Thursday, 18 July 2024

DIO BULDANA NEWS 18.07.2024

 माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचे व्यवस्थित संकलन करावे

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 18 : राज्य शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांकडून अर्ज करण्यात येत आहे. या अर्जाचे सुव्यवस्थितरित्या संकलन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय आधिकारी आणि तहसीलदार यांची दूरदुष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, राज्य शासनाकडून विविध योजना जाहीर करण्यात येत आहे. यात महत्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सेतू, सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यासोबतच वेबपोर्टल, ॲप याद्वारेही महिलांना स्वत: अर्ज करता येते. ग्रामीण आणि नागरी भागात ऑफलाईन अर्ज करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, अंगणवाडी सेविका यांच्याकडेही अर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुव्यवस्थित अंमलबजावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांनी सेवा केंद्र चालकांची बैठक घेऊन स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. महिलांच्या तक्रारी येऊ नये, यासाठी सेवा केंद्र चालकांनी काळजी घेण्याच्या सूचना देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अंगणवाडी सेविका आणि सेतू केंद्र चालकांना प्रत्येक अर्जामागे 50 रूपये शुल्क मिळणार असल्याने अर्जदारांकडून कोणत्याही स्वरूपात रक्कम स्विकारू नये.

ऑफलाईन स्विकारण्यात आलेले अर्ज ऑनलाईन डाटा एन्ट्री करण्यात यावे. लोकप्रतिनिधींनी शिबीरे घेऊन महिलांकडून अर्ज भरून घेतले आहेत. हे अर्जही ऑनलाईन करण्यासाठी अर्जांचे व्यवस्थित संकलन करावे, तसेच हे अर्ज तातडीने सेवा केंद्रांना देऊन डाटा एन्ट्री करावी. सदर कामे जलद गतीने होण्यासाठी अंगणवाडी सेविकांची बैठक घेण्यात यावी. राज्य शासनाकडून योजनेबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याने या कामास प्राधान्याने घ्यावे.

योजनेची प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. सध्यास्थितीत अर्जाची स्थितीबाबत माहिती घेण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्याधिकारी, निवासी नायब तहसीलदार यांच्याकडू नियमित माहिती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 18 : युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. यातून उद्योजक, खासगी आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी कौशल्य विकास विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय विभाग यांची एकत्रितरित्या बैठक घेतली. सदर योजनेतून शासकीय कार्यालयाला मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. विभागांनी मनुष्यबळ आवश्यकता जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

या योजनेसाठी उमेदवारांची पात्रता ही वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असावे, शैक्षणिक पात्रता ही बारावी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी असावी, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, त्याची आधार नोंदणी बॅंक खात्याशी संलग्न असावी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या mahaswayam.gov.in संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार बारावी उत्तीर्ण असल्यास सहा हजार रूपये, आयटीआय पदविका उत्तीर्ण असल्यास आठ हजार रूपये आणि पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास प्रतिमहा 10 हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.

 

00000

पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण

बुलडाणा, दि. 18 : पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 15 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. दुधा, ब्रह्मपुरी, पाचला, रायपूर येथील शेतकऱ्यांना दुधा ब्रह्मपुरी येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात नुकसान भरपाईचे 5 कोटी 40 लाख रुपये वितरीत करण्यात आले. यावेळी आमदार संजय रायमूलकर, उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, कार्यकारी अभियंता अ. भा. चोपडे, खडकपूर्णाचे अधीक्षक अभियंता बा. ज. गाडे, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे उपस्थित होते.

श्री. जाधव यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकोपयोगी निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना, शेतीची वीजबिल माफी, एक रुपयात पिकविमा, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत, तीन गॅस सिलेंडर मोफत आदी निर्णय घेतले असल्याचे सांगितले. पेनटाकळी प्रकल्पाच्या कालवा पाझरामुळे नुकसान झाले. ही भरपाई मंजूर करून घेण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असल्याचे सांगितले. सिद्धेश्वर पवार यांनी सूत्रसंचालन केले.

00000

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 18 : राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. यात सहभागी होण्यासाठी आता दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारचे विमा पोर्टल pmfby.gov.in  वर ऑनलाईन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा दि. 16 जून 2024 पासून सुरू केली. यात भाग घेण्यासाठी अंतिम मुदत दि. 15 जुलै 2024 होती. दि. 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत यात 1 कोटी 36 लाख विमा अर्जाद्वारे सुमारे 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. गतवर्षी म्हणजेच खरीप 2023 मध्ये पिक विमा अर्ज संख्या 1 कोटी 70 लाख, तर विमा संरक्षित क्षेत्र 1  कोटी 13  लाख हेक्टर होते.

राज्यात या योजनेत 95 टक्क्यांपेक्षा जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून भरण्यात येते. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे, वेग कमी असणे. त्याचबरोबर लाडकी  बहीण योजनेंतर्गत अर्ज सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून भरण्यात येतात. पिक विमा अर्ज कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून भरावयाच्या असल्याने, यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पिक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी दिलेल्या मुदतीत पिक विमा योजनेत सहभाग घेण्यापासून वंचित राहिले आहेत, त्यांना या योजनेत सहभाग घेता यावा, यासाठी राज्य शासनाने दि. 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला. त्यानुसार या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता देऊन दि. 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री धनजंय मुढे यांनी केले आहे.

000000

ज्वारी खरेदीचे पोर्टल सुरु

बुलडाणा, दि. 18 : ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारीची खरेदी सुरू करण्यात आली आहे.

रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये राज्य शासनातर्फे ज्वारी खरेदीचे पोर्टल दि. 27 जून 2024 पासून बंद होते. सदर ऑनलाईन पोर्टल दि. 15 जुलै 2024 पासून सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना एसएमएस येईल, अशा शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन जावे. तसेच खरेदी संदर्भात अडचण असल्यास अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे, संपर्क क्रमांक 9421493761, प्रतिनिधी बाबाराव सुर्यवंशी संपर्क क्रमांक 8108908978 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000000

स्पीड पोस्टाद्वारे राखी पाठविण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : पोस्ट ऑफिस मार्फत देश, विदेशात राखी पाठविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

राखी पाठविण्यासाठी पाकिटावर 'राखी टपाल' नमूद करून अचूक पिन कोड टाकावा. पावसाळी वातावरणात खराब न होणारे पाकीट पोस्ट ऑफिसमध्ये माफक दरामध्ये उपलब्ध आहेत. तसेच मुख्य डाक घर बुलढाणा व खामगाव येथे भेट वस्तू पार्सल मार्फत पाठविण्यासाठी पॅकिंग सुविधा वाजवी दरात उपलब्ध आहे. नागरिकांनी नजिकच्या पोस्ट ऑफिस मार्फत राखी, भेटवस्तू पाठविण्यासाठी उपलब्ध सोयींचा लाभ घावा, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

000000

मधपालन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालनासाठी मध केंद्र योजना राबविण्यात येत आहे. याकरीता पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती करण्यात येणार आहे. 

योजनेसाठी वैयक्तीक मधपाळ १० मधपेट्या आहे. तसेच अर्जदार साक्षर असावा, स्वतःची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यात वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे लागणार आहे. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळासाठी किमान 10 वी पास, वय २१ वर्षापेक्षा जास्त, व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी लागणार आहे. केंद्रचालक संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत संस्थेकडे असावी. मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली सेवा असावी.

केंद्र चालकास 4 हजार 200 प्रती पेटी प्रमाणे 50 मधपेट्या घेण्यासाठी 50 टक्के अनुदानावर घेण्यासाठी रक्कम प्रथम जमा करणे आवश्यक आहे. अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे आवश्यक आहे.

मंडळामार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. सदर योजनेचे अर्ज मंडळाचे जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, बुलडाणा, आशीर्वाद बिल्डिंग, मुठ्ठे ले-आऊट, मलेरिया ऑफीसजवळ, बुलडाणा दूरध्वनी क्रमांक 07262-29076, मोबाईल क्रमांक 9172744474 , 7057887887 ई मेल dviobuldhana@mskvib.org. तसेच मध संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बगला नं. 5. मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806, दुरध्वनी क्र. 02168-260264 याठिकाणी संपर्क करता येईल.

0000000

महात्मा बसवेश्वर पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 18 : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता दि. 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

राज्यातील विरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाजप्रबोधन व साहि‍‍त्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार आणि समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध अक्षयतृतीया यादिवशी महात्मा बसवेश्वर यांच्या नावे एक व्यक्ती आणि एक संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार, लिंगायत समाजाकरीता जाहिर केला जातो.

सदर पुरस्कार हा विरशैव-लिंगायत समाजाकरीता सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, समाज संघटनात्मक आध्यात्मिक प्रबोधन आणि आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी कार्य करणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार आणि साहित्यिक, तसेच सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.

            या पुरस्कारासाठी पुरूषांसाठी वयोमर्यादा किमान 50 वर्षे, तर महिलांसाठी किमान 40 वर्षे असून सामाजिक संस्थेसाठी सदर क्षेत्रातील किमान 10 वर्षे कार्य केले असल्याचा निकष आहे. इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी दि. 31 जुलै 2024 पर्यंत प्रस्ताव 4 प्रतीमध्ये विहित नमुन्यात सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 18 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी दि. 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले असावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना गुणक्रमांकानुसार जिल्ह्यातील पहिल्या विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन फोटो, आधारकार्ड आदी कागपदत्रांसह साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एस. गाभणे यांनी केले आहे.

00000

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकात बदल

बुलडाणा, दि. 18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता दि. 21 जुलै रोजी घेण्यात येणारी ही परीक्षा आता दि. 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता बुलडाणा येथील उपकेंद्रावरील होणारी दि. 21 जुलै 2024 रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सदर परीक्षा आता नियोजित आठ परीक्षा उपकेंद्रावर रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेकरीता बुलडाणा मुख्यालयातील नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी, तसेच परीक्षा उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी यांनी केले आहे.

000000   

शासकीय तंत्र माध्यमिक केंद्रात तासिका तत्वावर शिक्षकांची पदभरती

बुलडाणा, दि. 18 : बुलडाणा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथे तासिकातत्वावर शिक्षकांची पदभरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथे पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम नववी आणि दहावी करिता तासिकातत्त्वावर शिक्षकांची संस्थास्तरावर ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिकविण्यासाठी सत्र २०२४ -२५ करीता पदे भरण्यात येणार आहे. पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजीच्या निदेशकाचे एक पद भरण्यात येणार आहे. यासाठी अर्हता ही डिप्लोमा, बीई इलेक्ट्रीकल, एक वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी निदेशकाचे एक पद भरण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता ही डिप्लोमा, बीई मेकॅनिकल, एक वर्ष अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रम शिकविण्याकरीता अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिकातत्वावर शिकविण्याचे काम देण्यात येणार आहे. सदर पदावरील उमेदवारास शासकीय नियमानुसार मानधन देय राहणार आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्र आणि छायांकीत प्रतीसह दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता मुख्याध्यापकांच्या दालनात स्वःखचर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय तंत्र माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकांनी केले आहे.

0000000

विशेष लेख :

महिलांना सशक्त करणारी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना'

राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविणे आणि महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे, या सर्वांगाचा विचार करून 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरू केली आहे.

या योजनेच्या लाभासाठी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामुल्य असल्याने महिलांनी कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज भरण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही ठिकाणी अर्ज भरताना कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु दरमहा आर्थिक लाभ देणारी योजना, तसेच कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद व महानगर पालिका क्षेत्रात विभाग कार्यालय येथे पात्र महिलांना अर्ज देता येतील. पालिका कार्यालयात अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर पोर्टल, मोबाइल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणे शक्य नसल्यास त्यांना ग्रामीण भागात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवक, तसेच नागरी भागात अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर्समध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे.

या योजनेत पात्र महिलेला तिच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे. याद्वारे दरमहा दिड हजार रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दिड हजार रूपयांपेक्षा कमी लाभ घेत असलयास फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येणार आहे.

योजनेचा लाभार्थी हा राज्यातील २१ ते ६५ या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असतील. तसेच अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र ठरतील. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड असल्यास हेच रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला मानण्यात येणार आहे. तसेच १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र असल्यास ते अधिवासाचा पुरावा मानण्यात येणार आहेत.

परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. या योजनेत कुटुंबातील पात्र अविवाहित महिलेचा समावेश करण्यात आला आहे.

या योजनेसाठी योजनेच्या लाभासाठी अर्जाची प्रत, आधार कार्ड, बँक पासबुक, वय आणि रहिवासासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि योजनेच्या अटी व शर्ती पालन करण्याबाबत हमीपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता राहणार आहे.

ज्या लाभार्थ्यांस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसल्यास त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी, ग्रामीण, आदिवासी, तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध करण्यात आली आहे.

00000


No comments:

Post a Comment