन व्यवस्थापन या विषयातून मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. त्यानंतर ते भारतात परतले. भारतात परतल्यानंतर सन 1955-56 मध्ये त्यांनी देशातील काही मुळनिवासी प्रजातींच्या माशांचे प्रेरीत प्रजनन यशस्वीरित्या पूर्ण केले. पुढे डॉक्टर आलीकुन्ही यांनी सेंट्रल इनलॅंड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रेरित प्रजानाद्वारे मत्स्यबीज निर्मिती या विषयावर ओरिसा या ठिकाणी एक मोठा प्रकल्प राबवला व दि. 10 जुलै 1957 रोजी या दोन शास्त्रज्ञांना प्रेरीत मत्स्य प्रजननाच्या प्रयोगात यश मिळाले. त्यानंतर भारतातील मत्स्य शेतीचा चेहरा मोहरा बदलला. डॉक्टर हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नीलक्रांतीची सुरुवात ठरली.
प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेल्या प्रेरीत प्रजननातून तयार झालेल्या मत्स्य जिऱ्यांना यशस्वीरित्या अर्ध बोटुकली व त्यानंतर बोटूकली आकारापर्यंत विकसित करण्यात आले. सन 1958 मध्ये डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी जगात सर्वप्रथम लेबिओ, सिऱ्हीनस व कटला सारख्या मत्स्य प्रजातींचे यशस्वीरित्या प्रजनन करून मोठ्या प्रमाणात मत्स्य बीज निर्मिती करण्याची संकल्पना जगापुढे मांडली. एवढेच नव्हे तर हे तंत्र मत्स्य कास्तकारांपर्यंत तातडीने पोहचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तेथील स्थानिक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. त्यांचा मदतीने अत्यंत अल्प कालावधीत हे तंत्रज्ञान सर्वसामान्य मत्स्य कास्तकारांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले. डॉक्टर चौधरी यांच्या यशस्वी प्रयोगामुळे भारतातील भूजलाशयिन मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे.
पुढे डॉक्टर हिरालाल चौधरी यांची पदोन्नती मत्स्य व्यवसाय विस्तार अधिकारी या पदावर 1959 मध्ये झाली. त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटीने 1961 मध्ये आचार्य पदवी प्रदान केली. या पदवी अभ्यासक्रमात त्यांनी ‘पियुषिका ग्रंथी अर्काचा मासळीच्या प्रजननावर होणारा परिणाम’ हा शोधनिबंध लिहिला. त्यानंतर सन 1971 ते 1975 मध्ये त्यांनी भुवनेश्वरस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर येथे कार्य केले.
1975 मध्ये पॅसिफिक सायन्स काँग्रेस दरम्यान जपानचे प्रख्यात डॉ. कुरोनुमा यांनी त्यांना फादर ऑफ इंड्युस्ड ब्रीडिंग हा किताब बहाल केला. त्याचबरोबर डॉक्टर चौधरी यांना गॅमा-सिग्मा-डेल्टा पुरस्कार, चंद्रकला होरा मेमोरियल गोल्ड मेडल, रफी अहमद किदवाई, गोल्डन की, वर्ल्ड ॲक्वाकल्चर अवार्ड आदी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले.
1976 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर डॉक्टर चौधरी यांनी फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन, साउथ ईस्ट एशियन फिस्टीज डेव्हलपमेंट सेंटर सारख्या अनेक महत्त्वपूर्ण संस्थांबरोबर काम केले.
डॉक्टर हिरालाल चौधरी यांना मिळालेले यश भारतातील नील क्रांतीच्या सुरुवातीस कारणीभूत ठरले. सन 2001 मध्ये डॉक्टर हिरालाल चौधरी यांच्या कार्यास सन्मानित करण्यासाठी भारत सरकारतर्फे 10 जुलै हा दिवस ‘राष्ट्रीय मत्स्य - शेतकरी दिवस’ म्हणून घोषित करण्यात आला. अशा महान व्यक्तीचे कार्य मत्स्य व्यवसायाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या चीरस्मरणी रहावे म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.
अमिता रा. जैन
सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी
अमरावती
00000
No comments:
Post a Comment