स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 05 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत स्टँड अप इंडिया योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी दि. 30 जुलै पय्रंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बॅकेचे कर्ज मंजुरीचे पत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा करणे आवश्यक आहे. बॅकेने अर्जदारास स्टॅड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे कागदपत्रासह अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 05 : राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. सन 2023 यावर्षीच्या कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषि विभागातर्फे राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणारे शेतकरी यांचा, तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रीय शेती कृषिभूषण, उद्यानपंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कारा
सन 2023 या वर्षामध्ये कृषि आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांकडून विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यात शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांना कृषि पुरस्काराचे प्रस्तावकामी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषि सहायकाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
00000
सशस्त्रसेना ध्वजदिन निधीसाठी मदत करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 05 : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलातील वीरगती लाभलेल्या जवानांचे स्मरण आणि अपंग सैनिक, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणकारी योजनांकरिता निधी उभारण्यासाठी दरवर्षी 7 डिसेंबर सशस्त्रसेना ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. सशस्त्र सेना ध्वजदिन संकलनातून माजी सैनिकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. ध्वजदिन निधी संकलनासाठी राज्य शासनाने जिल्ह्याला 53 लक्ष 38 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासासाठी नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन 2023 निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती यांनी केले आहे.
संकलित झालेला निधी बँक ड्राफ्ट, धनादेश किंवा रोख स्वरुपात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा यांच्या नावाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सैनिक कॉम्प्लेक्स, बसस्थाकासमोर, बुलडाणा 443001, दूरध्वनी क्रमांक 07262-242208 येथे दि. 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी जमा करावे. यातील देणगी आयकर नियम 1961 मधील सेक्शन 80 जी (5) (VI) अंतर्गत आयकरात 100 टक्के सूट असून पॅन क्रमांक AAAGSO160A आहे.
000000
पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 05 : पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य सांभाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीज पडणे, पूर परिस्थिती यापासून नागरिकांचे संरक्षण करण्याबाबत उपाययोजना करणे, तसेच पावसाळा सुरु झालेला असताना अशुद्ध पाण्यामुळे अतिसार गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, काविळ यासारखे आजार होतात. आजार होऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक उपायोजना करणे आवश्यक आहेत. संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचींग पावडरचा पुरेसा साठा ठेवून पिण्याच्या सर्व स्त्रोतांचे नियमित शुद्धीकरण करावे. नळयोजना, हातपंप पाईप फुटणे, तसेच गळती असल्यास संबंधीत ग्रामपंचायतींनी त्वरीत दुरुस्ती करावी.
विहिरी, हातपंप, भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, त्याभोवती पाणी साचले असल्यास पाणी वाहते करावे, खताचे खड्डे व डबके, जनावरांचे मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावून त्यावर जंतूनाशक बीएचसी पावडर शिंपडावी. शेतातील विहिरीचे ब्लिचींग पावडर टाकलेले पाणी पिण्याबाबत जनतेस सूचना द्यावी. तसेच रस्त्यावरील उघडे अन्न खावू नये. नदी, नाले अथवा साचलेले पाणी पिऊ नये. ब्लिचींग पावडरयुक्त पाणी प्यावे, अथवा पाणी गाळून व उकळून थंड करुन प्यावे. जंतूनाशक औषधाची फवारणी झाल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
पिण्याच्या स्त्रोतांचे पाणी नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे तपासणीस पाठवावे. पाणी पिण्यास अशुद्ध असल्यास पाण्याचे शुद्धीकरण करावे. पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतरच पाणी पिण्यास उपयोगात आणावे. अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण प्रत्येक चार तासांनी आजारी व्यक्तीस पाजावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याकडून ओआरएसची पाकिटे विनामूल्य देण्यात येतात. कोणत्याही प्रकारची साथ उद्भवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधावा. नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करुन घ्यावे. अधिक माहितीसाठी आणि साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तसेच जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण पथक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 07262-242574वर संपर्क साधावा. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गिते यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment