Wednesday, 10 July 2024

DIO BULDANA NEWS 10.07.2024

 पालिका क्षेत्रात लाडकी बहिण योजनेसाठी शिबीर घ्यावीत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बु‌लडाणा, दि. 10 : राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. नागरी भागात महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नगर पालिका क्षेत्रात शिबीरे आयोजित करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्याधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, नगर पालिकेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी नगर पालिकेच्या कार्यालयात कायमस्वरूपी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नारीशक्ती ॲप, वेबसाईट, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुविधा केंद्राची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पंचायत समित आणि ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामाध्यमातूनही अर्ज सादर करता येणे शक्य होणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सुविधा केंद्र आणि जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शिबीरे घेऊन योजनेचे अर्ज भरून घेण्यात यावे. नागरी भागात घेण्यात येणाऱ्या शिबिराचे नियोजन करावे. त्यानुसार वेळापत्रक तयार करून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया करावी.

एकत्रितरित्या अर्ज भरल्यामुळे फायदा होणार आहे. मोठ्या प्रमाणावर अर्ज भरून घेण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक मोठा कॅम्प आयोजित करून याठिकाणी येणाऱ्या सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्यात यावे. याठिकाणी शासकीय यंत्रणांनी उपस्थित राहून अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करावी. नगर पालिका क्षेत्रात अर्ज करण्यासाठी अडचण आल्यास मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.

00000

जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

बु‌लडाणा, दि. 10 : जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेसाठी दि. 11 जुलै 2024पर्यंत ऑफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर, ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागापूर्वीच subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू आणि संघांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूकडे जन्म दाखला, आधारकार्ड, खेळाडू ओळखपत्र, पासपोर्ट सर्व मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यात खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.

सुब्रतो मुखर्जी स्पोटर्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्यातर्फे 2024-25 या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर मुले, ज्युनिअर मुले, मुली या क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम प्राप्त आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूकरीता सबज्युनिअर 15 वर्षाआतील मुले क्रीडा स्पर्धा मुले वयोगट दि. 1 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले व मुली दि. 1 जानेवारी 2008 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

सुधारीत कार्यक्रमानुसार जिल्हास्तर स्पर्धांचे आयोजन हे दि. 12 जुलै 2024 रोजी 15 वर्षाआतील मुले सबज्‍युनिअर, दि. 13 जुलै 2024 रोजी 17 वर्षाआतील मुले ज्युनिअर, दि. 12 जुलै 2024 रोजी 17 वर्षाआतील मुली ज्युनिअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश अर्जावर खेळाडूचे संपूर्ण नाव, जन्म तारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव, पत्ता, शाळेचा युडायस क्रमांक, खेळाडू स्वाक्षरी, रजिस्टर नंबर, मोबाईल क्रमांक, संस्था प्रमुख, मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने पाठवावा लागणार आहे. तसेच 15 वर्षाआतील खेळाडूकरीता वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, संघांनी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी करणे आणि subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन संघ, शाळांनी सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी मानद क्रीडा मार्गदर्शक मनोज श्रीवास यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

000000

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

बुलडाणा, दि. 10 : मिरज येथील शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात संगणक आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगसाठी मोफत प्रशिक्षण देते. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल स्तरावरील फिक्की अवार्ड प्राप्त झालेला आहे. सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत्‍ प्रवेश देणे सुरू आहे. संस्थेत सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एमएस ऑफीस, मोटार अँड आर्मेचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज अभ्यासक्रम शिकविले जातात. यासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असून केवळ दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

संस्थेत प्रशिक्षण कालावधीत राहणे, जेवण आणि प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायाकरीता बीज भांडवल योजना आदी सोयी सवलती आहेत.

प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली पिनकोड 416 410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पुर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येणार आहे. गरजू दिव्यांगांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरित संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0233-2222908, 9922577561, 9595667936 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक यांनी केले आहे.

000000

बांधकाम कामगारांनी खोट्या अमिषाला बळी पडू नये

*कामगार विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या असंघटीत कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व विविध योजना लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी, बुलडाणा कार्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने केले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

कार्यालयातील कामकाजासाठी कोणत्याही खासगी प्रतिनिधी, अथवा एजंट, दलाल यांची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी वार्षिक केवळ एक रुपया शुल्क आकारण्यात येत असून, त्यांची रीतसर पावती देण्यात येते. या व्यतिरिक्त या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

बांधकाम कामगारांनी मंडळामार्फत वाटप सुरु असलेल्या गृहउपयोगी संच, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच तसेच इतर लाभासंबधीच्या कामकाजाकरीता कोणत्याही अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतणीकरण करुन घ्यावे. याबाबतीत फसवणूक झाल्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment