Friday, 12 July 2024

DIO BULDANA NEWS 12.07.2024

 धानोरी तलावासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि‍. 12 : शासनाच्या सुधारीत तलाव, जलाशय धोरणानुसार मृद व जलसंधारण विभागाच्या मालकीचा धानोरी क्र. २ तलाव जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग कार्यालयाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झाला आहे. या तलावासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी दि. 19 जुलै 2024पर्यंत प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

सदर तलाव, जलाशय परिसरातील स्थानिक नागरिकांना, प्रकल्पग्रस्त, मागासवर्गीय व महिला यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने १०.२२ हेक्टरचा धानोरी क्र. २ मृद व जलसंधारण तलावावर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणी करण्याचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), बुलडाणा यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. इच्छुकांनी दि. 19 जुलै 2024पर्यंत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था स्‍थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सहायक निबंध, सहकारी संस्था दुग्ध, बुलडाणा यांच्या कार्यालयात सादर करावे. त्‍यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सु. ग. गावडे यांनी केले आहे.

00000

एसटी महामंडळात दर सोमवार, शुक्रवारी प्रवासी राजा दिन

बुलडाणा, दि‍. 12 : राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दि. १५ जुलै २०२४ पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचनांचे स्थानिक पातळीवर निराकरण होण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवार आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे.

सदर उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशी आणि परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील, तसेच तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

बुलडाणा विभागातील आगारामध्ये सातही आकारात प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. बुलडाणा आगारात सोमवार, दि. १५/०७/२०२४, चिखली येथे शुक्रवार, दि. १९/०७/२०२४, खामगाव येथे सोमवार, दि. २२/०७/२०२४, मेहकर येथे शुक्रवार, दि. २६/०७/२०२४, मलकापूर येथे सोमवार, दि. दि. २९/०७/२०२४, जळगांव जामोद येथे शुक्रवार, दि. ०२/०८/२०२४, शेगाव येथे सोमवार, दि. ०५/०८/२०२४ कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सदर प्रमाणे परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी ३ ते सांयकाळी ५ दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यारी वैयक्तिक प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तात्काळ निराकरण करतील.

प्रवाशी आणि महामंडळाचे कामगार यांनी याचा लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

000000

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान

बुलडाणा, दि. 12 : राज्यातील सहकारी दुध संघ आणि खासगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजना दि. 1 जुलै ते दि. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत राहील.

योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी आणि खासगी संघांनी अर्ज आवश्यक कागदपत्र आणि माहितीसह ddcmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर सादर करावे लागणार आहे. तसेच अर्जाच्या दोन प्रती कार्यालयास सादर कराव्या लागतील. अनुदान संबंधित लाभार्थीचे बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी संबंधीत दुध उत्पादक शेतकऱ्याचे आधारकार्ड त्याच्या बँक खात्याशी व पशुधनाच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

सदर योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दुध संघ आणि खासगी दुध प्रकल्पांनी आयुक्त दुग्धव्यवसाय विभाग, वरळी सी-फेस, मुंबई १८ यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. 5 रुपये दूध अनुदान योजनेंतर्गत सहकारी आणि खासगी संघाना देण्यात आलेले युजर आयडी व पासवर्ड हे 1 जुलै 2024 पासून सुरु होणाऱ्या 5 रुपये दुध अनुदान योजनेस इनव्हॅलीड असतील. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी सर्व सहकारी संघ आणि खासगी प्रकल्पांनी यूजर आयडी व पासवर्ड मिळण्यासाठी नव्याने प्रस्ताव कार्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी आवाहन डॉ. डी. एन. काळे यांनी कळविले आहे.

0000000

ई-शिधापत्रिका सुविधा नि:शुल्क उपलब्ध

बुलडाणा, दि.12 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना, तसेच राज्य योजनेतील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई-शिधापत्रिका सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागरिकांना नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करणे, शिधापत्रिकेतील बदल करणे, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे अशा शिधापत्रिकाविषयक विविध सेवा ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमार्फत पब्लिक लॉगईनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संबंधित अर्जदारानी शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाईन ई -शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात येते. अर्जदारांना rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावरून नवीन ई-शिधापत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000000

सोमवारी महिला लोकशाही दिन

बुलडाणा, दि. 12 : दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. जुलै महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै 2024 मधील तिसरा सोमवार हा दि. 15 जुलै रोजी असल्याने या दिवशी महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment