Wednesday, 24 July 2024

DIO BULDANA NEWS 24.07.2024

 रायपूर येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना

बुलडाणा, दि. 24 : रायपूर येथील डेंग्यूसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

रायपूर येथे रुग्णांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याच्या अनुषंगाने आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपूर यांनी गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. यात दि. ७ जून, २६ जून, ११ जुलै, १९ जुलै, २१ जुलै आणि २२ जुलै या कालावधीमध्ये १० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चमूने गावामध्ये जलद ताप सर्व्हेक्षण, किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण राबविण्यात आले. यात ३१ रक्तजल नमुने डेंग्यू परिक्षणाकरीता घेण्यात आले. तसेच ४७२ घरामध्ये डासअळी आढळून आली. गावात ४ हजार ५७२ पाण्याची भांडी तपासणी करण्यात आली. यात ६८६ भांड्यामध्ये डासअळी आढळून आली. १५२ भांड्यामध्ये अळीनाशक टेमीफॉस टाकण्यात आले. ५३४ भांडी रिकामी करण्यात आली.

पाणीटंचाई असल्यामुळे नागरीकांची पाणी साठवून ठेवण्याची मानसिकता आहे. गावामध्ये नाल्या, गटारे पाण्याने तुंबलेली आढळून आल्याने ग्रामपंचायतीला पाणी वाहते करणे आणि कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. दि. २१ जुलै रोजी गावामध्ये धुरफवारणी करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे १७ कर्मचारी आणि बुलडाणा तालुक्यातील १६ कर्मचारी आणि ४ आरोग्य निरीक्षकांनी सहभाग घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उस्मान शेख सदर सर्व्हेक्षणावर नियंत्रण ठेवत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी रायपूर येथे प्रत्यक्ष भेट देवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रामपंचायत व सरपंचांना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. नागरिकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, घरातील पाणीसाठे स्वच्छ करणे, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याबाबत आवाहन केले. जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चौहाण यांनी भेटी देवून मार्गदर्शन आणि सुचना दिल्या आहेत.

00000

महाविद्यालयांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकासकेंद्र स्थापन करावे

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार, महाविद्यालयीन युवक-युवतींना कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम बनविण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

 काळाची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागांतर्गत कौशल्य प्रशिक्षण राबविले जाते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी 15 ते 45 वयोगटातील युवक -युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविण्यपूर्ण योजना सुरु केली. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात 1 हजार नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करुन  करण्यात येणार आहे.

सदर कौशल्य विकास केंद्रातून राज्य व जिल्हा पुरस्कृत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना बॅकिंग, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, वित्त आदी 37 क्षेत्राचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाअंती उमेदवारांचे मूल्यमापन आणि प्रमाणीकरण हे केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त मुल्यमापन संस्थांमार्फत, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामार्फत करण्यात येते. सदर प्रमाणपत्र राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आहे.

जिल्ह्यात कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ व्हावा, तसेच विविध क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील नामांकीत महाविद्यालयांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन रोजगारक्षम युवा बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींनी कौशल्य विकास प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

00000

दिव्यांग उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे

- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि. 24 : अपंग, मुकबधीर आणि अंध दिव्यांगाना व्यवसायिक शिक्षण देवून त्यांना स्वावलंबी बनविण्याकरिता आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण मिळावे घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दिले.

यावेळी अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेचे सचिव जयसिंग भगवतसिंग जयवार, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विश्वास खर्चे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. बचाटे, कौशल्य विकास विभागचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे उपस्थित होते.

जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवार कौशल्य आत्मसात करुन रोजगार व स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनतील. कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार उमेदवारांना कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणातून रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविणे ही सध्याच्या काळाची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था, अजिंठा रोड, बुलडाणा येथे नाव नोंदणी करावी, तसेच जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खासगी कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रशिक्षणासाठी दिव्यांग उमेदवारांनी जयसिंग भगवतसिंग जयवार, सचिव, अपंग कल्याण पुनर्वसन केंद्र, अजिंठा रोड बुलडाणा, क्रमांक 9423446132 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

सोमवारी खामगाव आयटीआयमध्ये रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 24 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर शासकीय औद्योगिक  प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्यातर्फे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार, दि. दि. 29 जुलै 2024 रोजी खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, इगतपूरी, क्रेडीट अक्सेस ग्रामीण कोटा, नागपूर, फिणोवेशन प्रा.लि., मलकापूर आदी उद्योजकांनी त्यांच्याकडील ॲप्रेंटशिप, ट्रेनी मॅनेजर आणि कस्टमर सपोर्ट एक्झीकीटीव्ह आदी पदे अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीही नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी असलेल्या किंवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर  उमेदवारांनी दि. 29 जुलै 2024 रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे उपस्थित राहून सहभागी व्हावे. पात्र, गरजू व नोकरी इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहुन नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत मुलाखत द्यावी. उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, संपर्क क्रमांक 07262-242342 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment