मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 26 : युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पत्रपरिषदेत दिली. या योजनेतून उद्योजक, खासगी आस्थापना, सेवा क्षेत्र केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थी बारावी पास असल्यास 6 हजार रुपये, आयटीआय, पदविका असल्यास 8 हजार रूपये आणि पदविधर व पदव्युत्तर पदवी असल्यास 10 हजार रूपये प्रतिमहा विद्यावेतन मिळणार असल्याचे सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्य मंत्री जन कल्याण कक्ष यांच्यातर्फे योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना शासकीय, तसेच खासगी आस्थापनांमध्ये 6 महिन्यांसाठी कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. तसेच उद्योजकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच युवकांना शासनातर्फे बँक खात्यात विद्यावेतन जमा केले जाणार आहे. यासाठी उमेदवार आणि खासगी, तसेच शासकीय आस्थापनांनी rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांची पात्रता ही किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, शैक्षणिक पात्रता बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याची आधार नोंदणी बॅक खात्याशी संलग्न असावी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. मात्र शिक्षण सुरू असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही.
खासगी आस्थापनांनी नोंदणीसाठी या योजनेंतर्गत प्रत्येक खासगी उद्योजक, आस्थापना त्यांच्या एकुण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार आहे. उद्योगाची स्थापना 3 वर्षांपूर्वीची असावी, उद्योगांनी इपीएफ, इएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. उद्योजकाचा पॅन, टॅन क्रमांक, उद्योजकाचा ई-मेल आयडी आदी बाबी आवश्यक आहेत.
शासकीय आस्थापनांनी नोंदणीसाठी या योजनेंतर्गत प्रत्येक शासकीय आस्थापनांना त्यांच्या मंजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. यासाठी कार्यालयाचा पॅन, टॅन क्रमांक, कार्यालयाचा ई-मेल आयडी, कंपनी नोंदणी क्रमांक, इएसआयसी प्रमाणपत्र क्रमांक, इपीएफ प्रमाणपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे.
00000
पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा
बुलडाणा, दि. 26 : पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील शनिवार, दि. 27 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, शनिवार, दि. 27 जुलै रोजी सकाळी 5.40 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. सकाळी 7.30 वाजेपर्यंत शासकीय विश्राम भवन येथे आगमन व राखीव राहणार असून त्यानंतर शासकीय विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक घेतील. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव राहणार आहे. दुपारी 3 वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव राहील. त्यानंतर सोईनुसार बुलडाणा येथून शेगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. रात्री 9 वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000
राज्यमंत्री अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा
बुलडाणा, दि. 26 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील मंगळवार, दि. 30 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, दि. 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्राम गृह, बुलडाणा येथे आगमन व राखीव, दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 4.30 वाजता जिजामाता महाविद्यालयातील ग्रंथालय व अभ्यासिकेची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 5 वाजता अमरावती -काटोलकडे रवाना होतील.
00000
बॅन्डस्मन पोलिस शिपाई भरतीसाठी शुक्रवारी लेखी परीक्षा
बुलडाणा, दि. 26 : बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मधील रिक्त असलेल्या 8 पोलिस शिपाई बॅन्डस्मन पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 ते 5.30 या वेळेत चिखली रोडवरील एडेड हायस्कूल, बुलडाणा येथे घेण्यात येणार आहे.
पोलिस दलातील 8 बॅन्डस्मन पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी 1 हजार 705 आवेदन अर्ज प्राप्त झाले. 854 उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर होते. मैदानी चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण घेवून 514 उमेदवार उत्तीर्ण झाले. अर्हता चाचणी, कौशल्य चाचणीमध्ये 100 उमेदवार पात्र ठरले. प्रवर्गनिहाय 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी 80 उमेदवार पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांनी दि. 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे.
000000
मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर
बुलडाणा, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहिर केले आहे.
या वेळापत्रकानुसार, दि. 2 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दि. 2 ते 16 ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. दि. २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार आणि नागरिकांनी दि. 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदारयादीची पाहणी करुन मतदार यादीत नाव असल्याचे खात्री करावी. मतदारयादीमध्ये नाव नसल्यास संबधित मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा. नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह दि. 2 ते 16 ऑगस्ट कालावधीत विहित नमुना 6 भरुन द्यावा. मतदारयादीतील नावात चुकीची दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना 8 भरुन द्यावा, तसेच सदरची कार्यवाही ऑनलाईन करण्यासाठी वोटर हेल्पलाईन ॲप आणि voters.eci.gov.in यावर देखील मतदारांना नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट करु शकतील.
नागरीकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र टोल फ्री क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आला आहे. उपरोक्त कालावधीमध्ये नागरीकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
00000
क्षयरुग्णांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे.
बुलडाणा, दि. 26 : ससंर्गजन्य आजारामुळे क्षयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळै क्षयरूग्णांच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
क्षयरुग्णांची उपचार कालावधीमध्ये पुरेसे पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते. रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. उपचाराखाली असलेल्या आणि सामाजिक सहाय्य मिळावे यासाठी संमती दिलेल्या क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पोषण आहार आणि इतर सहाय्य मिळावे यासाठी टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. यामध्ये रुग्णांना पोषण आहार, व्यावसायिक प्रशिक्षण आदी सहाय्य निक्षय मित्राच्या माध्यमातून देण्यात येते. क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. क्षयरुग्णांसाठी केंद्र शासनाने प्रती व्यक्ती, प्रती महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल आदी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
क्षयरुग्णांना आहारासाठी तज्ज्ञांच्या मते दरमहा लागणारे आहार हे गहू, ज्वारी, बाजरी प्रौढांसाठी 3 किलो व बालकांसाठी 2 किलो, प्रौढांसाठी डाळ 1.5 किलो, बालकांसाठी 1 किलो, खाद्यतेल प्रौढांसाठी 250 ग्रॅम व बालकांसाठी 150 ग्रॅम, दुध पावडर व दुध 1 किलो व बालकांसाठी 750 ग्रॅम, अंडी दररोज एक प्रत्येकी देण्यात यावे.
औद्योगिक संस्था, औद्योगिक संघटना, व्यापारी संघटना, व्यवसाय गट आणि इतर अशासकीय संस्था यांच्याकडून कामाच्या ठिकाणी कृती अपेक्षित आहे. कार्याचे ठिकाण क्षयमुक्त ठेवणेसाठी क्षयरोगविषयी कलंक आणि भेदभाव दूर करणे, कार्याच्या ठिकाणी क्षयरोग विषयी जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करणे, कार्यशाळा सभाचे आयोजन करणे, क्षयरोग माहितीपर साहित्य लावणे. क्षयरोगाविषयी निदान व उपचाराची माहिती देण्यासाठी सहाय्य करणे, कामगारांची क्षयरोग तपासणी करण्यासाठी मदत करणे, निदान होणाऱ्या क्षयरुग्णांना उपचारासाठी सहाय्य करणे. क्षयरोगाविषयी संशोधन आणि नविन्यपूर्ण उपक्रमास सहकार्य करणे. क्षयरुग्णांची उपचाराची फलनिष्पत्ती अधिक चांगला येण्यासाठी रुग्णास औषधोपचारासाठी सामाजिक सहाय्यता करणे अपेक्षित आहे. शासनामार्फत क्षयरुग्णासाठी पोषण आहाराकरीता दरमहा 500 रुपये औषधोपचार कालावधीसाठी जमा होतात. परंतू याखेरीज कोरडा शिधा, फळे, अंडी, दुध या अन्न पुरवठ्यासाठी रुग्णास सहाय्य होणे आवश्यक आहे.
क्षयरुग्णांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य होणे आवश्यक आहे. गरजू क्षय रुग्णांसाठी आर्थिक सहाय्य करणे.
क्षयरुग्णांना सामाजिक, व्यावसायिक आणि आर्थिक सहाय्यासाठी संस्थांचा सीएसआर फंडाचा वापर करणे, सदरचा लाभ देण्यासाठी निक्षय साथी अॅप तसेच TBC India Site वर निक्षय पेजला क्लिक करुन communitysupport.nikshay.in साठी रुग्णांना लाभाची माहिती देण्यात येते. क्षयरुग्ण किमान 6 महिने ते 3 वर्षांकरीता दत्तक घेऊन क्षयरुग्णांना संस्था आणि वैयक्तिक लाभ प्रत्यक्ष देवू शकतो. त्यामुळे सर्व सामाजिक क्षेत्रातून या राष्ट्रीय कार्यास पूर्णत्वास नेवून भारताला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ
बुलडाणा, दि. 26 : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज स्विकारण्याचे अंतिम मुदत 31 जुलै 2024 आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment