Wednesday, 31 July 2024

DIO BULDANA NEWS 31.07.2024



 सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न

बुलडाणा, दि. 31 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे तीस दिवसीय मोफत सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रमोद नामदास यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. प्रशिक्षणार्थीना मोबाईल टेलिफोनची मुलभूत तत्वे, मायक्रोप्रोसेसरची ओळख, सर्किट डायग्राम, सॉफ्टवेअर समस्या, स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये आदीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान यशस्वी उद्योजकांशी संवाद साधण्यात आला.

ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील बेरोजगार तरुण, तरुणी, पुरूष, महिला निवडून प्रशिक्षण देणे व स्वयंरोजगार उभारणीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आरसेटी संचालक संदिप पोटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक स्वप्नील गवई, श्रीकृष्ण राजगुरे, सहाय्यक मनिषा देव, प्रशांत उबरहंडे, कल्पना पोपळघट यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सहाय केले.

00000

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांना mahadbt.mahait.gov.in पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 25 जुलै 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संस्था, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विजाभज, इमाव, व विमाप्र जाती प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजाभज, इमाव व विमाप्र जाती प्रवर्गातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अर्ज तातडीने भरावेत. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज रिअप्लाय करण्यासाठी दि. 31 मार्च 2025 मुदतीत अर्ज रिअप्लाय भरण्यात यावे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी विजाभज, इमाव व विमाप्र जाती प्रवर्गातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर दि. 31 मार्च 2025 पर्यत अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालययाचे प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या विजाभज, इमाव, व विमाप्र जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी भरुन घ्यावे.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महावि्दयालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदनपत्रे भरण्याबाबत सूचना देण्यात यावी. महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

सोयाबीन पिकावरील किडीचे वेळीच नियंत्रण करावे

*कृषितज्ज्ञांचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : कृषि विज्ञान केंद्राच्या किड सर्वेक्षणात सोयाबीन शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादूर्भाव कमी प्रमाणात आढळून आला आहे. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडींचा उद्रेक टाळण्यासाठी सोयाबीन पिकावरील किड नियंत्रणासाठी उपयायोजना करण्याचे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.

जिल्ह्यात ज्याठिकाणी हलका पाऊस आहे आणि हलकी जमीन आहे, अशा ठिकाणी हुमणी अळीचा प्रादूर्भाव कमी अधिक प्रमाणात आढळला आहे. या किडीची अळी जमिनीत राहून पिकांच्या मुळावर हल्ला करून उपजीविका करते. त्यामुळे झाड वाळते. अंडी अवस्थेमधून अळी अवस्थेमध्ये आल्यानंतर ही कीड अळी अवस्थेत सुमारे ७ ते ९ महिन्यापर्यंत राहते. या किडीचे वर्षभरामध्ये एकच जीवनचक्र असून बहू पिकांच्या मुळांवर हल्ला करून ही उपजिवीका करते.

या किडीच्या नियंत्रणासाठी सद्यस्थितीत उपाययोजना करताना मेटारायाझियम अॅनिसोपली जैविक बुरशीचा वापर १० किलो प्रती हेक्टर या प्रमाणात जमिनीतून करावा किंवा उभ्या पिकामध्ये एका सरळ रेषेत हुमणी अळीमुळे मर होत असल्यास मेटारायझियम अॅनिसोपली जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून प्रादूर्भावग्रस्त भागात पिकाच्या मुळाजवळ आळवणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून हुमणीग्रस्त झाडाच्या मुळाजवळ आळवणी करावी.

खोड माशीची अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करून पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत शिरून आतील भाग पोखरून खाते. प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणत नुकसान होते. चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एक ते दिड सेमी अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते परिणामी चक्रकापाचा वरचा भाग सुकतो. खोड माशी आणि चक्री भुंगाची आर्थिक नुकसानीची पातळी सरासरी १० टक्के किडग्रस्त झाडे आहे.

खोड माशी आणि चक्री भुंगा या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याने या दोन्ही किडीचे नियंत्रणासाठी इथीयान ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्स्झाकार्ब १५.८ टक्के ६.७ मिली किंवा क्लोरनट्रेनिप्रोल १८.५० टक्के ३ मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिक बहारात आल्यावर सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या, पोखरणाऱ्या अळ्या यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवी उंटअळी, घाटे अळी व पाने पोखरणारी अळी या विविध किडींचा प्रादूर्भाव होत आहे. हा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाऊ नये, यासाठी या किडीच्या नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब १५.८ टक्के ६.७ मिली किंवा क्लोरनट्रेनिप्रोल १८.५० टक्के ३.० मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ टक्के ३.० मिली किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट १.९ टक्के ८.५ मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. ए. एस. तारू व विषय विशेषज्‍ज्ञ प्रवीण देशपांडे यांनी केले आहे.

000000

मानसेवी होमगार्डसाठी ऑनलाईन नोंदणी

बुलडाणा, दि. 31 : जिल्हा होमगार्डमधील अनुशेष भरू काढण्यासाठी मानसेवी होमगार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी यात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा होमगार्ड दलात 133 पुरुष आणि 115 महिला असे एकुण 248 मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरुन काढण्यासाठी मानसेवो होमगार्ड नोंदणी करण्यात‍ येत आहे. सदर होमगार्ड नोंदणी दि. 26 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार आहे. त्यासाठी दि. 30 जुलै ते 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

होमगार्ड नोंदणीची माहिती पत्रक, नियम व अटी बावत विस्तृत माहिती maharashtra.gov.in/mahahg/logl.php संकेतस्थळावर उपलब्ध आहे. होमगार्डमध्ये नोंदणी करु इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा, होमगार्ड नोंदणी पोलिस मुख्यालय कवायत मैदान बुलडाणा येथे घेण्यात येणार आहे, असे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कळविले आहे.

000000 

मेहकर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त मेहकर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरीता अर्ज सादर करावे, असे आवाह करण्यात आले आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरीता शालेय विभाग आठवीतील एससी 12, वाल्म‍िकी 1, विमाप्र 1, अपंग 1, अनाथ 1 असे एकूण 16 रिक्त असलेल्या जागा जातीनिहाय असलेल्या आरक्षणाने गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यासाठी अर्ज वाटप सुरु आहे. अर्जासोबत शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकित प्रत, मागील इयत्तेत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिकेची छायांकित प्रत, उत्पन्नाचा दाखला मुळप्रत, जातीच्या दाखल्याची छायांकित प्रत, रहिवासी दाखला, शाळेत प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड मुळप्रत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशित विद्यार्थिनींना सकाळी एकवेळ विनामुल्य नाश्ता, सकाळ व संध्याकाळ दोनवेळचे जेवण, विनामुल्य पलंग व अंथरुण-पांघरुणासह निवास व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, प्रत्येक खोलीमध्ये पंखे, शौचालय व गरम पाण्याच्या सुविधेसह स्नानगृह, दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता, गणवेशासाठी 2 हजार रुपये, अभ्यासिका, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे नियंत्रण, पिण्यासाठी शुद्ध व थंड पाणी आदी व्यवस्था करण्यात येते.

विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्जाचे विनामुल्य वाटप सुरु आहे. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, इरिगेशन कॉलनी, संताजीनगर, मेहकर येथील कार्यालयात सकाळी 7 ते सांयकाळी 7 या वेळेत संपर्क साधावा, असे मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल एस. पी. देखणे यांनी कळविले आहे.

000000




हिपॅटायटीसच्या नियंत्रणासाठी पंधरवडा साजरा

बुलडाणा, दि. 31 : राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यात जिल्हा रूग्णालयात जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, अतिरिक्त  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विश्वास खर्चे, माताबाल व संगोपण अधिकारी डॉ. मिलींद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण घोंगटे, डॉ. रामलाल वैराळकर, बालरोग तज्‍ज्ञ, डॉ.  हिवाळे,  जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्राची तायडे, नर्सिंग स्कुलच्या प्राचार्य श्रीमती खेडेकर, प्रमोद टाले, दिलीप नरवाडे, समन्वयक सचिन गणोरकर आदी उपस्थित होते.

प्रभात फेरीच्या माध्यमातून हिपॅटायटीस आजाराबद्दल माहिती व जागरुकता निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक, बॅनर द्वारे माहिती देण्यात आली. गजानन देशमुख यांनी प्रास्तविक केले. राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण डॉ.मिलींद जाधव व डॉ. रामलाल वैराळकर व प्रमादे टाले यांनी मार्गदर्शन केले.

0000000




तंबाखू नियंत्रण कायद्याच्या माहितीसाठी कार्यशाळा

बुलडाणा, दि. 31 : जिल्हा रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने जिल्हा नियोजन सभागृहात तंबाखू नियंत्रण कायद्याची माहिती देण्यासाठी आज जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. घोलप यांनी दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.

सदर कार्यशाळेला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लाटवाडेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, पोलिस उपनिरीक्षक श्री. काकडे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री. गिरके, प्रकल्प संचालक तथा मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगरचे सचिव अप्पासाहेब उगले, राज्य प्रकल्प अधिकारी डॉ. निकिता गायकवाड, महेंद्र सौभागे आदी उपस्थित होते

यावेळी श्री. उगले यांनी कोटपा कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शासकीय व निमशासकीय स्तरावर एकत्र येऊन कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा केली. विभागीय व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी गणेश उगले, प्रदीप तांदळे, जिल्हा सल्लागार लक्ष्मण सरकटे, सामाजिक कार्यकर्ते अर्चना आराख यांनी पुढकार घेतला.

00000


No comments:

Post a Comment