Monday, 29 July 2024

DIO BULDANA NEWS 29.07.2024

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 25 कोटीचे तडजोड शुल्क वसूल

बुलडाणा, दि. 29 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघसच्या वतीने शनिवार, दि. २७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण ५७ हजार २६४ प्रकरणे ठेवण्यात आली. यातील एकूण ७ हजार १५२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच एकूण २४ कोटी ९४ लाख ३६ हजार ४६७ रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

लोकअदालतीमध्ये बॅंक, ग्रामपंचायत, नगर परिषद, तसेच वाहतूक शाखा, दूरसंचार निगम आणि विद्युत वितरण कंपनी यांचे दाखलपूर्व ४९ हजार ३७३ प्रकरणे दाखल झाले. यातील ६ हजार १६५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. याचे तडजोड शुल्क २ कोटी ५८ लाख ५५ हजार २६१ रूपये वसूल करण्यात आले. तसेच न्यायालयातील ७ हजार ८९१ प्रलंबित प्रकरणे लोकअदालीतमध्ये ठेवण्यात आली. यातील १ हजार ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात २२ कोटी ३५ लाख ८१ हजार २०६ रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायाधीश एस. एस. चंदगडे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर डी. पी. काळे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. मेंढे यांचे  पॅनल तयार करण्यात आले. सदर पॅनलवर अॅड. संदीप टेकाळे, अॅड. रत्नमाला गवई, अॅड. आर. एम. काशीकर यांनी सहाय्यक पंच म्हणून काम पाहिले.

लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नितीन पाटील, वरिष्ठ लिपीक व्ही. डी. बोरेकर, लेखापाल नितीन लांडे, कनिष्ठ लिपिक एस. एन. मुळे, जी. पी. मानमोडे, ए. बी. अवचार, मनिषा साखरे, अनुराधा खडसान, यशोदा अवचार, व्ही. एस. मिलके, पी. एल. खर्चे यांनी पुढाकार घेतला.

000000

नागरिकांनी मतदारयादीतील नाव तपासण्याचे आवाहन

*मतदारयाद्यांचा सुधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

बु‌लडाणा, दि. 29 : निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा सुधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी मतदारयादीतील आपले नाव तपासावे, मतदारयादीत नाव नसल्यास मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारयाद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते 27 ऑगस्ट 2024 पर्यंतचा कार्यक्रम जाहिर केला आहे. शहरी तसेच ग्रामीण विभागातील सर्व बीएलओ आणि बीएलओ पर्यवेक्षक यांनी  मतदारयादीचे पुनरिक्षण कार्यक्रम व केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करायची आहे. मतदानकेंद्रांचे सुसूत्रिकरण करणे, मतदारयादीत सुधारणा करणे, तसेच बीएलओ पर्यवेक्षकांनी त्यांच्या अधिनस्त सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची पडताळणी करावी लागणार आहे. मतदानकेंद्र नादुरुस्त असल्यास पर्यायी मतदान केंद्रांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 2 ते 16 ऑगस्ट याकालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहे. मतदार यादी अंतिम दि. 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर यादी विधानसभा निवडणुकीसाठी उपयोगात आणली जाणार आहे. मतदारयादीत नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करावी. तसेच बीएलओ यांच्या घरभेटीवेळी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा बुलडाणा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी शरद पाटील आणि तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व्ही. एस. कुमरे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment