Thursday, 25 July 2024

DIO BULDANA NEWS 25.07.2024

 क्रीडा स्पर्धेबाबत आज ऑनलाईन प्रशिक्षण

बुलडाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, क्रीडा मार्गदर्शकांना क्रीडा स्पर्धेबाबत शुक्रवार, दि. दि. 26 जुलै 2024 रोजी ऑनलॉनईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तालुका ते राष्ट्रीयस्तरापर्यंत विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, तसेच एकविध खेळ संघटनांच्या सहकार्याने पार पाडत येतात. सन 2024-25 या सत्रात क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरीता ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रवेश अर्ज स्वीकारुन आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सदर ऑनलाईन सॉफ्टवेअर हाताळणीसाठी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, तसेच दुपारी 2 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, चिखली, देऊळगाव राजा, बुलडाणा तालुक्यांचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे घेण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणाकरीता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि ऑनलाईन काम करणारे संगणक चालक, तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

00000

धानोरी तलावाच्या संस्था नोंदणीवर आक्षेप नोंदविण्‍याचे आवाहन

बुलडाणा, दि. 25 : मत्स्यव्यवसाय विभागाकडे नव्याने हस्तांतरीत झालेल्या धानोरी तलावासाठी तीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सदर प्रस्तावाबाबत 15 दिवसाच्या आत आक्षेप सादर करावेत, असे आवाहन सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक यांनी केले आहे.

शासनाने मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सुधारीत निकष लागू केले आहेत. त्यानुसार मृद जलसंधारण विभागाकडून धानोरी क्र. 2 साठवण तलाव, ता. चिखली मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाला आहे. प्राप्त झालेल्या संस्था नोंदणीच्या अनुषंगाने नाव राखून ठेवणे आणि बँकेत खाते उघडण्याच्या प्रस्तावावर प्राप्त झाल्यानंतर, नैसर्गिक न्याय तत्वाने सक्रीय मच्छीमारांना समान संधी मिळण्याच्या हेतूने सदर प्रस्तावावर १५ दिवसाची जाहिर नोटीस देवून आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतीवर संबंधिताचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येणार आहे. १५ दिवसानंतर प्राप्त हरकती, आक्षेपावर कोणताही विचार केला जाणार नाही.

सदर तलावासाठी नियोजित स्व. दयासागरजी महाले मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, ईसोली, पो. इसोली, ता. चिखली, जि. बुलढाणा. नियोजित मुंगी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित ईसोली, पो. इसोली, ता. चिखली, जि. बुलढाणा. नियोजित धानोरी साठवण तलाव क्र.2 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, धानोरी, ता. चिखली, जि. बुलढाणा या नियोजित संस्थांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या तिनही संस्थांची कागदपत्रे कार्यालयात निरीक्षणासाठी ठेवण्यात आली आहेत, नागरिकांनी ही कागदपत्रे पाहून आक्षेप नोंदविता येईल, असे सहकारी संस्था (दुग्ध) सहाय्यक निबंधक अ. वि. भोयर यांनी केले आहे.

000000

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 25 : महिला व बाल विकास विभागांतर्गत बालकांच्या देखरेख संस्थेत दाखल अनाथ, निराधार, परित्यागीत, असक्षम पालकांचे बालक, एक वर्षाहून अधिक काळापासून पालक भेटायला आलेले नाहीत, अशी भेट नसलेल्या बालकांना कुटुंब मिळावे, यासाठी प्रतिपालकत्व योजना राबविण्यात येते. बालकांचे पालकत्व घेण्यासाठी इच्छुक पालकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक बालकाला प्रेमळ कुटुंब मिळावे, हा त्याचा अधिकार आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम आणि नियमांच्या तत्वानुसार प्रत्येक मुलाला घर मिळावे, कुटुंबात मुलांचे संगोपन व्हावे आणि अनाथालय, बालआश्रम, बालगृह, निरीक्षणगृह हे समाजातील दुर्लक्षित आणि देखभालीची आवश्यकता असणाऱ्या बालकांसाठी शेवटचा पर्याय असावा, हे कायद्याचे तत्व आहे. मात्र समाजातील अनेक बालके बेसहारा व निराश्रीत होऊन संस्थेत राहुन आपले जीवन जगत आहेत, अशा बालकांना कौटुंबिक वातावरण मिळावे व त्यांचे बाल अधिकारी सुरक्षित राहणे गरजेचे आहे.

या करीता केंद्र शासनाने बालकाची काळजी व संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित २०२१ कार्यान्वित केला आहे. या कायद्यातील कलम २ मध्ये विधीसंघर्षग्रस्त बालक आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना यथासंभव त्यांना आवश्यक सुविधा पुरवून पुनर्वसनाद्वारे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या बालकांच्या पुनर्वसनाकरीता संस्थेंतर्गत आणि संस्थाबाह्य अशा दोन प्रकारे सुविधा पुरवून विकास करायचा प्रयत्न करण्यात येत आहे.

बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी केंद्र शासनाने कार्यान्वित केलेल्या बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित २०२१ या कायद्यातील पुनर्वसन आणि सामाजिक पुनःस्थापना या प्रकरणांमध्ये बालकांना संस्थाबाह्य सेवा पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. इच्छुक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे.

अर्जदाराचे पात्रता निकषात अर्जदार हे शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असावेत, अर्जदारांना कोणताही जीवघेणी वैद्यकीय स्थिती नसावी, अर्जदार हे कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये किंवा कथितरित्या दोषी नसावे, विवाहित जोडप्याच्या बाबतीत दोन्ही जोडीदारांची संमती असणे आवश्यक आहे. एकल महिला मुलगा किंवा मुलगी दोन्हीपैकी कोणाचीही निवड करु शकते. एकल पुरुष फक्त मुलाची निवड करु शकतो. अर्जदार हे प्रेमळ, काळजी घेणारे आणि मुलाच्या वाढीसाठी फायदेशीर असे कौटुंबिक वातावरण तयार करण्यासाठी वचनबद्ध असणे गरजेचे आहे.

मुलांचे संगोपन करण्यासाठी पालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यातआली आहे. 6 ते 12 वयोगट वर्षातील बालकाला दत्तक घेण्यासाठी संमिश्र विवाहित वय जोडी यांचे किमान वय 70, कमाल 110 वर्षे असावे. एकलसाठी किमान 35 आणि कमाल 55 वर्षे असावे. 12 ते 18 वयोगट वर्षातील बालकाला दत्तक घेण्यासाठी संमिश्र विवाहित वय जोडी यांचे किमान वय 70, कमाल 115 वर्षे असावे. एकलसाठी किमान 35 आणि कमला 60 वर्षे असावे.

मुलांचे संगोपन करु इच्छिणाऱ्या पालकांनी caraing.gov.in ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलांचे संगोपन करु इच्छिणाऱ्या पालकांनी सदर पोर्टलवरील मार्गदर्शक तत्वांच्या अनुसूचीनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सदर अर्ज हा जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पोर्टलला दिसल्यानंतर अर्जाची पडताळणी करण्यात येते. पडताळणीनंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गृहभेट अभ्यास अहवाल पूर्ण केला जातो. गृहभेट अहवाल पोर्टलवर अपलोड केल्यानंतर अर्जदारांनी निवडलेल्या बालक, बालिकांची योग्यतेची शिफारस बाल कल्याण समिती करते. या शिफारशीनंतर बाल कल्याण समितीमार्फत पालकांना पालन पोषणासाठी देण्यात येतात.

पालन पोषणाचा कालावधीमध्ये अल्पकालीन प्रायोजकत्वाचा कालावधी हा १वर्षाचा आहे. दिर्घ कालावधी हा १ वर्षापेक्षा जास्त आणि पालक कुटुंबाशी मुलाच्या सुसंगततेच्या मुल्यांकनाच्या आधारे बालक-बालिका वयाच्या १८ वर्षापर्यंत ठेवता येईल. बाल कल्याण समिती, प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मंजुरी समितीची शिफारस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अहवालावर विचार केल्यानंतर पालनपोषनाची नियुक्ती समाप्त करण्याचा अधिकार राहील. कायमस्वरुपी दत्तक विधान हे अर्जादारांनी प्रतिपालक्तव योजनेंतर्गत बालक, बालिका पालन-पोषणासाठी घेतलेले असेल आणि पालकांच्या काळजीच्या कालावधीत मुलांचे पालन पोषण कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे जुळवून घेतलेल्या प्रकरणामध्ये आणि पालक कुटुंब आणि पालनपोषणासाठी असलेले बालक, बालिका दोघेही दोन वर्षाच्या कालावधीनंतर दत्तक घेण्यास पात्र असू शकतात.

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बस स्टँडच्या मागे, मुड्ढे ले आऊट, डॉ. जोशी नेत्रालयाजवळ, बुलडाणा येथे संपर्क करु शकता किंवा दुरध्वनी क्र. ०२७६२-२९९३६६. मेल आयडी dcpubuldana@gmail.com वरून अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकतात. इच्छुकांनी बालकांचे पालकत्व स्विकारण्यासाठी caraing.gov.in पोर्टलवर फॉस्टर केअर अंतर्गत अर्ज करावे. तसेच बालकांना त्यांचा जगणे, सहभाग, सुरक्षितता, शिक्षण आणि विकासाचा अधिकार देण्यास मदत करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.

00000000

बालकांना दत्तक घेण्यासाठी सुधारीत नियमावली जाहीर

बुलडाणा, दि‍. 25 : दत्तक विधान प्रक्रिया करण्यासाठी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ आणि सुधारीत २०२१ व दत्तक नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रिया राबविल्या जाते. बालकांना दत्तक घेण्यासाठी सुधारीत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नियमावलीनुसार बाळ दत्तक घेण्यासाठी भावी दत्तक माता ही शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरूपात सक्षम असणे आवश्यक आहे. सदर दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नीयांची सहमती असणे आवश्यक आहे. एका दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडू शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतात.

बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. २ वर्षाच्या आतील बालकाला दत्तक घेण्यासाठी भावी दत्तक माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तिक ही ८५ वर्ष आहे. तर एकलभावी माता-पिता यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे आहे. २ से ४ वर्षापर्यतचेबालकासाठी अनुक्रमे ९० वर्षे आणि ४५ वर्षे आहे. ४ वर्ष ते ८ वर्षापर्यंतचेबालकांसाठी १०० वर्षे आणि ५० वर्षे वय असावे. ८ वर्ष ते १८ वर्षापर्यंतचेबालकांसाठी ११० वर्षे आणि 55 वर्षे असावे.

दत्तक विधानासाठी अर्ज करावा लागतो. दत्तक विधानामार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता -पिता यांनी cara.wed.gov.in या पोर्टलवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष. सुवर्ण नगर, मुठ्ठे ले आऊट, बस स्टँडच्या मागे, डॉ. जोशी हॉस्पिटल शेजारी, बुलडाणा येथे भेट देऊ शकतात. तसेच यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट, खामगाव रोड, सुंदरखेड, बुलडाणाया विशेष दत्तक संस्थेस भेट देऊन माहिती प्राप्त करु घेऊ शकतात.

दत्तक विधान साठी अर्ज केल्यानंतर गृहअध्ययन अहवालासाठी अर्जदारांना निकटची दत्तक संस्था निवडावी लागते, सदर अर्ज केल्यानंतर गृह अद्ययन अहवाल करण्यासाठी सदर संस्थेने ६० दिवसाच्या आत अर्जदाराच्या घरी जाऊन अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. सदर गृह अद्ययन अहवाल हा ३ वर्षांसाठी लागू राहिल.

दत्तक विधान संस्थेमार्फत गृह अध्यायन अहवाल हा कारा पोर्टलवर अपलोड केल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला आपल्या पसंतीनुसार बाळ दिसणे सुरु होते. ज्यामध्ये बाळाचा फोटो, मेडीकल रिपार्ट, बालक अभ्यास अहवाल असते. बाळ आपणास पसंत पडल्यास बालकास ४८ तासाच्या आत कारा पोर्टलवर आरक्षित करावे लागते. त्यानंतर सदर भावी माता-पिता यांची दत्तक विधान समिती बैठकीत साक्षात्कार आणि आकलन केल्यानंतर भावी माता-पिता हे बालकांसाठी योग्य वाटल्यास बालक पालकांच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरुपात प्रि-फॉस्टर केअर अंतर्गत दिले जाते. संस्थेमार्फत सदर बालक व पालकांची नस्ती तयार करुन न्यायालयामार्फत पालकांना दत्तक आदेश दिला जातो.

0000000


No comments:

Post a Comment