Monday, 8 July 2024

DIO BULDANA NEWS 08.07.2024




 स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे

-मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

बु‌लडाणा, दि. 08 : अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आज दि. 8 जुलै रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. सदर अभियान जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

श्री. जंगम यांनी अभियानादरम्यान पाणीपुरवठा योजनेतील गळती थांबवणे, शाळा, अंगणवाडीतील शौचालयाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ करणे, लोकसहभागातून परिसर स्वच्छता करणे, महिलांना स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देणे, एफटीके किटद्वारे पाण्याची नियमित रासायनिक व जैविक तपासणी करण्याचे निर्देश दिले. स्टॉप डायरीया अभियानांतर्गत अतिसाराबाबत व्यापक जनजागृती करून उघड्यावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, महिलांना आरोग्याचे प्रशिक्षण देणे आदी उपक्रम अभियानादरम्यान राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, आरोग्य विभागाचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. आर. खरात, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे यांनी प्रास्ताविक केले.

00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जबाबदारी निश्चित

बुलडाणा, दि. 08 : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेच्या लाभासाठी दि. 31 ऑगस्ट 2024पर्यंत पात्र लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. या योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहे.

योजनेसाठी देखरेख व संनियंत्रण जिल्हास्तर समिती, तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहे. तसेच समितींची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आली आहे. यात लाभार्थ्यांचे अर्ज स्विकृती, तपासणी, पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सेतू, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, वार्ड अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी, तर शहरी भागासाठी नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे नोडल अधिकारी राहणार आहेत.

कागदपत्र पडताळणी, तात्पुरती यादी प्रकाशन, हरकती, निराकरण जिल्हास्तर समितीस सादर करण्‍यासाठी संबंधित तालुकास्तरीय समिती राहणार आहे. यासाठी तहसिलदार हे नोडल अधिकारी राहतील. नारी शक्तीदूत अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याबाबत प्रशिक्षणाची जबाबदारी ग्रामीण भागासाठी संरक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तर नागरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नोडल अधिकारी राहतील. तसेच लाभार्थ्यांची खाते उघडणे, आधार ई-केवायसी करुन घेण्‍याची जबाबदारी सर्व बँकांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक हे नोडल अधिकारी राहणार आहेत.

00000

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश

बुलडाणा, दि. 08 : लोणावळा येथील भुशी डॅम येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल याठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येतात, तेथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग आदी यंत्रणांच्या सहायाने उपविभागीय अधिकारी यांनी भेटी देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी. प्रेक्षणीय ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन नियंत्रण रेखा आखून या रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाहीत, अशी व्यवस्था करावी. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून स्पष्ट सूचना असलेले फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

संभाव्य आपत्ती प्रवण, प्रेक्षणीय स्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नाही, अशी सर्व पर्यटनस्थळ, डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे आदी पर्यटकांसाठी आवश्यकतेनुसार बंद करावेत. यासाठी आदेश निर्गमित करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. जिल्ह्यातील शेगाव, लोणार, सैलानी दर्गा, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा, अंबाबरवा, ज्ञानगंगा अभायरण्य येथे पर्यटकांसाठी ‘काय करावे आणि काय करु नये’ याचे सूचना फलक लावावे. महसूल,  नगरपालिका, रेल्वे, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपत्ती प्रवण जल पर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक, लाईफ जॅकेटस, लाईफ ब्वाईज, रेस्क्यू बोटी आदी ठेवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

गिर्यारोहण, जलपर्यटन, मोठे प्रकल्प आदी ठिकाणी स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, जिल्हा प्रशासनातर्फे प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक आदींची मदत घेण्यात यावी. गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच प्रथमोपचार सुविधांसह रूग्णवाहिकेची व्यवस्था करावी. यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रत्येक पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदांतर्गत आदेश निर्गमित करण्यात यावेत.

पर्यटनाच्या ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन अपघात झाल्यास जिवीतहानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करावी. यात रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक आदीबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. द्रृतगती मार्गावर अपघातातील जिवीतहानी टाळण्यासाठी रस्त्याची देखभाल आणि सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात याव्यात. जिल्हा पोलिस अधिक्षक, महामार्ग पोलीस, उप प्रादेशिक परिवहन, रस्ता सुरक्षा विभागांनी अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी.

नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीतील पर्यटनस्थळी किंवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक येतात तेथील पदपथावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, टपऱ्या आदी काढण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांनी पार पाडावी. पर्यटन ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कडून स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजना आराखडा तयार करावा. तसेच त्यांच्यामार्फत पर्यटकांना योग्य माहिती देणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्मक आदेश, काय करावे आणि काय करु नये याबाबत जनजागृती करावी. पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे सुरक्षित व जबाबदार पर्यटनासाठी उपाययोजना, काय करावे आणि काय करु नये, सुरक्षिततेच्या दृष्टीचे अध्यादेश याची संपूर्ण माहिती नागरिक, तसेच पर्यटकांना देण्यात यावी.

जिल्ह्यामध्ये राजूर घाट, सातपुडा पर्वतरांगा, बोथाघाट आदी ठिकाणी, तसेच जंगल सफारी दरम्यान हिंस्र प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता असते. यासाठी वन विभागाने असुरक्षित ठिकाणचे पर्यटन बंद करावे. तसेच पर्यटनासाठी वेळ निश्चित करुन सूर्यास्तानंतर पर्यटक थांबणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी. तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक परिस्थितीनुसार उपाययोजना करून तात्काळ निर्णय घ्यावा. तसेच जिवीतहानी, दुर्घटना होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात. उपाययोजनांची काटेकारपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

खामगाव आयटीआयमध्ये महिला रोजगार मेळावा संपन्न

बुलडाणा, दि. 08 : खामगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी रोजगार मेळावा पार पडला. यात सुमारे 150 उमेदवारांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.

रोजगार इच्छुकांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खामगाव येथे हिंदुस्थान युनिलिवर लिमिटेडतर्फे महिलांसाठी विशेष रोजगार भरती मेळावा घेण्यात आला. यात इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटनन्स आणि कम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग ॲसिस्टंट या व्यवसायातून उत्तीर्ण असलेल्या आणि किमान १२ महिने औद्योगिक संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या महिला उमेदवारांना संधी देण्यात आली. सदर मेळाव्यास 150 पेक्षा जास्त उमेदवारांनी उपस्थित राहुन उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदिवला, स्थानिक पातळीवर उपलब्ध संधीचा लाभ उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार सहदेव गंगावणे यांनी केले आहे.

00000

शिवाजी हायस्कूलमध्ये 100 वृक्षांची लागवड

बुलडाणा, दि. 08 : आनंदी परिवार सेवाभावी ट्रस्टतर्फे भादोला येथील शिवाजी हायस्कूल शाळेच्या प्रांगणामध्ये 100 वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला.

शाळेच्या प्रांगणामध्ये 100 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पर्यावरणाची विशेष आवड असलेल्या शिला किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षक शुभांगी लहाने, तसेच ग्रामपंचायत सरपंच उपस्थित होत्या.

आनंदी परिवार संस्थेचे प्रमुख डॉ. म्हळसणे यांनी प्रास्ताविक केले. तसेच संस्थेकडून करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. दरवर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी किती झाडे जगली याकडेही विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगितले.

शिला पाटील यांनी स्वत: घरी तयार केलेले आंब्याचे रोपटे शाळेच्या मुख्याध्यापकांना देऊन आवारात लावण्याचे सांगितले. ग्लोबल वार्मिंग, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारी म्हणून स्वत:पासून सुरवात करावी, यातच समाजाचे हित आहे, असे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड त्याचे आईचे नावाने लावून ते जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे केले.

            यावेळी संस्थेचे संचालक अरविंद देशमुख, श्री. काळुसे, श्री. जुमडे, श्री. सुरुशे, श्री. गोसावी, श्री. दांडगे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री. जवरे, सचिव रवींद्र लहाने उपस्थित होते.

00000

बुलडाणा येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलडाणा, दि. 08 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अधीनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहातील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता सुधारीत वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. शालेय विद्यार्थांसाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावायाचा कालावधी दि. 10 जुलै 2024 पर्यंत आहे. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करण्याचा दि. 12 जुलै 2024 आहे. पहिल्या निवड यादी नुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. 18 जुलै 2024 पर्यंत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षायादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवडयादी प्रसिद्ध करण्याचा दि. 19 जुलै 2024 आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा दि. 24 जुलै 2024 राहील.

दहावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ऑफलाईन अर्ज करावायाचा कालावधी दि. 31 जुलै 2024 पर्यंत राहिल. पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करण्याचा दि. 5 ऑगस्ट 2024 राहिल. पहिल्या निवडयादीनुसार निवडयादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. 12 ऑगस्ट 2024 पर्यंत राहिल. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्द करण्याचा दि. 15 ऑगस्ट 2024 राहील. दुसऱ्या निवडयादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा दि. 22 ऑगस्ट 2024 पर्यंत राहील.

बीए, बी. कॉम, बीएससी., अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एमए, एम.कॉम, एमएससी या पदवीनंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका आदी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 31 जुलै 2024 पर्यंत आहे. पहिली निवडयादी अंतिम करणे व प्रसिद्धी करण्याचा दि. 5 ऑगस्ट 2024 आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. 12 ऑगस्टपर्यंत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवडयादी प्रसिद्ध करण्याचा दि. 15 ऑगस्ट 2024 राहील. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा दि. 22 ऑगस्ट 2024 पर्यंत राहिल. प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास मुदत संपल्यानंतर अर्ज स्विकारता येतील. पुढील प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे दोन निवड यादी जाहिर करण्यात येणार आहे.

सुधारीत वेळापत्रकानुसार रिक्त असलेल्या जागेकरीता आरक्षणानुसार शालेय विभागातील आठवी, कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बिगर व्यावसायिक व व्यवसायिक महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहणार आहे. प्रवेश अर्जाचे वाटप वसतिगृहाच्या कार्यालयात विनामूल्य उपब्लध आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल एस. ई. गारमोडे यांनी केले आहे.

0000000

आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात प्रवेश सुरु

बुलडाणा, दि. 08 : आदिवासी मुली व मुलांच्या संग्रामपूर येथील शासकीय वसतिगृहात रिक्त जागावर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या प्रवेश प्रक्रियेत आठवी, अकरावी, तसेच पदविका आणि इतर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. संकेतस्थळावर अर्ज भरुन त्याची प्रिंट आणि कागदपत्रांच्या प्रती जोडून वसतिगृहात सादर कराव्या लागतील. अर्जासोबत महाविद्यालयात प्रवेश पावती, त्यापूर्वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची प्रत, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक खाते, भ्रमणध्वनी लिंक असल्याचा पुरावा, तसेच पासपोर्ट फोटो जोडणे आवश्यक आहे.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी, विद्यार्थींनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment