Tuesday, 30 July 2024

DIO BULDANA NEWS 30.07.2024

 






चारा लागवडीसाठी शेती मिशनच्या अध्यक्षांचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत आढावा बैठक घेतली. पशुधनाला गावातच वैरण उपलब्ध होण्यासाठी येत्या दहा दिवसात ई-क्लास जमिनीवर चाऱ्याची लागवड करावी, असे आवाहन ॲड. हेलोंडे यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे आदी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्येबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कमी वयात होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. तरूण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. यासाठी शेतीसह शेतकऱ्यांनी दुधाळ जनावर पाळणे आवश्यक आहे. या जनावरांना मुबलक चारा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांकडील पशूधन वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात चारा लागवड करण्याच्या सूचना ॲड. हेलोंडे यांनी दिल्या.

यासोबतच बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पिक विमा प्रतिनिधीच्या क्रमांकांचा बोर्ड लावावा. जैविक प्रयोगशाळा शिबीर घेण्यात यावेत. बाजार समितीच्या आवारात हमीभाव दर्शविणारा फलक लावण्यात यावा. धरमकाटा असलेल्या ठिकाणी त्याच्या व्यवस्थापकाचा क्रमांक लावण्यात यावा, असे झाल्यास शेतकऱ्यांना संबंधित क्रमांकावर संपर्क साधून समस्या मांडता येतील. शेतकऱ्यांमध्ये येणारे नैराश्य घालविण्यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविण्यात यावा. यात नियमित स्वरूपात शेतकऱ्यांची तपासणी करावी. ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य विकासाच्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये योजनांची माहिती लावण्यात यावी. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या योजनेतून सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

000000

माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज जिल्हास्तरावर पाठवावेत

-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 30 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात साडेतीन लाखाहून अधिक ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहे. तालुकास्तरावर अर्जांची छाननी करून हे अर्ज जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा आढावा आज घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे कमी अर्ज दाखल झालेल्या तालुक्यांनी अर्जांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. रक्षाबंधनाच्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात करावयाची असल्याने तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अर्ज पाठविण्यास सुरवात करावी. अर्ज मराठीमध्ये असणे, बँक खाते आधार लिंक नसणे, आधारकार्डप्रमाणे नाव नसणे आदी कारणांमुळे अर्ज परत पाठविण्यात यावे. अर्ज ज्या ठिकाणाहून भरलेला आहे, तेथून संबंधित त्रृटी दूर करून परत अर्ज सादर करावयास सांगावे.

योजनेची अंमलबजावणी तातडीने करावयाची आहे. त्यामुळे तालुकास्तरावर प्राधान्याने आणि जबाबदारी नेमून अर्जांची छाननी करावी. यात सर्व तपशिल अचूक भरलेला असल्याची खात्री करावी. तसेच अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे काटकोरपणे तपासण्यात यावीत. जिल्हास्तरावर पाठविण्यात येणारे अर्ज दररोज पाठविण्यात यावेत. तालुकास्तरावर छाननी करताना जबाबदारी नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. इतर योजनांमधून एक हजार 500 रूपयांवरून अधिक मदत मिळत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची यादी तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात यावी.

सदर योजना ही राज्य शासनाची महत्वाची योजना आहे. त्यामुळे यंत्रणांनी याचे गांभीर्य ओळखावे. योजनेची प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित झाली आहे. अर्ज दाखल होत असून याची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यंत्रणांनी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.

00000

बुलडाणा आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश सुरू

बुलडाणा, दि. 30 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत बुलडाणा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात शैक्षणिक सत्र 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश अर्ज भरताना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि मेडिकल व इंजिनीअरींग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. खास बाब प्रवेशाबाबत लोकप्रतिनिधींच्या शिफारशी दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत नाशिक आयुक्तालय येथे प्रकल्प कार्यालय, अकोला मार्फत सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना कागदपत्रांची सुस्पष्ट आणि मूळ प्रत संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल आधार क्रमांकासोबत नोंदणी केलेला असावा. तसेच आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडणी केलेले असावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँकखाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. अर्जामध्ये नाव नोंदणी करताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणेच तंतोतंत भरावे. पालकांचे स्वयंघोषणापत्र व विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. सदर घोषणा पत्राचा नमुना संकेतस्थळावरील सूचना फलकावरील लिंकमध्ये देण्यात आला आहे.

अर्जामध्ये माहिती भरताना चुकीची माहिती भरल्या जाणार नाही, याची खबरदारी विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी. उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका, जमातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, बोनाफाईड किंवा प्रवेश घेतल्याची मूळ पावती, विद्यार्थी आणि पालकांचे स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

00000

महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांनी

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी, अकरावी, बारावीसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजना राबविण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता नवीन व नुतनीकरण योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि. 25 जुलैपासून सुरू केली आहे. संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फ्रीशिपचे अर्ज तातडीने भरून फी मंजूरीची कार्यवाही करावी.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरताना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असल्याची पडताळणी आधार पोर्टलवर resident.uidai.gov.in/bankmapper करावी. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रणालीद्वारे निर्गमित झालेले पेमेंट व्हाउचर विद्यार्थी लॉगिन मध्ये जाऊन त्वरित रीडीम करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युजर आयडी आणि पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. महाडीबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असताना तयार केलेले लॉगीन आयडी विद्यार्थ्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवावा. जेणेकरुन कोणताही लॉगीन आयडी दुबार तयार होणार नाही. तसेच आपला लॉगीन आयडी व पासवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास याचा दुरुपयोग होणार नाही.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थीस्तर, तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असतील अशा अर्जांची पडताळणी करुन परिपूर्ण अर्ज विद्यार्थी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्यांनी तात्काळ ऑनलाईन भरून घ्यावेत. महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावरील स्कुटीनी पर्यायाचा वापर करुन प्रलंबित अर्ज फॉरवर्ड करत असताना प्रणालीमध्ये  दर्शविण्यात आलेल्या सर्व बाबींची खात्री करुन पात्र अर्ज मंजुरीसाठी विहित मुदतीत जिल्हा कार्यालयास प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावेत.

विद्यार्थी आणि महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता मिळालेला आहे, त्यांनी दुसऱ्या हप्त्याकरीता महाविद्यालय लॉगीनमधून द्वितीय सत्राची उपस्थिती अद्यावत करुन अर्ज मंजुरीसाठी पाठवावेत. महाविद्यालययाच्या लॉगीनमध्ये अलॉटमेंट डेटवाईज रिपोर्ट या पर्यायाचा वापर करुन अर्ज अलॉट झाल्याची महाविद्यालयाने पडताळणी करावी. नॉट अलॉटेड अर्जाबाबत त्रृटी पुर्तता करण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्वरीत अवगत करावेत.

महाविद्यालयांना लॉगीनमध्ये डीबीटी डॅशबोर्ड पर्यायाचा वापर करुन शिष्यवृत्ती बाबत महाविद्यालय निहाय तपशिलवार अहवाल दिसतो. महाविद्यालय लॉगीनमध्ये तीन पर्यायामध्ये विद्यार्थी आणि महाविद्यालयांना शिष्यवृत्ती वितरण झालेल्या स्थितीचा अहवाल दिसून येतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनमध्ये अर्ज क्रमांक निहाय शोध घेतलेल्या अर्ज क्रमांकाला क्लिक केल्यानंतर सदर अर्जासंबधीत पोर्टल बाबतच्या त्रृटींची माहिती महाविद्यालय लॉगीनमध्ये विद‌्यार्थीनिहाय प्रणालीमध्ये दर्शविण्यात येते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे आधार अथवा बँक खात्यासंबधीत त्रृटी असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना अवगत करावेत. विद्यार्थी आणि महाविद्यालयांना महाडीबीटी पोर्टलवरील अडचणीबाबत तक्रार करण्याची सुविधा आहे.

सन 2024-25 व 2023-24 या वर्षातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता योजनेंतर्गत कार्यवाही केली नसल्यास अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास प्राचार्य जबाबदार राहृणार आहे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

00000


No comments:

Post a Comment